अनंत भालेराव - लोकनेता संपादक


_anant_bhalerav_loneta_sanpadak‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार वापरत, जी उदाहरणे देत, परंपरेने घडवलेले आणि विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले जे शब्द उपयोगात आणत, तेच सगळे अनंतराव यांच्या शैलीचा भाग झाले होते. अनंतराव यांनी त्यांचे लिखाण ललित व्हावे, रंजक व्हावे अशा उद्देशाने कधी लिहिले नाही. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे आशयाबरोबरच भाषेबद्दल आणि शैलीबद्दलसुद्धा खरे आहे. सहज आणि सोपे मराठी लिहिणारे गद्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांना ओळख आहे. बाबासाहेब हैदराबादला एकदा आले असताना, ‘मराठवाडा साहित्य परिषदे’च्या त्या वेळी इसामिया बाजारात असलेल्या कार्यालयात अनौपचारिक भेटीसाठी आले. अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. अनंतराव त्या बैठकीला परिषदेचे कार्यकर्ते आणि ‘मराठवाड्या’चे सहसंपादक या दोन्ही नात्यांनी उपस्थित होते. अनंतराव यांनी ‘आपल्या या चर्चेचा वृत्तांत प्रसिद्ध केला तर चालेल काय’ असा प्रश्न आंबेडकर परत जाण्यास निघाले असता त्यांना विचारला. आंबेडकर क्षणभर स्तब्ध राहिले आणि नंतर म्हणाले, “वृत्तांत लिहून तू मला अगोदर दाखव व मी मान्य केल्यावर तो प्रसिद्ध कर.’ अनंतराव यांनी तो थोड्याशा धास्तावलेल्या अवस्थेतच लिहिला. अनंतराव तो आंबेडकर यांना दाखवण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेले. आंबेडकर यांनी तो वाचला. थोडेसे आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले, ‘चांगला लिहिला आहेस. तुझे मराठी लेखनही चांगले आहे. जसाच्या तसा छापून टाक.’ बाबासाहेबांनी तरुण अनंतराव यांना ‘तुझे मराठी लेखन चांगले आहे’ हे दिलेले प्रमाणपत्र फार महत्त्वाचे होते. आंबेडकर यांना निजामी राजवटीत वाढलेला एक तरुण उत्तम मराठी लिहितो याचे थोडे आश्चर्य वाटले असावे. अनंतराव यांच्या लेखनशैलीबद्दल त्यांचे निकट स्नेही भगवंतराव देशमुख यांनी लिहिलेली आठवण बोलकी आहे. “अनंतराव यांच्या लेखनाला पक्की वैचारिक बैठक होती. भाषेवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. शिवाय सारे लेखन साधे, सरळ, सहजगम्य असे. ते अनाकलनीय गुंतागुंतीचे असे सहसा लिहीत नसत. मात्र त्यांनी ती सहजता कमावलेली होती. ते अनेकदा म्हणत, ‘मी ज्या सर्वसामान्य माणसांत वावरलो, त्यांनी माझ्या भाषेला बळ दिले आहे.’ ते त्यांच्या भाषेबद्दल जागरूक असत. एखादा शब्द नेमका अर्थ व्यक्त करतो की नाही, याचा संशय आला, की ते मित्रमंडळीत तो बोलून दाखवत आणि चर्चा करत.... त्यांनी ‘आता शब्द वापरला आहे, तर राहू द्या’ अशी त्या शब्दाची (आणि स्वतःचीही) गय कधी केली नाही.”

