माझी साडेतीनशे नातवंडे

0
93
_1192_2

सुधीर नाईकमी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, वाढलो व तसाच आहे. खाऊन-पिऊन सुखी; शिक्षणात ब-या डोक्याने वावरलो. मोठ्या न् खोट्या इच्छा-आकांक्षा कधीच मनात आल्या नाहीत. माझे वडील, माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी गेले – एवढे एक दुःख सोडले तर फारशा अडचणी नाहीत. आई होती. मोठा भाऊ व वहिनी, दोघांनी कधी कसली अडचण पडू दिली नाही. काका-मंडळीही नेहमी विचारत आली. एम्.ए.नंतर स्टेट बँकेत नोकरी मिळाली. यथावकाश लग्न. – सुविद्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी. मध्येच नोकरी सोडून वकिली चालू केली. मुलांची शिक्षणे पूर्ण झाली. पाठोपाठ, त्यांची लग्ने पार पडली. मोजून चार वेळा आजोबा झालो. याच काळात ‘नैसर्गिक शेती’ या विषयाशी ओळख झाली. मग झाडे लावणारा ‘झाडकरी’ होऊन संकल्प सोडला – “आयुष्याच्या प्रत्येक दिवसामागे एक झाड लावणे. मी शंभर वर्षें जगणार, म्हणून निदान छत्तीस हजार पाचशे झाडे माझ्या नावे, व घरात वाढते कुटुंब… म्हणून साडेतीन लाख झाडे लावणे व वाढवणे, तीही नैसर्गिक शेतीच्या पध्दतीने”. हे आपले कर्तव्य असे समजून सध्या राहात असतो. अद्यापपर्यंत सत्तावन्न हजार झाडे असा माझा स्कोअर झालेला आहे.

सुधीर नाईक, टेरेसवरील गार्डनमध्येकुंपणाने सुरक्षित केलेली कुठलीही जमीन ही आपली कर्मभूमी, त्यावर योग्य ती झाडे लावायची. त्याच कामासाठी म्हणून, आमच्या कुटुंबावर माया करणा-या नलिनी शेरे यांच्या वृक्षप्रेमामुळे, मी अहमदनगर M.I.D.C. तील ‘स्नेहालय’ या संस्थेत येणे-जाणे करू लागलो. त्यांची तीस एकर जागा. तेव्हा तेथेच मुक्काम ठोकून, झाडांबरोबर अनाथ मुलांसाठीही काही काम करुया असा विचार मनात येऊ लागला. त्यात अचानक माझ्या पत्नीचे आजारपण उद्भवले. तेव्हा मला जाणवले, की काही सामाजिक काम करायचे असेल तर ते आत्ताच! यापुढे ते करणे अधिकाधिक कठीण होत जाईल. कारण आपले शरीर धडधाकट असतानाच काही काम होईल. नंतर आपण परावलंबी होत जाणार. म्हणजे फक्त भाषणबाजी!

मुंबईतले माझे वास्तव्य खूपच सुखाचे. चांगला, हवा-उजेड असलेला फ्लॅट! त्याहून चांगला शेजार!

