उत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा!
मतिन भोसले याने भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक दिले आहे. त्या मुलांनी शिकारीची हत्यारे आणि फासे टाकून हातात पेन पेन्सिल धरली आहेत. मतिनकडे तशी साडेचारशे मुले आहेत. मतिनच्या शाळेचे नाव आहे 'प्रश्नचिन्ह!'
प्रश्नचिन्ह ही आदिवासी आश्रमशाळा. ती अमरावती जिल्ह्याच्या नांदवाग खंडेश्वर तालुक्यात अाहे. नागपूर-औरंगाबाद आणि अमरावती-यवतमाळ हे हमरस्ते परस्परांना शिंगणापूर येथे छेदतात. तो शिंगणापूर चौफुला. प्रश्नचिन्ह शाळा त्या चौफुल्यापासून पश्चिमेस साधारण पाच किलोमीटरवर मंगरूळ चव्हाळा येथे आहे. अमरावती जिल्ह्यात पारधी समाजाचे बेचाळीस बेडे आहेत. मोठ्या बेड्यात नऊशेपर्यंत लोकसंख्या असते. मंगरूळ चव्हाळा बेड्याची लोकसंख्या सातशेपन्नास आहे. मतिन भोसले नववीत असताना त्याने 'दिव्य सदन' या ख्रिश्चन संस्थेबरोबर काम केले होते. त्याने धानोरा, जगतपूर, शिवरा, मंगरूळ चव्हाळा येथील बांधवांना सोबत घेऊन त्यांच्यावर ब्रिटीशांच्या काळापासून बसलेला चोरीचा शिक्का पुसण्यासाठी, त्यांना हक्काची जमीन मिळावी म्हणून, जातीची प्रमाणपत्रे मिळावीत म्हणून मोर्चे काढले होते. आंदोलने केली होती. मतिनने पुढे समाजातील मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. त्याची त्यासाठी शोधमोहीम सुरू झाली. त्याने नागपूर, औरंगाबाद, मुंबई, छत्तीसगड अशा ठिकठिकाणी. पुलाखाली राहणारी, रेल्वेस्टेशन, ट्राफिक सिग्नल येथे उभे राहून भीक मागणारी अशी एकशेअठ्ठ्याऐंशी मुले एप्रिल-मे 2012 मध्ये गोळा केली. मतिनने त्यांच्या पोटापाण्यासाठी गहू, कडधान्य गोळा केली. शिकारदेखील करावी लागली.