सुधीर रसाळ यांनी ‘मांदियाळी’ची प्रस्तावना लिहिताना भालेराव यांच्या भाषेबद्दलच्या काटेकोरपणाबद्दल एक आठवण सांगितली आहे. “त्यांच्या लेखनाला एखाद्या वारकरी निरूपणासारखा आकार मिळत असे. त्यात वाचकाला विश्वासात घेऊन केलेले नैतिक, भावनिक आवाहन असे. त्यांना अग्रलेखात शब्दाचा सैल, अनमानधपक्याचा वापर अजिबात चालत नसे. ते एखाद्या शब्दाच्या अर्थाबद्दल किंवा त्यातील व्यंजनेबद्दल जेव्हा ते साशंक होत, तेव्हा ते लेखन थांबवत. मग भगवंत देशमुख यांना फोन जाई. त्या शब्दाच्या अर्थाबद्दल, अर्थच्छटांबद्दल, व्युत्पत्तीबद्दल आणि त्याच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल फोनवर चर्चा होई. अनंतराव यांचे एरवी छुपे असलेले संस्कृत पांडित्य तशा वेळी लकाकून चमके, ते त्यांचे पूर्ण समाधान झाल्यावर शब्दनिश्चिती करत आणि मग लेखन पुढे चालू होई.” 

अनंतराव यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नाव ‘मांदियाळी’ असे आहे. ‘मांदियाळी’ हा शब्द ज्ञानेश्वरीतील आहे. ‘मांदियाळी’ म्हणजे मेळावा. अनंतराव यांच्या भावजीवनात आरंभीच्या काळात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होती. अनंतराव यांनी वारकरी संप्रदायात ज्यांनी धर्म हा व्यक्तिजीवनाला शुद्ध ठेवण्याचा मार्ग हा त्याचा खरा अर्थ जाणला, तशा अनेक वारकऱ्यांची शब्दचित्रे रेखाटली आहेत. अनंतराव यांनी त्यांची चित्रे रेखाटता रेखाटता स्वतःचेही चित्र अभावितपणे रेखाटले आहे. वारकऱ्यांचा जीवनक्रम, त्यांची निर्लोभी वृत्ती यांबरोबरच त्यांच्या मुखातून सतत बाहेर पडणाऱ्या संतवचनांचा परिणाम अनंतराव यांच्या मनावर खोलवर झालेला आहे. काशिनाथबुवांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी अनंतराव यांच्या गळ्यात वीणा अडकावू पाहणारे सावताबुवा, संतवाङ्मयाचे भरपूर वाचन आणि चिंतन असलेले व अनंतराव यांनी चांगले _mandiyali_varkari_anant_bhaleravनिरूपणकार व्हावे म्हणून त्यांना जबरदस्तीने निरूपणासाठी उभे करणारे मास्तर, बेढब शरीराचा पण मृदंगवादनाच्या त्याच्या कौशल्याने भल्याभल्यांना खिळवून ठेवणारा रायरंदाचा गजानन, दिंदवाड्याचे ऐलाजी पाटील आणि एका क्षणात सगळ्या सांसारिक वैभवातून बाजूला सरकून विरक्त झालेले विठ्ठलकाका... अशी सगळी ही ‘मांदियाळी’ आहे. अनंतराव यांच्या भावजीवनात तर त्यांचे स्थान आहेच; पण त्यांच्या भाषेतसुद्धा वारकरी संस्कार खोल शिरलेला आहे. म्हणूनच त्यांच्या लेखनात आणि विशेषतः शीर्षकात संतवचने आणि त्यांचे अंश वारंवार येतात. त्यावेळी अनंतराव यांचे ‘मराठवाड्या’त सहकारी असलेले एक सहसंपादक अरविंद ग. वैद्य (छोटे) यांनी मला एक आठवण सांगितली. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, एकदा औरंगाबादला त्यांनी मराठवाड्यासाठी करण्याच्या गोष्टींचे ‘पॅकेज’ जाहीर केले. अंतुले यांनी अगदी पत्रकार परिषदेतसुद्धा कोणी ऐनवेळेला एखाद्या गोष्टीची सूचना केली तर तीही करू असे भरघोस आश्वासन त्या दिवशी दिले. अनंतराव यांनी त्यांच्या त्या आश्वासनाबद्दल अग्रलेख लिहिला. त्याचे शीर्षक होते ‘कल्पवृक्षातळी गाठी बांधलिया झोळी’ ती ओळ संत तुकाराम यांच्या अभंगातील आहे. प्रत्यक्ष विठूनेच आम्हाला जन्माला घातले आहे, तेव्हा आम्ही मागून मागून काय मागणार? कल्पवृक्ष सर्व इच्छा पुरवत असताना, ते घेण्यासाठी गाठी बांधलेली फाटकी झोळी कशी पुरेशी होणार? अनंतराव यांच्या भाषेतील सूक्ष्म उपरोध सहज लक्षात येण्यासारखा आहे. त्या दिवशी झाले असे, की अंतुले यांनी तो अग्रलेख वाचला आणि त्यांनी खूश होऊन अनंतराव यांना सुभेदारी विश्रामगृहावर जेवणाचे निमंत्रण दिले. अर्थात अनंतराव गेले नाहीत. अनंतराव यांनी आणि त्यांच्या ‘मराठवाड्या’तील सहकाऱ्यांनी नंतरही एकदा अंतुले यांच्या देकाराला नकार दिला होता. अंतुले यांनी एकदा पत्रकारांना सुटकेसेस वाटण्याचे ठरवले. अनंतराव यांनी स्वतः तर ती घेतलीच नाही, पण त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनीसुद्धा घेऊ नये, असा सल्ला त्यांना दिला. अनंतराव फक्त वारकऱ्यांची भाषा लिहीत नव्हते, तर ते वारकऱ्यांसारखेच निर्लोभीही होते. 

