'ग्रामोक्ती'


'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे त्यांनी वैदेही-गणेशव्याख्यानमाला व अन्य उपक्रम सुरू केले. त्यामधून 'ग्रामोक्ती' हा सुविचार संग्रह घडून आला. त्यामध्ये ग्रामस्थांनी संकलित केलेले निवड ७०१ सुविचार आहेत. येथे सादर केले आहेत ते त्यांपैकी निवडक सुविचार आणि पंचादेवी यांची भूमिका :

'ग्रामोक्ती'

संग्रह निर्माण कसा झाला?

माझ्या शासकीय सेवेच्या कालखंडात ग्रामीण जीवनाशी माझा जवळचा संबंध आला आणि ग्रामीण जीवनाविषयी आस्था निर्माण झाली. त्याची परिणती म्हणून मुळचा अंबेजोगाईचा रहिवासी असलेला मी सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील 'एकसळ' या छोट्याशा खेडेगावात स्थायिक झालो. मी व माझे सर्व कुटुंब 1992 पासून शेतात वस्ती करून राहात आहोत.

डॉ. शिवाजी पंचादेवीइंग्रजांच्या राजवटीत स्वातंत्र्यासाठी लढ्याचा एक प्रकार म्हणून 'प्रतिसरकार' (पत्री सरकार) स्थापन झाले. त्यामधील महान कार्यकर्ता आणि कार्यक्षम व्यक्ती कैलासवासी दादासाहेब साखवळकर ह्यांचे 'एकसळ' हे गाव.

मी खेड्यात स्थायिक झाल्यामुळे ग्रामीण जीवनाशी माझा संबंध आला. विज्ञानाच्या युगातही आपला खेडूत/शेतकरी ब-याच अंशी अनभिज्ञ आणि पारंपरिक प्रथांवर अवलंबून आहेत. एखादी व्यक्ती पदवीधर आहे हे सांगूनही न कळल्यामुळे 'पदवीधर' असला तरी ‘तो मॅट्रिक झाला आहे नव्हे? असा सवाल विचारला जातो. बी.एससी., बी.ए., बी.कॉम., या पदव्या माहीत नसल्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी चौदावीत, सतरावीत आहे असे सांगितल्यावर समजते! नाटक म्हणजे लोकनाट्यातील, एवढेच त्यांना माहीत. अनभिज्ञतेच्या किंवा प्रथा/परंपरेच्या बाबतीतली ही काही उदाहरणे वानगीदाखल उद्धृत केली आहेत.

'वैदेही-गणेशव्याख्यानमाले'करता व्याख्यानासाठी मुले मिळावी म्हणून जवळपासच्या गावांतील शाळा-महाविद्यालयांमधून त्या त्या संस्थांच्या प्रमुखांना विनंती केली जाते. वैदेही-गणेशव्याख्यानमालेची एक निमंत्रण पत्रिका २००३ साली पुण्याचे 'काका-हलवाई' यांना देण्यात आली. मी नको म्हणत असतानाही 'काका-हलवाई'चे मालक अविनाश गाडवे यांनी २५१ रुपये माझ्या खिशात कोंबले आणि वैदेही-गणेशव्याख्यानमालेला शुभेच्छा दिली. मी तडक ग्राहक पेठ गाठली व त्या पैशांतून वह्या, बॉलपेने खरेदी केली आणि २००३ सालच्या वैदेही-गणेशव्याख्यानमालेतील प्रत्येक व्याख्याता/व्याख्यातीस एक वही व एक बॉलपेन दिले. त्या वह्यांना नाव दिले होते, 'काका-हलवाई सुविचार रोजनिशी', वहीमध्ये प्रत्येकाने रोज सुविचार लिहायचे आणि वही लिहून झाली की लगेच आम्हास परत करायची असे आवाहन केले होते. साहजिकच, सुविचार लिहिलेल्या वह्या आम्हाला, २००४ मध्ये जून-जुलै महिन्यापासून परत मिळणे सुरू झाले. सुंदर, उद्बोधक आणि विचारपूर्वक लिहिलेले सुविचार वाचल्यावर कुणीही प्रभावित होईल! म्हणून निवडक सातशे, सुविचारांचा 'ग्रामोक्ती' (काका हलवाई सुविचार सप्तशती) या नावाचा एक सुविचार ग्रंथ छापून मान्यवरांच्या हस्ते त्या ग्रंथाचे विमोचन करण्याचे आम्ही पंचादेवी कुटुंबीयांनी ठरवले. या संकल्पाचे सुतोवाच आम्ही दादासाहेब साखवळकर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य मारुती भिकू भोसले यांच्यापुढे केले तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले, की ग्रंथाच्या छपाईपासून ते प्रकाशनापर्यंतचे सर्व प्रायोजकत्व दादासाहेब साखवळकर सहकारी पतसंस्था स्वीकारील!