नेहमी गप्पा-गोष्टी-गाणी यांसाठी वेळ काढणारी मंडळी! खाणे-पिणे, मौज-मजा, सोसायटीच्या गच्चीवर कुंड्यांमधून, सभासदांचा हिरवा कचरा वापरून; वेगवेगळी झाडे, वेली लावण्याचे काम चालू केले; लायब्ररीतून पुस्तके आणून वाचायची, सकाळ-संध्याकाळ ‘वॉक’ घ्यायचा. – या सर्वांत वेळही मस्त जात होता, पण नंतर लक्षात येऊ लागले, की आपण आतून कुठेतरी कुजत चाललो आहोत. मुख्य म्हणजे नातवंडे भेटली नाहीत तर कुढायला व्हायचे. काहीसे ‘डिमांडिंग’ होत चाललो आहोत. – पत्नीकडून, मुलाकडून, लग्न झालेल्या मुलीकडून, सर्वच नातवंडांकडून – इतरांकडून आपल्या अपेक्षा वाढताहेत. त्या पु-या करणे त्यांना शक्यच होणार नाही. वाल्या कोळ्याला नारद भेटल्यानंतरची स्थिती! ही लक्षणे ठीक नव्हती. सगळीकडून ओरबाडून खाल्ले जाणारे सुख! ते पचत नव्हते. माझे, माझे म्हणत त्याचेच ओझे होऊ घातले. हे सुख स्वतःहून इतरांना वाटले नाही तर ते कुजून जाईल. अढीत ठेवलेला, पिकलेला आंबा नाही का ‘माझं माझं’ म्हणत सडत जातो! ज्यांच्याकडे आधीच भरपूर आहे अशांना अधिक देण्याचा अट्टाहास करत राहण्यापेक्षा, ज्यांना गरज आहे त्यांना काही वाटले गेले तर अधिक बरे. फांदीवर लटकलेला पिकलेला आंबा इतरांच्या कामी येतो. अनेक जीव-चिलटे, माश्या, पक्षी, वारा त्या आंब्याचा सुगंधी दरवळ लुटायला येतात. आणि मग केव्हातरी तो पिकलेला-रसभरा आंबा कृतकृत्य होऊन जमिनीवर अलगद पहुडतो, मातीत मिसळून जातो, तोच मुळी आनंदाचे आणखी एक झाड होण्यासाठी!

मग मनाचा हिय्या केला, मुंबईतला फ्लॅट भाड्याने दिला व त्यातून येणा-या भाड्याच्या जीवावर, अहमदनगर M.I.D.C. येथील ‘स्नेहालय’ या संस्थेत स्वयंसेवक म्हणून सपत्नीक दाखल झालो. सज्जनांनी नुसते सज्जन असून चालत नाही. त्यांनी एकत्र येऊन काही सकारात्मक काम उभे केले तरच जगाचे भले होऊ शकेल असे म्हटले जाते. म्हणूनच, ‘स्नेहालया’च्या कामात खारीचा वाटा उचलायचा असे ठरवले. – आता मागे वळून पाहिल्यानंतर घेतलेला निर्णय योग्य ठरला असे म्हणायला हरकत नाही!

नगरला आल्यानंतर हिरव्या पानांची झाडे लावताना, ‘आनंदाची झाडे’ केव्हा लावू लागलो ते कळलेच नाही! ‘स्नेहालय’ हा अनाथाश्रम आहे. साडेतीनशे अनाथ मुला-मुलींचे पालन तेथे केले जाते. त्यांपैकी अर्धी मुले ही HIV+ आहेत. एड्स् झालेल्या आई-वडिलांची ही मुले! जन्मतः एड्सबाधित!! स्वतःची कुठलीच चूक नसताना हा रोग घेऊन जगात प्रवेश केलेली. त्यांचे आई-वडील एड्सने गेले, म्हणून इतर कुटुंबीयांनी दूर लोटलेली. सर्व नातेवाईक असूनही अनाथ! या रोगाची लागण झाल्याने मनात सदोदित सल घेऊन वावरणारी. ‘माझ्या नशिबी हे का?’ – असा भाव चेह-यावर वागवणारी ही मुले!

साडेतीनशे अनाथ मुलांचे राहणे, खाणे-पिणे, कपडे, शिक्षण, दुखणीबाणी, सर्व सांभाळून निगुतीने जोपासना करणारा पासष्ट-सत्तर जणांचा स्टाफ. असा हा प्रचंड डोलारा, मोठ्या हिमतीने व तळमळीने सावरणारी ट्रस्टी मंडळी- सर्वश्री गिरीश कुळकर्णी, सुवालाल सिंगवी ऊर्फ बापूजी व मिलिंद कुळकर्णी… सर्व मंडळी पारदर्शक. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे विवेकानंदांचे ब्रीदवाक्य प्रमाण मानून त्याप्रमाणे चालणारी. अनाथ मुलांना केंद्रबिंदू ठेवून त्यासाठी अनेक योजना आखणारी व पॉझिटिव्ह मंडळींना सांभाळणारी.