पत्रकार मंडळींना सत्तेत असलेल्या किंवा सत्तेत जाऊ इच्छिणाऱ्या पुढाऱ्यांचे एक प्रकारचे आकर्षण असते. कधी, तो त्यांच्या व्यावसायिक गरजेचा भाग असतो, तर काही वेळा, त्याचाच मोह पडू लागतो. अनंतराव यांना राजकारणातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांबद्दल तसे आकर्षण अजिबात नव्हते. ते स्वतःहून नेते मंडळींना भेटण्याची धडपड कधी करत नव्हते. दिगंबरराव बिंदू काही दिवस हैदराबाद राज्याचे गृहमंत्री होते. तो काळ आणि बिंदू यांचे साधेपण असे होते, की तेव्हा सत्तापदाभोवती वलयच नव्हते! नंतर यशवंतराव आले. ते अनंतराव यांना ओळखत; पण एकमेकांच्या भेटी फारशा होत नव्हत्या, पत्रकाराला सत्तेवर असलेल्या नेत्याचे मूल्यमापनसुद्धा कठोर आणि तटस्थ करावे लागते. अनंतराव ते निर्भीडपणे करत असत. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अनंतराव यांनी लिहिले आहे, “यशवंतरावांनी जातीयतेचा वापर राजकारणासाठी केला; पण ते जातीयवादी होते असे माझे मत कधीच नव्हते. उलट, त्यांची दृष्टी कोणत्याही अव्वल दर्ज्याच्या भारतीय नेत्याइतकीच व्यापक होती. सुदैवाने त्यांच्या या राजकीय व्यक्तिमत्त्वाला व्यापक चिंतनाची, रसज्ञतेची, गुणग्राहकतेची व विवेकी शालीनतेची जोड मिळाली होती. त्यामुळे टिळकांच्या नंतर त्यांच्याइतका मोठा दुसरा नेता महाराष्ट्रात झालेला नाही, असेच माझे मत आहे. ते संकटाच्या प्रसंगी संघर्षाला तयार असणारे विरोधी नेते म्हणून मात्र टिकू शकले नाहीत. यशवंतराव कायम सत्तेमध्ये राहिले. त्यांच्यातील संघर्षाची ताकद सत्तेमुळेच कमी कमी होत गेली.” 