घरच्या कामाचे, शेतीच्या कामाचे, घरातील गुरांच्या कामाचे व शाळा-कॉलेज या सर्वांमुळे तणावग्रस्त असलेल्या आमच्या छोट्या छोट्या मुलामुलींनी, शेतक-यांनी, वेळात वेळ काढून सुविचार लिहिले आहेत. त्या सातशे निवडकांतले आणखी निवडक येथे वागनीदाखल सादर केले आहेत.

- डॉ. शिवाजी मधुसूदन पंचादेवी

 

शंकर बाबुराव भोसले

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 15/6/1922

शैक्षणिक अर्हता : 7 वी

व्यवसाय : शेतकरी

 

मानवास त्याचे भवितव्य ठरवण्याचा हक्क भगवंताने बुध्दिरूपाने दिला आहे.

कर्म कोणतेही असो, चिकाटीने करावे. कारण यश चिकाटीला चिकटलेले असते.

'पैसा म्हणजे सर्व सुखाचे आगर' ही कल्पनाच खोटी आहे. कारण पैसा कितीही देऊ केला तरी कणभरही सुख मिळणार नाही.

शाश्वत सुखाचा शोध माणसाला स्वत:च्या अंतरंगात घ्यावा लागतो व तेथेच प्राप्त देखील होतो.

 

फिरदोश सिकंदर मुलाणी

पत्ता - मु.पो. शिरंबे

जन्मदिनांक : 10/12/1989

शैक्षणिक अर्हता : 9 वी

व्यवसाय : शिकतो

 

माणूस जन्म घेतो पण माणुसकी निर्माण करावी लागते.

इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे.

जो विचार करत नाही तो काहीही बोलतो, पण विचारवंत खूप कमी बोलतो.

समाजात सौख्य धारण करण्याचे अतुल सामर्थ्य फक्त शहाणपणात असते. म्हणून शहाणपणाचा अभाव हा अधर्म तर शहाणपणाचा प्रभाव हा धर्म होय.

जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे.

परमेश्वर एक पायरी खाली उतरला की तो झाला माणूस; माणूस एक पायरी खाली उतरला की तो झाला पशू.

मानव प्राणी हा विलक्षण आहे. त्याला मुंगीसारखा लहान प्राणी निर्माण करता येत नाही; पण तो देव निर्माण करू शकतो.

 

कु. पूनम पोपट आगम

पत्ता : मु.पो. शिरंबे

जन्मदिनांक : 10/12/1989

शैक्षणिक अर्हता : 9 वी

व्यवसाय : शिकते

 

भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका; वर्तमानकाळ हाच खरा शाश्वत आहे; त्यावर मन केंद्रित करा.

आपल्या कार्याविषयी समाधानकारक असे एखाद्याला जेव्हा काहीच सांगता येत नाही तेव्हा तो दुस-यांची निंदा करून त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग करतो.

कला ही भूतकाळाची कन्या व भविष्यकाळाची माता असते.

कीर्ती नदीप्रमाणे उगमस्थानी अत्यंत अरुंद असते, परंतु दूरवर गेल्यावर अती विशाल होते.

 

कु. माधुरी जयवंत भोसले

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 14/7/1985

शैक्षणिक अर्हता : डी.एड. प्रथम वर्ष

व्यवसाय : शिकते (रत्नागिरी)

 

भविष्यकाळ आणि कर्तव्याचे फळ, दोन्ही ईश्वराचे आहेत. म्हणून फक्त कर्तव्य करत राहा.

दुस-यांचे आपल्याबरोबर चांगले वागावे असे वाटत असेल तर आधी स्वत:
दुस-याबरोबर तसे वागावे.

अपेक्षाभंगांचे दु:ख पचवणे सोपे नसते. अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर जगणे सोपे जाते.

 

शंकर भिकू भोसले

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 16/11/1970

शैक्षणिक अर्हता : बी.ए.

व्यवसाय : पतसंस्थेत नोकरी

 

स्वातंत्र्याचे नियम जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हाच तुम्ही स्वत:ला स्वतंत्र म्हणू शकाल.

मान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रथम तो देणे होय.

समाधानासारखे औषध नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात.

काठया व दगड फारतर हाडे मोडतील. पण शब्द मात्र नाती तोडतात.

 

कु. अनुजा अरुण जाधव

पत्ता : मु.पो. शिरंबे

जन्मदिनांक : 15/6/1991

शैक्षणिक अर्हता : 8 वी

व्यवसाय : शिकते

 

मृत्यूची भीती टाकून दिली की काळजी व अस्वस्थता सावलीलाही उभी राहत नाहीत.

