कोंझर गावाची रायगड जिल्ह्यात आघाडी (Konjhar)
कोंझर हे गाव ‘रायगड’ किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. रायगड म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्या गावाच्या नावाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. गावाची रचना अभेद्य किल्ल्याप्रमाणे वाटते. गावाच्या उत्तर–दक्षिण दिशांना प्रवेशद्वारांवर हनुमंताची मंदिरे आहेत. पश्चिम दिशेस ग्रामदैवत वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान आहे, तर पूर्वेस अभेद्य रायगड. पाचाड गावापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या साडेपाचशे आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील हत्ती तळ (कुंजर तळ) त्या ठिकाणी होता. ‘कुंजर’चा अपभ्रंश ‘कोंझर’ म्हणून त्या ठिकाणाला कोंझर हे नाव पडले असावे. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ स्वारीवर जाता-येता ‘कोंझर’ गाव व रायगड यांना जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान घाटमाथ्यावर त्यांच्या घोड्यांना पाणी देत असत. त्या परिसराला ‘घोडेटाकी’ असे संबोधतात व तेथील दोन-तीन किलोमीटरच्या शेतजमिनींना ‘घोडधाव’ असे उल्लेखतात. म्हणजेच सैन्यदलाची ये-जा ‘कोंझर’पर्यंत नेहमी असावी. त्यामुळे हत्तीचा तळ तेथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.