दुसरे साहित्य संमेलन - 1885
दुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली, म्हणजे पहिल्या ग्रंथकार संमेलनानंतर सात वर्षांनी भरले. मधील सहा वर्षें काहीही घडले नाही! दुसरे संमेलनही पुण्यात सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात भरले. ते पुण्यात 28 मे 1885 रोजी भरले. त्या संमेलनास अडीचशेच्यावर ग्रंथकार उपस्थित होते. त्या संमेलनासाठी पुन्हा पुढाकार घेतला तो महादेव गोविंद रानडे यांनीच. त्यानिमित्त एक विनंतिपत्रक प्रसिद्ध झाले होते. त्या पत्रकावर रानडे यांच्या बरोबरीने गोपाळ गणेश आगरकर, का.बा. मराठे आदी मान्यवरांच्या सह्या होत्या. पत्रकात संमेलनाचा उद्देश पुन्हा त्याच प्रकारे लिहिला गेला आहे - मराठीतील सर्व ग्रंथकारांनी एकत्र यावे आणि मराठी भाषेचा विचार साकल्याने व्हावा, ग्रंथकारांची एकमेकांशी ओळख व्हावी. त्या संमेलनासाठी लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. सूचना करणाऱ्यांत महात्मा फुले, जंगली महाराज, डॉ. कान्होबा रामछोडदास कीर्तिकर, महादेव चिमणाजी आपटे आदी मान्यवरांचा समावेश आहे. त्या संमेलनाचा वृत्तांत ‘केसरी’मध्ये आला होता- “गेले रविवारी जोशीबाबांचे दिवाणखाण्यात ग्रंथकर्त्यांची सभा भरली होती. शे-सव्वाशे ग्रंथकार आले होते.