ऐतिहासिक मंगळवेढा
भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग यांचे नाद शतकानुशतके घुमत राहिले. इतिहास, परंपरा आणि प्राचीन श्रेष्ठत्त्व ही मंगळवेढ्याची अलौकिक उंची आहे!
मंगळवेढा प्राचीन काळी महामंडलेश्वर, मंगलवेष्टक अशा नावांनी प्रसिद्ध होते. मंगळवेढ्याचा इतिहास इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत पोचतो. दक्षिण भारतातील चालुक्य/राष्ट्रकुट यांच्या काळात भरभराटीला आलेले ते शहर. ते नंतर देवगिरीच्या यादवांकडे आले. तेथे बहामनी राजवट इसवी सनाच्या चौदाव्या शतकात सुरू झाली. नंतर, 1489 साली ते गेले विजापूरच्या आदिलशहाकडे. मोगलांनी विजापूरची आदिलशाही 1686 साली नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर शाहूंच्या पश्चात, संस्थाने खालसा होईपर्यंत मंगळवेढा सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होते.