‘समर्थ दर्शन’ थीम पार्क
मी चाफळ येथील समर्थस्थापित श्रीराम मंदिराचा विश्वस्त म्हणून १९९९ पासून काम पाहू लागलो. तेव्हा जाणीव झाली, की ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ ही महाराष्ट्राची संतांची परंपरा. आळंदी, देहु, सज्जन गड, पंढरपूर ही त्यांची ठिकाणे. तरुण पिढी त्यांच्याकडे पर्यटनस्थळे म्हणून पाहते. तरुणाईला दृक्श्राव्य माध्यमाची ओढ आहे. संजय दाबके याने अमेरिकेतून उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. त्याच्याकडे सांस्कृतिक वैभवाची दृष्टी आहे. माझा संजय दाबके याच्याशी स्नेह जुळला आणि त्यातून चाफळच्या मंदिराचा इतिहास डॉक्युमेंटरीद्वारे दाखवण्याचे ठरले. ‘कराड अर्बन बँके’ने त्या उपक्रमाचे महत्त्व जाणून प्रायोजकत्व स्वीकारले आणि अल्पावधीत प्रकटली ‘श्रीराम, चाफळ’ ही चोवीस मिनिटांची डॉक्युमेंटरी. ती दाखवण्यासाठी मंदिराच्या आवारातच ‘महाकवी वाल्मिकी प्रेक्षागृह’ हे साठ आसनी प्रेक्षागृह तयार झाले. त्याचे मार्च २०१२ ला उद्घाटन झाले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळू लागला.