त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला!
काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी जहांगीर भाभा हे एक असे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास संपादन केल्याने दोन द्रष्टया व्यक्तींची परस्परपूरक शक्ती निर्माण झाली. या एका बाबीचा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे!
डॉ. भाभा अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात असताना, तेथील संशोधनासाठी पोषक असलेल्या वातावरणाने प्रभावित झाले. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे याची नेमकी कल्पना, त्यांना वयाच्या विशीच्या आतच आली. त्यांनी त्यांच्या वडिलांना 8 ऑगस्ट 1928 रोजी लिहिलेल्या प्रसिध्द पत्रात ते म्हणतात, ''एखादा व्यवसाय करणे अथवा अभियंता म्हणून नोकरी करणे हे माझ्या स्वभावात बसत नाही, ते माझ्या वृत्तीच्या व मतांच्या थेट विरुध्द आहे. भौतिकशास्त्र हे माझे क्षेत्र आहे व त्यात काम करण्याची माझी ज्वलंत इच्छा आहे. एखाद्या संस्थेचा प्रमुख किंवा 'यशस्वी' माणूस होण्याची माझी इच्छा नाही. ते करण्यासाठी अनेक हुशार व्यक्ती आहेत. मला भौतिकशास्त्रामध्ये काम करू देण्याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.''