_marathwadaयशवंतराव यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले वसंतराव नाईक आणि शरद पवार हे दोघेही अनंतराव यांच्याविषयी आदर बाळगत. राजकारणात त्यांचे ऐकत असे मात्र नाही, परंतु व्यक्तिगत स्नेह कायम असे. वसंतराव नाईक सुभेदारी विश्रामगृहावर आले म्हणजे मी आता विश्रांती घेतो असे सांगून इतरांची बोळवण करत आणि ‘सुभेदारी’तून लवाजमा न घेताच अनंतराव यांच्या घरी येत व काही घरगुती गप्पा मारत. का कोणास ठाऊक, शंकरराव चव्हाण आणि अनंतराव यांचे मात्र फारसे सख्य कधी झाले नाही. दोघांनीही मराठवाड्याच्या हितासाठी एकाच पद्धतीने विचार केला असता, तर पुष्कळ गोष्टी सुकर झाल्या असत्या. कदाचित त्यांचे वेगवेगळे स्वभाव आडवे आले असावेत. काही मित्रमंडळींनी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न एक-दोन वेळा केला; परंतु त्याचाही उपयोग फारसा झाला नाही. अनंतराव मायस्थेनियाने आजारी असल्याचे मी त्या काळात सांगितल्यानंतर ‘आपण त्यांना भेटू’ असे स्वतःहून शंकरराव म्हणाले व त्याप्रमाणे सन्मित्र कॉलनीत त्यांची भेटही झाली. 

अनंतराव यांना गोविंदभाई यांच्या अभ्यासवर्गात वाचलेल्या मार्क्सने एकदम प्रभावित केले नव्हते. पूर्वीचे, विद्यार्थिदशेत झालेले घरचे आणि वारकऱ्यांचे संस्कार पुष्कळ दिवस शिल्लक होते. खुद्द अनंतराव यांनीच सांगितले आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवावा लागतो. त्यांच्या मनोहर सोनदे या ‘मोठ्या बाराखडीतील मित्राचे एक व्यक्तिचित्र ‘कावड’मध्ये आहे. अनंतराव यांनी सेलूच्या शाळेत काम करतानासुद्धा आपण पुष्कळसे कर्मठ कसे होतो हे सांगितले आहे. ते सकाळ-संध्याकाळ संध्या करत. विष्णुसहस्रनाम म्हणत. एकदा, त्यांनी गीतेचे वर्गही काही दिवस घेतले. त्यांचा मित्र मात्र पक्का नास्तिक होता. नंतरच्या काळात अनंतरावही पूर्णपणे नास्तिक झाले; पण ती प्रक्रिया गोविंदभाई यांचे वर्ग, सत्याग्रहकाळात घडलेला तुरुंगवास, नंतर सेलूच्या शाळेत सहकाऱ्यांबरोबर झालेले वाचन आणि चर्चा या सर्वांमुळे हळूहळू घडत गेली होती. अनंतराव यांच्याभोवतीची वारकरी संप्रदायातील ईश्वनिष्ठांची मांदियाळी थोडी दूर गेली आणि त्यांच्याभोवती ईश्वराला न मानणाऱ्या, पण तेवढीच निष्ठा असणाऱ्यांची नवी मांदियाळी जमा झाली. गंमत अशी, की त्या मांदियाळीचे चित्रण करतानाही अनंतराव यांच्या भाषेतून संतवचनेच स्रवतात. बाबासाहेब परांजपे यांचे वर्णन करताना त्यांना ‘आम्हावरी सुदर्शन घरटी करी’ असे वचन आठवते. 

अनंतराव यांची भाषा मराठवाड्याच्या लोकजीवनाचे लेणे ल्यालेली आहे. इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांना अवमानित करण्यासाठी त्यांचे गृहखाते काढून घेतले आणि त्यांना अर्थखाते दिले, तेव्हा अनंतराव यांनी ‘बाईंच्या घरात ते आता चिल्लर मोजत बसले आहेत’ असे काहीसे लिहिले होते. काँग्रेस नेत्यांनी ‘आम्ही जनता पक्षाचा अश्वमेधाचा घोडा महाराष्ट्रात अडवणार’ अशी घोषणा केली, त्यावेळी अनंतराव यांनी ‘खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा कसा अडवणार?’ असा टोकदार प्रश्न विचारला. त्यांनी ‘पोटोबा वखवखता असेल तर लोकशाहीचा विठोबा विटेवर टिकणार कसा?’ असा प्रश्नही एकदा विचारला होता. 