हे सर्व मला जमणारे नव्हते; आपण फक्त इथली झाडे सांभाळुया, जे करायला त्यांच्याकडे वेळ नाही, असे म्हणून आम्ही इथे आलो. पण इथे आल्यावर इथल्या मुला-मुलींनी आम्हांला आजी-आजोबा म्हणून केव्हा नोंदवून घेतले ते समजलेच नाही. ‘स्नेहालया’त मुलांचे राहणे, खाणे-पिणे, अभ्यास यांची चांगली सोय पाहिली जाते, पण त्या पलीकडे जे मुलांना हवे असते ते देण्यासाठी इथल्या स्टाफकडे वेळ उरत नसतो. घरी आपण दोन मुलांना सांभाळू शकत नाही, इथे तर प्रत्येकाला वीस-बावीस मुले सांभाळावी लागतात. त्यातच स्टाफची दमछाक होते. या मुलांची भावनिक जोपासना करायला आमचा वेळ उपयोगी पडू लागला असावा. दररोज एक ना एक मुलाची गोष्ट सांगता येईल असे इथे घडत असते. मुलांना हव्या असणा-या गोष्टी अगदी छोट्या असतात. पण त्या मुलांनी सांगायच्या कुणाला??? कुणाला??

एक फुगा, एक गोळी, कधी अवेळी लागलेली भूक, शाळेतून आणायला सांगितलेला विशिष्ट कागद, चित्र, पेन इत्यादी; जवळ येत जाणारा वाढदिवस, मित्राला द्यावीशी वाटणारी भेट, छोटासा बॉल. T.V. वरच्या ‘अ‍ॅड’मध्ये दाखवलेली पेपरमिंटची गोळी, झोपताना वाटणारी भीती, दुखणारे पोट, वाढत्या वयातील गोंधळून टाकणा-या समस्या – एक ना दोन. वस्तू प्रत्यक्षात मिळो वा न मिळो, पण निदान ती मागायला वा सांगायला हक्काचे स्थान म्हणून ही मुले आमच्याकडे येऊ लागली. मांडीवर हात ठेवून, खांद्यावर हात ठेवून गप्पा मारू लागली. हळूच पाठीमागून येऊन डोळे झाकू लागली. त्यांच्या भांडणाचा निकाल लावायला सांगू लागली. ‘मी आजोबांना नाव सांगीन’ म्हणून आपसात दम देऊ लागली. एकदा, एका मुलाला दोन मुले त्वेषाने ठोसे देत होती. मारणारी मुले शांत स्वभावाची म्हणून मला ठाऊक होती. मी त्यांना अडवले, ‘अरे, मारता कशाला त्याला?’ तर दोघांनीही एकदम सांगितले, तो नं तुम्हांला म्हातारा म्हणाला. मी त्यांना म्हटले की त्यात काय झाले? म्हातारा तर म्हातारा. मी आहेच मुळी म्हातारा. त्याला कशाला मारता? तेव्हा ती दोन्ही मुले मलाच दम दिल्यासारखी म्हणाली, “नाही. तुम्ही ‘म्हातारे’ नाहीत. तुम्ही तर ‘आजोबा’ आहात!” – असा मी खराखुरा आजोबा झालो! अद्यापपर्यंत मी फक्त वयाने आजोबा होतो.

त्यानंतर मी अधिक डोळसपणे पाहू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझ्यासारख्या किमान पंधरा स्वयंसेवकांची इथे गरज आहे. तरच या सर्व मुलांचे भावनिक पोषण नीट होऊ शकेल. पुढे जाऊन ते सुजाण नागरिक म्हणून वावरू शकतील. आपापसातील रागद्वेषांवर, मत्सरावर मात कशी करायची, हे त्यांना कसे कळणार? त्यांना जे हवे ते सांगायचे तरी कुणाला? – ही एक पोकळी भरून काढण्यासाठी तरी अशा आजी-आजोबांची गरज आहे. मधूनच पाठीवर थाप पडली की ती कृतकृत्य होतात. चांगले मार्कस मिळाले की धावत सांगत येतात. त्यांनी स्वतः लिहिलेली गोष्ट, गाणे, निबंध, कविता ऐकवण्यासाठी त्यांना कुठले तरी स्थान हवे असते. शाळेत जाण्यासाठी स्कूल-बस आहे, पण निघताना ‘टा टा’ करायला कुणी नको का?

