कामाठीपु-यातील अलेक्झांड्रा
मुंबईच्या कामाठीपु-यातील ‘अलेक्झांड्रा’ थिएटरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रेक्षक प्रणयदृश्ये किंवा नग्नता अत्यंत ‘कॅज्युअली’ घेत असतात. जीवनमृत्यूच्या चक्राएवढेच लैंगिक जीवनही नैसर्गिक आहे अशी त्यांची धारणा असते. कारण तो परिसर वेश्यावस्तीचा आहे. मुंबईच्या ‘बेस्ट’च्या बसेसना पूर्वी नंबर नव्हते, अल्फाबेट्स होते. गिरगाव चौपाटीसाठी ‘सी’ रुट, सायनसाठी ‘एन’ रुट, तर मलबार हिलसाठी ‘एच’ रुट. ‘जी’ रुट, आजची पासष्ट नंबरची बस. म्हणजे अब्रह्मण्याम! दोन्ही बाजूंना वेश्यावस्ती. दारे-खिडक्यांत नट्टापट्टा करून बसलेल्या स्त्रिया. त्या बसमधून अपर डेकवर बसून प्रवास हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असे. ती बस नागपाड्यानंतर डाव्या बाजूला कामाठीपु-याकडे वळते. तेथे कोप-या वर जुन्या बंगलीप्रमाणे भडक निळ्या रंगाचे, पाश्चात्य शैलीचे ‘अलेक्झांड्रा’ थिएटर वसलेले आहे. मूकपटांचे वितरक अब्दुल अली युसुफअली व अर्देशीर इराणी (जे पुढे इंपीरियल स्टुडिओचे मालक झाले) यांनी भागीदारीत १९१४ मध्ये लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा थिएटर घेतले.