वेध जलसंवर्धनाचा - औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्तीचा परिचय
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या 'वेध जलसंवर्धनाचा' या राज्यव्यापी माहितीसंकलनाच्या मोहिमेचा आरंभ ९ डिसेंबरला झाला. तालुक्या तालुक्यात जाऊन तेथील पाणी निर्माण करण्याचे, वाढवण्याचे, टिकवण्याचे व अनुषंगिक कार्य टिपायचे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आरंभ औरंगाबाद तालुक्यापासून योजला गेला होता. मोहिमेची आखणी औरंगाबाद तालुक्याला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली होती. 'थिंक'च्या दोन कार्यकर्त्यांनी 'पाणी' या विषयाभोवती तालुक्यात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचा परिचय ९-१०-११ डिसेंबर या तीन दिवसांत करून घेतला.
विजयअण्णा बोराडे हे राज्यभर माहीत असलेले तालुक्यामधील माननीय व्यक्तिमत्त्व. प्रांजळ आणि मनमोकळे. ते शहरातील सिडको परिसरात राहतात. बोराडे यांनी 'मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ' संस्थेच्या माध्यमातून शेतकरी आणि शेती यांसाठी सत्तरच्या दशकात भरीव काम केले. त्यांच्याशी बोलत असताना मराठवाड्यातील शेती आणि पाणी यांसंबंधीची स्थित्यंतरे समजत गेली. त्यांच्या कामात आधी शेतीबद्दल असलेला विचार हळुहळू पाण्याकडे केंद्रित होत गेला. बोराडे स्वतःच्या संस्थेचे काम सांगत असताना त्या कथनात 'मी किंवा आम्ही केले' अशी भावना नव्हती. ती एका कार्यकर्त्याची निरीक्षणे होती. त्यांच्या मनात काम करताना ते 'संस्थेसाठी नव्हे तर लोकांसाठी' हा विचार कायम होता, त्यामुळे त्यांच्या कामाचा आलेख विविध संस्था-व्यक्ती यांच्या माध्यमातून जनमानसात पोचताना दिसतो.