तो 1980 चा काळ. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाने महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्याच दरम्यान पन्नालाल सुराणा आणि रंगा वैद्य यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च निघाला. त्या विषयाशी काहीही संबंध नसलेला एक तरुण त्या मोर्च्यात सहभागी झाला. त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आणि त्याला त्याचा फायदाही झाला! त्या तरुणाचे नाव प्रदीप पुरंदरे. ते पुढे राज्य पातळीवरील जलतज्ज्ञ होऊन गेले.
त्यांनी त्यांचे मुख्य काम जलवंचितांना पाणी मिळावे यासाठी संघर्ष करणार्या व्यक्ती व संघटना यांना माहिती उपलब्ध करून देणे व जाणीव जागृती करणे हे ठरवले आहे व त्यांचे लेखन आणि प्रचारकार्य तसे चालू असते. त्यांनी कायद्याच्या आधारे सरकारच्या अनेक योजना रोखून धरल्या आहेत. पुरंदरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे एकशेएक्याण्णव प्रकल्प बेकायदा ठरले आहेत आणि एकाही नव्या सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता गेले बावीस महिने मिळू शकलेली नाही.