वाखर

0
39
पालखी आणि भोई

वाखर: पंढरपूर जवळ असलेले एक खेडेगाव. तिथे सर्व महाराष्ट्रातल्या पालख्या एकत्र जमतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीला पहिला मान असतो. वाखरीला प्रचंड रिंगण होते.

हैबतबाबा आरफळकर: हे ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ भक्त होते. ते सरदार असले तरी अध्यात्माकडे वळले. ते आयुष्य ईश्वरचिंतनात घालवण्यासाठी आळंदीत आले आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे रोज भजन करू लागले. ते ज्या विशिष्ट क्रमाने अभंग म्हणत असत त्यातून आजची भजनमालिका तयार झाली. त्यांच्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात घालून नेत असत. पण त्यांनी त्या पालखीतून नेण्याची व्यवस्था केली. पालखीसाठी त्यावेळच्या औंधचे राजे पंतप्रतिनिधी त्यांच्याकडून हत्ती-घोडे मागवले. तसेच, त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे ह्यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी बैलगाडी, नैवेद्य वगैरेंसाठी सेवेकरी हा सारा लवाजमा मिळवला. त्यामुळे पालखी सोहळयाला वैभव प्राप्त झाले. हैबतबाबा लष्करातील अनुभवी असल्यामुळे त्यांनी वारी सोहळ्याला जी शिस्त घालून दिली ती आजही पाळली जाते.

संदर्भ :देखणे, रामचंद्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, पद्मगंध प्रकाशन, पृष्ठ 50

ह.भ.प. हरिभक्तपरायण बुवा :वैष्णव संप्रदायातील व्यक्ती, विशेषतः हरिनाम घेत संन्यस्त वृत्तीने फिरणारा भक्त (Ref. The New standard Dictionary, Vol.III, G. D. Khanolkar, p. 2469)2.संसाराचा त्याग करून, हरिनाम घेत, भिक्षा मागून यात्रा करत हिंडणारा माणूस

(संदर्भ :भिडे, विद्याधर वामन, मराठी भाषेचा सरस्वती कोश, भाग 2रा, प्रकाशक – शंकर नरहर जोशी, चित्रशाळा प्रेस, पुणे 1930)

वैकुंठवासी

हिंदू मृत व्यक्तीविषयी वैकुंठवासी, कैलासवासी असे लिहितात; कारण मृत्यूनंतर व्यक्ती कैलासाला किंवा वैकुंठाला गेली असे मानतात. मुस्लिम, ख्रिश्वन किंवा बौध्द मृतांविषयी पैगंबरवासी, ख्रिस्तवासी किंवा बुध्दवासी असा उल्लेख करतात, तो चूक आहे. कारण पैगंबर, ख्रिस्त किंवा बुद्ध ह्या व्यक्ती आहेत; कैलास-वैकुंठाप्रमाणे स्थाने नाहीत. जगाचा प्रलय झाल्यावर सर्व आत्म्यांचा निर्णय होईल असे मुस्लिम धर्मात मानले जाते. बौध्द धर्मामध्ये स्वर्ग-नरकाची कल्पना नसून आत्म्यांच्या निर्वाणास महत्त्व आहे. बौध्द धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. पण हिंदू धर्माने जेव्हा बुद्धाला विष्णूचा अवतार असल्याचे स्वीकारले तेव्हा गौतम बुद्धाचे पाचशे जन्म मानले गेले व त्यानुसार जातककथा रचल्या गेल्या.

इंग्रजीत ज्याप्रमाणे सर्व मृत व्यक्तींना LATE असे उपपद लावतात, तसे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर अकारण वाद निर्माण होतील.

वै :वैकुंठवासी. वैष्णव संप्रदायातील मृत व्यक्तीबद्दल हा शब्द वापरतात. पूर्वी कागदपत्रांत वै. किंवा वै. वा. असे लिहीत असत.

वै./कै./ब्र./ख्रि./बु./पै. सर्वसाधारण हिंदू मृत व्यक्तीचा उल्लेख मराठीत कै(लासवासी) असा करतात. हिंदीत स्वर्गीय (स्व.) असे लिहिले जात असले तरी मराठीत स्वर्गीयचा अर्थ सर्वश्रेष्ठ, अनुपमेय असा करत असल्यामुळे 'स्व' लिहिणे चुकीचे आहे. जी व्यक्ती हंस किंवा परमहंस ह्या अध्यात्मक्षेत्रातील सर्वोच्च पदाला पोचलेली असेल तर ती मृत्यूनंतर ब्रह्मीभूत (ब्र.) होते.

इतर धर्मांतील मृत व्यक्तींबद्दल असे लिहिले जाते.

ख्रिश्चन———–ख्रिस्तवासी,

बौध्द————-बुध्दवासी,

मुस्लिम———-पैगंबरवासी

शिवशक्ती :शिव म्हणजे पुरुष व शक्ती म्हणजे प्रकृती, प्रकृतीला अदिती, निसर्ग किंवा सकलजननी असेही म्हणतात. एकनाथां नी म्हटले आहे, 'तेवी शिवशक्ती विवंचा तुज मी' (एकनाथी भागवत 24.69)

भोई :पालख्या, मेणे, डोल्या इत्यादी वाहणार्‍यांची जात किंवा त्या जातीचा इसम. ह्याला गौरवाने भोईराज असे म्हणतात. भोयांप्रमाणे कहार किंवा कार हेदेखील पालखी-मेणे वाहतात.

भोईखाना :पालख्या, मेणे ठेवण्याची जागा.

भोईवाडा: पालखीवाहक जेथे राहतात तो शहराचा एक भाग

(संदर्भ:सरस्वती कोश व The New Standard Dictionary)

सुरेश पां. वाघे, संपर्क – 022-28752675

संदर्भ: वाघे, सुरेश पांडुरंग, संकल्पनाकोश, खण्ड पहिला, ग्रंथाली, मुंबई, 2010 पृ. 1-106 1-107

About Post Author