ठेच दोन कारणांनी लागते. एक म्हणजे मुळीच न पाहिल्याने व दोन, फार दूरवर पाहिल्याने.

 

पांडुरंग (सुनील) चंद्रकांत भोसले

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 22/7/1982

शैक्षणिक अर्हता : लॉ. प्रथम वर्ष

व्यवसाय : शिकतो व सुटीच्या दिवशी शेती करतो.

 

विचाराचे हत्यार नीटपणे हाताळता येणे यालाच म्हणायचे शिक्षण.

लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा ते तसे का बोलतात याचा विचार करावा.

सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर विजयश्रीही घेऊन येतो.

केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.

 

सोमनाथ भानुदास सुतार

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 3/7/1986

शैक्षणिक अर्हता : 10 वी

व्यवसाय : सुतारकाम करतो

 

अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्मतात व सायंकाळी नष्ट होतात.

सर्वांचा विचार होणे म्हणजेच लोकशाही.

मोठ्या वयात वाचन करून माणूस विद्वान बनू शकतो, पण लहान वयातील संस्कारक्षम मन उत्तमोत्तम पुस्तकांच्या वाचनातून विकसित होते.

 

कु. वर्षा महादेव भोसले

पत्ता : मु.पो. शिरंबे

जन्मदिनांक : 14/1/1991

शैक्षणिक अर्हता : 8 वी

व्यवसाय : शिकते

 

जगात नवीन असे काहीच नसते. असलेल्याचे फक्त स्थित्यंतर होत असते.

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुस-यांच्या दु:खाची जाणीव होय.

मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे श्रेष्ठ होय.

 

सचिन गोरख भोसले

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 11/6/1981

शैक्षणिक अर्हता : एम.ए. करत आहे बाहेरून

व्यवसाय : शेती व गुरे

 

तुम्ही तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष केलेत तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरविल.

उकाड्याने दूध नासते तसे क्रोधाने स्नेह नासतो.

लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतल्यास पाय उघडे पडतात.

सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे. परंतु सज्जन माणूस म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई आहे.

 

कु. सोनल श्रीरंग शेडगे

पत्ता : मु.पो. शिरंबे

जन्मदिनांक : 5/7/1989

शैक्षणिक अर्हता : 10 वी

व्यवसाय : शिकते

 

आळस ही आत्महत्याच होय!

अविरत उद्योग हा शांतिसमाधानाचा अखंड झराच होय.

 

हणमंत रामचंद्र रसाळ

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 1/6/1968

शैक्षणिक अर्हता : 12वी

व्यवसाय : पोस्टात नोकरी व शेती

 

नीटनेटकेपणाने सौंदर्यदृष्टी येते. त्यामुळे व्यक्ती जीवनात रस घ्यायला शिकते आणि जीवन नीरस न वाटता रसास्वाद घेण्याची क्षमता वाढते.


वैदेही विजयकुमार पंचादेवी

पत्ता : मु.पो. एकसळ

जन्मदिनांक : 16/6/2000

(वैदेहीने व्याख्यान केले होते. परंतु ती अजून शाळेत जात नसल्याने तिच्या वहीत तिचे वडील श्री.विजयकुमार पंचादेवी (शेतकरी) यांनी सुविचार लिहिले आहेत.)

 

कोंबड्या माणसांपेक्षा शहाण्या असतात. त्या अयोग्य गोष्टी पायाने मागे सारतात व चांगले असेल ते खातात.

एखादी गोष्ट सातत्याने व निष्ठेने करत राहणे यालाच तपश्चर्या म्हणतात.

चिमुकली मेणबत्ती भोवतालचा अंधार घालवते, त्याप्रमाणे सत्कृत्य जगात प्रभाव पाडत असते.

आयुष्य हे वाहते असते. ते खर्च करण्यातच कला आहे, वाचवण्यात नाही.

ढग समुद्राचे खारट पाणी पितो; पण वृष्टी मात्र गोड पाण्याची करतो. त्याप्रमाणे सज्जन माणूस दुस-याचे अप्रिय शब्द ऐकूनही स्वत: मात्र चांगले बोलतो.

व्यक्तीचे खरे मूल्यांकन स्थैर्यकाळात ती कशी राहते त्यापेक्षा ती संकटकाळात कशी वागते यावर अवलंबून असते.

ज्या जगात मी आलो ते जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करून जाईन अशी जिद्द हवी.

माणूस देव नाही पण तो देवासारखा होऊ शकतो.

 

- डॉ. शिवाजी मधुसूदन पंचादेवी

(सेवानिवृत्त पशुवैद्य)

एकसळ, जि. सातारा

भ्रमणध्वनी - 9665261490, 9665261488

 

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.