आरती - ओवाळणी


प्रज्वलित निरांजन, पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देव व गुरू यांना ओवाळण्याचा विधी व तसेच, त्यावेळी देवाच्या किंवा गुरूच्या स्तुतिपर गीत म्हटले जाते, त्याला आरती म्हणतात. अरात्रिक ह्या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द तयार झाला आहे. बंगाली भाषेत अरात्रिक हा शब्दच त्यासाठी रूढ आहे.

आरत्यांचे काही प्रकार आहेत. प्रमुख देवस्थानात प्रात:काळी काकडारती आणि रात्री शेजारती करतात. काकडा म्हणजे कापडाची जाड वात. काकड्याने केलेली ती काकडारती होय. पहाटपूर्व काळोखात काकडारतीने उजेड केला जात असावा.

संध्याकाळची आरती सूर्यास्त होता होता करतात. ऋषीकेशला गंगेच्या घाटावर अनुभवलेली संध्याकाळची आरती आठवली, तरी प्रसन्न वाटते. त्यावेळी घाटाच्या पाय-यांवर प्रज्वलीत केलेल्या अनेक दीपमाळा आणि दीपदान म्हणून पाण्यात सोडलेले दूरवर तरंगत जाणारे दिवे आणि बरोबर साग्रसंगीत आरतीचा घोष!

पूजोपचारात वेगवेगळ्या क्रियांच्या वेळी वेगवेगळ्या आरत्या, उदाहरणार्थ - नैवेद्यारती वगैरे, मोठमोठ्या मंदिरांमध्ये रात्री शेजारती करून, देवालयाच्या कार्यक्रमाची सांगता होऊन मग देवाला विश्रांती मिळते. (आरत्‍यांचे विविध प्रकार खाली नमूद केले आहेत.)

पूर्वी राजेमहाराजे, विजयी सेनापती व विद्वान पंडित यांनाही आरत्या ओवाळत. भुताखेतांची किंवा माणसांची दृष्ट बाधू नये म्हणून ही प्रथा निर्माण झाली. देवाच्या आरतीतही तोच हेतू असतो. मंगलकार्यांत वधू-वरांना, मुंजमुलालाही आरतीने ओवाळतात. वधू-वरांना ओवाळल्या जाणा-या आरतीला कुर्वंडी करणे असे म्हणतात.

दिवाळीच्या सणात पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. भाऊबीजे च्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. देवाची आरती पूजारी करतो व इतरांची आरती सुवासिनी स्त्रिया किंवा देवदासी करतात. कीर्तनकार कीर्तनाच्या अंती देवाची आरती गातात.   लिंगायत लोकांत पुरुषाचे प्रेत घरात असेपर्यंत त्याची पत्नी त्याच्या तोंडाभोवती आरती ओवाळते. त्याचा आत्मा भूतयोनीत प्रविष्ट होऊ नये म्हणून हा विधी असतो. अग्निमंथनाकरता अरणी सिध्द करण्यासाठी अग्निहोत्री जेव्हा अश्व घेऊन अश्वत्थाच्या फांद्या तोडतो तेव्हा आरती ओवाळून त्या अश्वत्थाला तो आपला कठोरपणा विसरायला सांगतो. याशिवाय नवीन विहीर खोदण्याच्या जागेवर शिवरात्री ला बिल्ववृक्षाभोवती, मुलाच्या बारशाच्या, वाढदिवसाच्या, उष्टावणाच्या दिवशी त्याला आरती ओवाळण्याची प्रथा आहे. मोठया कार्यंक्रमाची सुरूवातही दीपप्रज्वलनाने करतात. प्रमुख पाहुणे आरती ओवाळतात त्यामागे शुभेच्छा व्यक्त करण्याचा भाव असतो.

कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच आश्विन पौर्णिमेला आई आपल्या ज्येष्ठ अपत्याला चंद्राच्या साक्षीने ओवाळते आणि आपली सर्व अपत्ये चंद्रासारखीच कलेकलेने वाढत जावोत अशी इच्छा व्यक्त करते. ह्याला ‘जेष्ठ अपत्य निरांजन’ असे म्हणतात.

आरतीत सर्व प्रकारची शक्ती सामावलेली असते असा समज आहे. आरतीतले निरांजन ताम्हनातून पडले व त्याची ज्योत विझली तर घरातल्या कोणातरी माणसाचा मृत्यू ओढावतो अशी समजूत आहे. ही समजूत कायम असावी, ह्या कल्पनेभोवती फिरणारी दूरदर्शन मालिका एका चॅनेलवर खूप दिवस चालू होती. तसे झाले तर संभाव्य संकट निवारण्यासाठी दीपपतन शांती करतात. आपली संस्कृती दीप लावायला, दिवे ओवाळून प्रकाशाने जीवन आणि मन उजळून टाकायला सांगते, पण आजच्या काळात वाढदिवसाला ‘औक्षण’ करण्याऐवजी मेणबत्त्या विझवण्याची प्रथा रुढ होऊन गेली आहे. ह्या पाश्वात्य प्रथेवर सतत टीका होत असते. पण तिचे अनुकरण लोकांमध्ये अधिकाधिक प्रिय होत आहे.

मग दिवे लावावेत की विझवावेत?

- ज्योती शेट्ये

आरतीचे प्रकार

एकारती, एकार्तिक्य : नैवेद्यापूर्वी ओवाळली जाणारी आरती

औक्षण : आयुष्यवर्धनार्थ ओवाळण्यात येणारी आरती

कर्पूरारती : कापूर पेटवून केलेली आरती

काकडारती : पहाटे काकडा लावून केलेली आरती

कुरवंडी, कुर्वंडी : एका ताटात तेलाचे निरांजन किंवा लामणदिवा, हळदकुंकू, अक्षता, सुपारी इत्यादी वस्तू ठेवून देवकार्याच्या  वेळी केलेली आरती

धुपारत, धुपारती, धुपार्ती : देवाला ओवाळण्यासाठी धूप, दीप इत्यादी ठेवून केलेली आरती

पंचारती : पाच दिव्यांची आरती किंवा कापूर पेटवून देवास ओवाळणे (चौदा प्रकार)

चौदा वेळ आरती : चार वेळा चरणांस, दोनदा नाभीवरून, एकदा मुखावरून व सातदा सर्वांगावरून ओवाळणे

महारती, महार्तिक : नैवेद्यानंतर ओवाळली जाणारी आरती

शेजआरती, शेजारती : रात्री निजावयास जाण्यापूर्वी करायची देवाची आरती

धुपारत : धूप जाळण्याचे पात्र

- सुरेश पां. वाघे, संपर्क – 022-28752675

संदर्भ: वाघे, सुरेश पांडुरंग, संकल्पनाकोश, खण्ड पहिला, ग्रंथाली, मुंबई, 2010 पृ. 1-106 व 1-107

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.