‘काशीची कत्तल!’ आणि ब्रिटिशांचे चातुर्य
भारतीय मनाला कत्तल आणि काशी (सध्याचे वाराणसी) या शब्दांचे नाते सहसा चालणार नाही; मात्र तसे ते आले होते आणि तेही जवळ जवळ एकशेवीस वर्षांपूर्वी! महाराष्ट्र साहित्य परिषदेने जतन केलेल्या दुर्मीळ ग्रंथांच्या यादीवर नजर टाकली तेव्हा ते कळून आले आणि आश्चर्याचा धक्का बसला! असे धक्के जुन्या ग्रंथसंपदेकडे बघताना आणि ती पुस्तके वाचताना अनेकदा बसतात. संदर्भित पुस्तकाचे लेखक आहेत अनंत नारायण भागवत. त्यांनी स्वतःच ‘काशीची कत्तल’ हे पुस्तक 1906 साली प्रकाशित केले. पुस्तक आहे अवघे छप्पन पृष्ठांचे. त्याची किंमत पंचवीस पैसे त्या वेळेस (1906) ठेवली होती. तशी नोंद दर्शनी पानावर हाताने केलेली आढळते (जुना रुपया चलनात होता. तेव्हा मूळ किंमत चार आणे असावी). पुस्तकात हकिगत सांगितली आहे, ती अयोध्येचा पदभ्रष्ट राजा आणि ईस्ट इंडिया कंपनीची फौज यांच्यात अल्पकाळ झालेल्या लढाईची. परंतु लेखकाने तेवढी हकीगत फक्त सांगितली असती तर लेखनाला ऐतिहासिक कथा असे स्वरूप आले असते. मात्र ते पुस्तक एका ऐतिहासिक पुस्तकमालेचा भाग आहे असे पुस्तकाच्या प्रत्येक पानावर लिहिलेल्या शीर्षकातून दिसते. त्यामुळे इंग्रजांनी अयोध्या राज्याच्या मुस्लिम राजाला पदच्युत केले. त्यांनी दोन भावांतील/दोन वारसांतील सत्तालोभाचा फायदा उठवला. अखेर, त्यांपैकी एका भावाने बंडखोरीचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आलेही. परंतु लढाईत मोठा मनुष्यसंहार झाला. अशी ती हकिगत आहे. काशी अयोध्येच्या ताब्यात नव्हती, पण अयोध्येच्या नबाबाचा भाऊ काशीला राहत होता.