असे घडले - सुलभा स्पेशल स्कूल
सात मुलांची धावण्याची शर्यत होती. शर्यत सुरू होऊन, सर्वांनी धावण्यास सुरुवात केली. एक मुलगा अडखळला आणि धपकन खाली पडला. त्याच्या ओरडण्याने, बाकीच्या मुलांनी वळून पाहिले; तो उठत आहे का याची वाट काही क्षण बघितली, पण त्याची उठण्याची लक्षणे दिसेनात. तेव्हा ती सर्व मुले मागे फिरून त्याच्याजवळ गेली. सर्वांनी मिळून हात देऊन त्याला उठवले. ती मुले त्याला घेऊन परत मागील ओळीजवळ आली. त्या मुलांना ‘वेडी’ म्हणता येईल का?
काही मुलांच्या मेंदूची व कधी कधी शारीरिकही वाढ कमी होते. इतर (नॉर्मल) मुलांप्रमाणे वयाच्या प्रमाणात त्यांच्या मेंदूचा विकास होत नाही. त्यांचे विकासाचे टप्पे (वाढीचे माइल स्टोन्स) उशिराने घडलेले असतात. उदाहरणार्थ, दोन वर्षाचे मूल सहसा चांगले चालू-बोलू लागते, पण काही मुलांना चालणे-बोलणे पाचव्या-सहाव्या वर्षी जमते. म्हणून त्यांना मंदबुद्धी असे म्हटले जाते. पण त्यांची चिकाटी किंवा अन्य गुण प्रबळ असू शकतात. सर्वसामान्य मुलांना तेच ते काम सतत करण्याचा कंटाळा येतो, पण ती मुले तशी कामे न कंटाळता करू शकतात.