ब्लॅक ब्युटी – घोड्याच्या नजरेतून


‘ब्लॅक ब्युटी’ माझ्या वाचनातून अनेक पुस्तके गेली आहेत. कधी कादंबरी, कधी कथासंग्रह, कधी प्रवासवर्णन तर कधी आत्मचरित्र! पण ती सारी पुस्तके आहेत ती तुमच्या-माझ्यासारख्या माणसांवरची,  तशी माणसांशी संबंधित. माणसाने माणसाच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली. पण मग माणसाप्रमाणे प्राण्यांच्या नजरेतूनही काही कथा असू शकतातच की! प्राण्यांना माणसांप्रमाणे जरी बोलता येत नसले तरी त्यांना मन असतेच ना! आणि मन म्हटले, की भावभावना ह्या आल्या. ते कधी दु:ख असेल तर कधी आनंद, कधी राग असेल तर कधी नैराश्यही! माणसाळलेला असाच एक प्राणी म्हणजे घोडा. घोडा! आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग. घोड्याने जशी अनेक युद्धे पाहिली तसाच तो अनेक शर्यतींत चौफेर उधळलाही आहे. कधी तो श्रीमंतांचा थाट बनून राहिला तर कधी तो गरिबांची निकड बनला. बुद्धीने तल्लख असलेला तो प्राणी कुत्र्याप्रमाणेच माणसाचा लाडका ठरला. परंतु त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या मनाचा ठाव कधी कुणाला लागला का? त्या मुक्या जनावराच्या भावना कधी कुणापर्यंत पोचल्या का? त्याच्या वेदना जाणून घ्यायच्या असतील तर अ‍ॅना सेवेल यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक ब्युटी’च्या वाचनाशिवाय पर्याय नाही.