'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे? मी काय त्याचा मक्ता घेतलाय?' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये.
दोन्ही वाक्यांत 'मक्ता घेणे' हा वाक्प्रचार वापरला आहे. 'मक्ता' याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे.
ठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी 'मक्ता घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो.
ठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारे खंडकरी यांना 'मक्तेदार' असे म्हणतात. शब्दकोशांत मक्तासंबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले, पण मक्ता शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला, ते कळले नाही.
मध्यंतरी कविवर्य सुरेश भटांचा 'एल्गार' हा संग्रह वाचत होतो. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथे मक्ता हा शब्दही भेटला.
'गजले'च्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला 'मक्ता' असे म्हणतात.
पूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे 'गजल' कोणाची आहे हे कळण्यासाठी मक्त्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच 'तखल्लुस', मक्त्यात गुंफलेले असे. थोडक्यात मक्त्यामुळे कवीचा गजलेवरील हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच 'एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे' ह्या अर्थी 'मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.