संबळ – लोकगीतांची ओळख

5
156
क-हाड येथील खंडोबाच्या यात्रेत मुख्य‍ मंदीरानजीक संबळ वाजवणारे गोंधळी
क-हाड येथील खंडोबाच्या यात्रेत मुख्य‍ मंदीरानजीक संबळ वाजवणारे गोंधळी

संबळ हे डमरूचे प्रगत रूप होय. कालिकापुराणात, शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी हे वाद्य निर्माण केले अशी समजूत आहे. संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून उपयोगात येते. गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून संबळ वापरतात. गोंधळ हा लोकगीताचा प्रकार संबळेच्या तालावर आकार घेतो.

संबळ हे वाद्य गोलाकार असते. त्याला ‘सुपारी घाट’ असे म्हणतात. ते तबल्याप्रमाणे दोन वाद्यांची जोडी असलेले चर्मवाद्य आहे. त्या वाद्याचा एक भाग लहान व एक भाग मोठा असतो. त्यातील एकाला नरसंबळ आणि दुस-याला मादीसंबळ असे म्हणतात. झाडाचे खोड कोरून पोकळ केलेले लाकूड संबळ तयार करण्यासाठी वापरले जाते. ते वाद्य पितळ किंवा तांबे या धातूस अावश्यक तो आकार देऊनदेखील तयार केले जाते. त्या वाद्यावर चामड्याचे आवरण लावलेले असते.

नरसंबळ डग्ग्याचे बोल पुरवते. त्‍यावर डग्ग्यासारखी शाई असते, तर मादीसंबळ तबल्याचे बोल पुरवते. संबळेचा आकार पंचपात्राप्रमाणे असतो. लहान वाद्याच्या तोंडाचा घेर मोठ्या वाद्याच्या घेरापेक्षा निम्मा असतो. त्यांची तोंडे कातड्याने मढवून सुताच्या दोरीने आवळलेली असतात. वाद्याच्‍या तोंडावरील कातड्यास ताण देण्‍याकरता संबळेच्‍या भोवती तबल्‍याप्रमाणे चामड्याची किंवा दोरीची वादी असते. इतर वाद्य ही साथीची वाद्ये असतात. मात्र संबळ साथीसाठी खूप कमी वेळा वापरली जाते. संबळचे वजन सुमारे साडेदहा किलो असते.

संबळावर वाजवण्यासाठी खास आराटी या झाडाच्या मुळीचा आकडा तयार केला जातो. संबळ तखडाच्या किंवा वेताच्या बारीक छडीनेदेखील वाजवतात. अाकड्याच्या टोकाला इंग्रजी अक्षर ‘S’ यासारखा आकार दिलेला असतो. अाकड्याची लांबी एक ते सव्वा फूट असते. तो हातातून निसटू नये, यासाठी त्याच्या हातात धरण्याच्या टोकाला कापड गुंडाळलेले असते. अाकड्याच्या सहाय्याने संबळ वाजवताना त्या वाद्याचा आवाज घुमतो. तो ऐकणाऱ्यांना शरीर कंप पावत असल्याचा अनुभव येतो. त्‍या वाद्यातील खर्ज स्वर निघणा-या भागाला बंब किंवा धम असे म्हणतात, तर दुस-याला झील असे नाव आहे. संबळ दोरी अथवा शेला यांनी कमरेस बांधले जाते. गोंधळी ते वाद्य उभे राहून वाजवतात. संबळ वाजवणाऱ्याला गाता आले पाहिजे. संबळ वाद्य स्वत:गात गतीत वाजवावे लागते. ते संथ वाजवून चालत नाही.

संबळ वाद्य सनईवादनाच्या वेळी साथीला असते. ते वाद्य बासरीच्या वेळी साथ करताना हाताने वाजवतात. गोंधळी लोक गोंधळाच्या वेळी याचा उपयोग करतात. अंबेमातेचा जयजयकार करत ती व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने देवींची विविध गाणी सादर करते, संबळाच्या तालावर नृत्यही करते. त्याला ‘संबळ गोंधळ’ म्हणतात.

संबळ वाद्य एकाच वेळी शांत व उग्र आहे. ते कोमल आहे आणि तीव्रदेखील! तसेच; ते ऐक्य व विग्रह करणारे आहे, असेही समजतात. वेदांमध्‍ये उल्‍लेखलेले स्तंबर किंवा सांबल वाद्य म्‍हणजे संबळ असावे असा अंदाज मांडला जातो. पूर्वीच्या काळी लग्नकार्यात मांडवापासून ते सत्यनारायण विधीपर्यंत पारंपरिक संबळवादन होत असे. संबळबरोबर पिपाणी व भोंगा यांवर विविध गाणी वाजवली जात. अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत दारात येणारी व्यक्ती म्हणजे गोंधळी.

पारंपरिक संबळ वाद्य पाहणे दुर्मीळ झाले आहे. मात्र सध्याच्या अनेक मराठी सिनेगीतांमध्ये संबळेचा उपयोग केला जातो. संगीतकार अजय-अतुल यांनी ‘जोगवा’ या सिनेमामध्ये ‘लल्लाटी भंडारऽऽऽ’ या गीतामध्ये संबळ वापरली अाहे.

– सुरेश वाघे

Last Updated On 7th June 2018

About Post Author

5 COMMENTS

  1. खुपच उपयुक्त माहिती आहे. अशी
    खुपच उपयुक्त माहिती आहे. अशी सर्वच पारंपारिक वाद्य प्रकारांची माहिती मिळावी.
    शुभेच्छा.

  2. सांगली माधवनगर येथे येडाबाईची
    सांगली माधवनगर येथे येडाबाईची कृपा होऊन येडाबाई थापन झाली आहे तर रविवारी रातभर गोधंळ आहे 9850274839

  3. Sundar mahiti ahe. Me pan
    Sundar mahiti ahe. Me pan gondhali samajacha ahe. . Maza contact no 9921957851. Maza jagran gondhalachi party ahe

  4. सुंदर माहिती या संभळ…
    सुंदर माहिती या संभळ वाद्याची ओढ मला अगदी लहानपणा पासुन आहे आता मी हे वाद्य शिकण्याचा प्रयत्न करतोय

  5. मला देखील खूप दिवसापासून…
    मला देखील खूप दिवसापासून संभळ हे वाद्य शिकायचे आहे.पुण्यात कोणी संभळ शिकवणारे असतील तर कृपया त्यांचा संपर्क क्रमांक मिळावा ही विनंती.

Comments are closed.