आमचा वेळ या सा-यांत जातो. माझ्या उतरत्या वयात ‘मी कुणाच्या तरी उपयोगी पडतोय’ ही जाणीव/ भावना मला आनंद देऊन जाते. घरी बसून चार नातवंडांची आठवण काढत बसणारा मी, आता नातवंडांची संख्याच वाढवून बसलोय. साडेतीनशे नातवंडे !

A-R-T च्या गोळ्या वेळेवर घेतल्या तर एच.आय.व्ही.बाधित मुले पस्तीस-चाळीसाव्या वर्षांपर्यंत सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. थोडीशी उत्तेजनापण त्यांना जगायला प्रचंड बळ देऊ शकते, हे माझ्या लक्षात आले आहे. माझ्यासारख्या अनेक रिकामटेकड्यांना अशा कामात भाग घेऊन आपल्या वानप्रस्थाश्रम अर्थपूर्ण करता येईल!

हे काम वय विसरायला लावते, आनंद देते व मुलांनाही आनंद मिळतो. ज्यांना गरज आहे अशा अनाथ मुलांना तुमचा वेळ द्या. त्यांच्यासाठी करण्याजोगी अनेक कामे तुम्हाला आपोआप सापडतील. त्यांना परवचा , रामरक्षा ,मनाचे श्लोक , गीताई , गाणी, चुटके, नाटुकली, गृहपाठ इत्यादी शिकवता येईल. स्वच्छतेचे धडे देता येतील. नाक कसे शिंकरायचे? कपडे, नखे, चेहरा, शरीर, केस, डोळे यांची निगा कशी व का राखायची? वह्या-पुस्तके, पेन-पेन्सील, दप्तरे यांची काळजी कशी घ्यायची? कसे जेवायचे? नीट जेवणे म्हणजे काय? अन्नाची नासाडी का करायची नाही? अक्षर कसे सुधारावे? – एक ना दोन, अनेक त-हेचे संस्कार देण्याची गरज आहे. पुढे जाऊन जगात कसे व का वागावे याची जाण देण्याचे काम आपण नक्की चांगल्या प्रकारे करू शकतो. हे काम एक-दोन तास लेक्चर देऊन होणारे नाही. त्यासाठी लागणारा वेळ हा फक्त सेवानिवृत्त देऊ शकतात. अनाथ मुलांना घर ही संकल्पनाच नसते. त्यामुळे प्रत्येकाला हाताळण्यासाठी वेगवेगळे तंत्र विकसित करावे लागते. एका मुलाला नासाडी करण्यात मौज वाटत असे. पक्ष्यांची घरटी मोडा, वस्तू मोडा, फांद्या तोडा, चादरींवर थुंका. त्याला मारून-झोडूनही उपयोग होत नव्हता. मग त्याला विचारायला सुरूवात केली. "काय घरटं मोडल्यावर कसं मस्त वाटलं, नाही रे? ती पिल्ले खालती पडून चिवचिवाट करताहेत ते ऐकून कसा आनंद वाटतो, नाही रे? इतरांच्या चादरींवर थुंकले की तोंड कसे स्वच्छ होते, नाही का? त्याची मोटार मोडली, तो रडल्यावर किती गंमत आली, नाही का? – चल, आपण इतरांना सांगुया. हळूहळू तो मुलगा निवळला.

मुलांच्या सहवासात आपणही लहान होत जातो. वाढत्या वयाची जाणीव होत नाही. या मुलांना गोंजारताना आपली दुखणी कशी निघून गेली तेही समजत नाही. आपली कुणालातरी गरज आहे, आपण त्याला हवेहवेसे वाटतो, त्याला आवडतो – एवढी एकच गोष्ट जगण्यासाठी उमेद द्यायला पुरेशी आहे. मी हे स्वत: अनुभवतोय म्हणूनच सांगतो.

सेवानिवृत्तांनी, स्वत:च्या तब्येतीची काळजी करत कुढत बसण्यापेक्षा, काहीतरी सकारात्मक कामाला हातभार लावायला हवा. त्यानेच 'आयुष्या'चे रूपांतर अर्थपूर्ण 'जीवना'त होईल.

सुधीर नाईक
भ्रमणध्वनी : 9320270022

{jcomments on}

About Post Author