गुलाम मुस्तका यांची गांधीगिरी....
माळशेज रेल्वेच्या मागणीसाठी पाच लाख स्वाक्ष-यांचे निवेदन माळशेज कृती समितीने तयार केले आहे. समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे आहेत. ह्या रेल्वेची मागणी गुलाम मुस्तफा कुवारी ह्यांनी सतत लावून धऱली आहे. गुलामसाहेबांच्या त्या स्वयंसेवेचा आढावा....
कल्याणजवळील बदलापूर येथे राहणारे गुलाम मुस्तफा रब्बानी कुवारी यांनी गेली चाळीस वर्षं एक स्वप्न उराशी जपले आहे. ठाणे- नाशिक -पुणे आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांना कवेत घेणारे, ठाणे व नाशिक जिल्ह्यांतील तीस-चाळीस लाख लोखसंख्येच्या आदिवासी आणि ग्रामीण भागाचा विकास साधणारं, ठाणे जिल्ह्याच्या दहा तालुक्यांना जोडणारे असे ते स्वप्न आहे. स्वप्न आहे-दोन रेल्वेमार्गांचे! एक बदलापूर ते जव्हार-नाशिक या मार्गाचे आणि दुस-या मुरबाड ते नगर माळेशजघाट रेल्वे मार्गाचे!
गुलाम मुस्तफा कुवारी हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात चाळीस वर्षं नोकरी करून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवेचा बराचसा भाग ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व्यतीत झाला. त्यांच्या शहापूर, भिंवडी, वाडा, डहाणू, जव्हार, मोखाडा, मुरबाड, कल्याण येथे बदल्या होत गेल्या. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या अंतरंगाचे त्यांना सखोल दर्शन घडले.