कमला फडके आणि प्रसिद्ध मराठी लेखक ना.सी. फडके यांनी त्रिवेंद्रम येथे भरलेल्या एका ‘फिलॉसॉफी’ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने डिसेंबर १९४५ मध्ये प्रवास केला. परिषदेत ना.सी. फडके हे ‘फिलॉसॉफी ऑफ जॉग्रफी’ या विषयावर स्वत: लिहिलेला एक प्रबंधही वाचणार होते. (पृष्ठ २) “प्रथम लॉजिकची विद्यार्थिनी व नंतर एका फिलॉसॉफरची सहधर्मचारिणी यामुळे फिलॉसॉफी या गहन विषयासंबंधी माझ्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली होती; परंतु मी त्रिवेंद्रमला जायचे ठरवले ते केवळ त्या जिज्ञासेमुळे नव्हे; तर एकदा त्रावणकोरचं सौंदर्य पाहण्याची इच्छा होती म्हणून.” (पृष्ठ २)
सुरुवात अशी झाल्यामुळे त्या लेखनात निसर्गसौंदर्याची बरीच वर्णने असतील असे वाटले. पण प्रत्यक्ष लेखनात निसर्गवर्णन कमी व इतर अनेक गोष्टी येतात.
कमलाबार्इंचे वय प्रवासाच्या वेळेस एकोणतीस वर्षें होते. त्यांचा ना.सी. फडके यांच्याशी बहुचर्चित विवाह झाल्यावर त्यांना एक मुलगीही झालेली होती आणि तरीही लग्नाची नव्हाळी टिकून असलेले त्यांचे ते दिवस होते असे म्हणता येईल. कमलाबार्इंच्या नावावर काही पुस्तके आहेत – ‘जेथे ना उमलती शब्दफुले’, ‘तेरी चूप मेरी चूप’, ना.सी. फडके यांच्याबरोबर संयुक्त लेखक म्हणून ‘बाजुबंद’ आणि ‘अत्तर गुलाब’. प्रस्तुतचे पुस्तक १९४७ च्या सुमारास प्रसिद्ध झाले असावे. मला ते विलेपार्ल्याच्या ‘लोकमान्य सेवा संघा’च्या वाचनालयात वाचण्यास मिळाले.