म्हैसगावचा रामहरी फ्रान्समध्ये!
म्हैसगाव कुर्डुवाडीपासून दहा किलोमीटर दूर आहे. म्हैसगावसारख्या सात-आठ हजार लोकवस्तीच्या गावातील दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत! ही कहाणी आहे गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झालेल्या शैक्षणिक प्रगतीची. म्हैसगावात चंद्रकांत कुंभार नावाचे गृहस्थ राहतात. कुंभारकाम हा त्यांचा व्यवसाय. कुंभार यांचा थोरला मुलगा रामहरी फ्रान्समध्ये पीएच.डी. करत आहे व दुसरा मुलगा, नामदेव मुंबई विद्यापीठात पत्रकारितेतील पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.
रामहरी सांगतो, तो लहान असताना, म्हैसगावातील एकंदर वातावरण चांगले नव्हते. राजकारण बरेच होते व त्याचे पडसाद घराघरात जाणवत. घरांमध्ये भांडणे होत असत. शिवीगाळ चालू असे. गावातील मुलांच्या शिक्षणाकडे कोणी लक्ष देत नसे.