विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?
उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने वसईच्या फादर कोरिया यांना भेटण्याचा योग आला. कोरिया हे दिब्रिटो यांचे समकालीन, सहकारी. ते जीवनदर्शन केंद्राच्या (वसई) मासिकाचे संपादक आहेत. ते स्वतः लेखक-संशोधक आहेत. त्यांच्या भेटीमुळे मला त्या वादासंबंधातील एक चर्चाही ऐकण्यास मिळाली. त्यामुळे माझा योगायोगाने त्या वादाशी संबंध आला आणि मला त्यावर हसावे की रडावे हे कळेना! हिंदू परिवारात अतिरेकी मतांचे लोक आहेत याचा अंदाज अधूनमधून येणाऱ्या बातम्यांवरून व वक्तव्यांवरून होता, पण त्या अतिरेकींना हिंदू संघटनांचे लोक थांबवत वा रोकत का नाहीत असेही वेळोवेळी वाटते. यावेळी तर साहित्य-संस्कृतीचा प्रश्न आहे. दिब्रिटो हे सौम्य प्रकृतीचे लेखक आहेत. दिब्रिटो यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड ही साहित्य-संस्कृतीच्या दृष्टीने निकोप गोष्ट आहे.