बेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा
वसंत वसंत लिमये हा बेफाट ‘बाळ्या’ आहे! त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना केव्हा कशी उद्भवेल ते सांगता येत नाही. तो आयआयटीतून बीटेक झाला. त्याने त्याच्या इंजिनीयरिंगच्या शिक्षणाचे काम पुढे काही केले नाही; ट्रेकिंगचा ध्यास घेतला, मुलांना साहसप्रवण केले. मग तो स्कॉटलंडला जाऊन आऊटडोअर मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेऊन आला आणि त्याने तसे प्रशिक्षण देणारी अद्भुतरम्य ‘हाय प्लेसेस’ नावाची कंपनी निर्माण केली. तिला पंचवीस वर्षें होऊनदेखील गेली. भारतीय कसोटी क्रिकेटची टीम विराट कोहली, अजिंक्य राहणे, वगैरेंसह पुरा एक दिवस त्याच्या ‘गरुडमाची’ या प्रशिक्षणस्थळी वर्षापूर्वी राहून व गिरिभ्रमणाचे धडे घेऊन आली. वसंत आता जरी पोक्त व प्रौढ झाला असला (त्याने ती चाहूल व्यक्त करणारा लेख वर्तमानपत्रात लिहिलादेखील!), तरी सर्वांमुखी तो लहानपणीचा ‘बाळ्या’च असतो. तोही ते बालपण ‘एंजॉय’ करतो.