अनंतराव यांनी संपादक म्हणून जे मृत्युलेख लिहिले आहेत, त्यात ज्यांची नोंद औपचारिकपणे घेणे आवश्यक असते अशांबद्दलचे फार थोडे आहेत. अनंतराव यांच्या शब्दकळेला ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळा होता त्यांच्याबद्दल लिहिताना बहर येतो. अनंतरावांनी लिहिलेले मृत्युलेख महत्त्वाचे असण्याचे आणखी एक कारण आहे. मराठवाड्यातील अनेक माणसांची आणि त्यांच्या कामांची ओळख मराठवाड्याबाहेरच्या पत्रकारांना नसते. बाबासाहेब परांजपे यांसारखा तरुणांना चेतवू शकणारा हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचा थोर नेता पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात किती लोकांना माहीत आहे? (तपस्वी बाबासाहेब परांजपे वेगळे) अनंतराव यांनी त्या त्या व्यक्तीच्या निधनानंतर लिहिले, म्हणून त्यांची नोंद तरी झाली. मी अनंतराव यांना एकदा गंमतीने म्हणालो होतो, की ‘समाजजीवनातील एखाद्या क्षेत्रात महत्त्वाचे काम केलेल्या; पण मराठवाड्यात जन्मलेल्या आणि राहिलेल्या व्यक्तीला जर त्याच्या कर्तृत्त्वाची योग्य दखल घेतली जावी असे वाटत असेल, तर त्याने तुमच्या अगोदर मरायला पाहिजे.’ अनंतरावांनी लिहिलेल्या मृत्युलेखांचे आणखी _ananat_bhalerawएक वैशिष्ट्य असे, की त्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात जो ओलावा असे - स्नेह किंवा भक्तिभाव, तो त्यांच्या लेखनातून प्रगट होई. नरहर कुरुंदकर यांचा मृत्यू तर औरंगाबादलाच झाला होता. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या कुरुंदकर यांच्या मृत्यूने अनंतराव यांना अक्षरशः हलवून टाकले होते. “मृत्यूही जीवन खुडण्यासाठी स्मरणीय क्षणच निवडत असतो. कुरुंदकर यांचे जीवनपुष्प असेच अकाली खुडले गेले. त्यांच्या जीवनाच्या सूर्याला जणू मध्यान्हच माहीत होती; अस्तमान त्याला ठाऊक नव्हता! जगातील बहुतेक बुद्धिमंतांनी सायंकाळ बघितलीच नाही. त्यांची जीवने प्रखर मध्यान्हाचा माथा चढवून तेथेच अंतर्धान पावली... कमलपुष्पाच्या पाकळ्या एकेक करून उमलत जाव्या आणि प्रकाशाला उन्मुख होऊन संपूर्ण पुष्प रेषेरेषेने प्रफुल्लित व्हावे अगदी तसे फुलणे चालू असतानाच कुरुंदकर यांची जीवनयात्रा संपली. एकाच व्यक्तीत अनेक नात्यांचे संमीलन व्हावे, तसे कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. हा दमदार सवंगडी, सुहृद चिंतक, अभ्यासक अर्ध्या वाटेवरूनच आपल्यातून जावा ही मन विदीर्ण करणारी घटना आहे. कदाचित असेही असेल की मृत्यूने इतक्या अप्रूप, संपन्न जीवनाचे जतन आपणच करू शकतो, या विश्वासानेही कुरुंदकर यांना उचलले असेल.” 

कुरुंदकर यांच्या मृत्यूने मराठवाड्यात जो दुःखावेग व्यक्त झाला, त्याचे नेमके कारणसुद्धा अनंतरावांनी नमूद केले आहे. “मराठवाड्यात अनेकांना असे वाटत आले आहे व वाटत राहील, की आपल्यातील जे काही उत्तम, उन्नत भव्य असेल त्याचे प्रतीक कुरुंदकर होते. मराठवाड्यात त्यांच्याविषयी लहानमोठ्यांच्या मनात भूषणाची, गौरवाची आणि अभिमानाची जी भावना आढळते तिच्यामागे तेच कारण होते. अनेक लोक कुरुंदकर यांच्यात त्यांचेच उन्नयन बघत होते.” 

जयप्रकाश नारायण यांचे निधन झाले त्यावेळी निर्माण झालेली राजकीय आणि भावनिक पोकळी अनंतराव यांनी व्यक्त केली आहे. “गांधी गेले तेव्हा इतके पोरके व एकाकी वाटले नव्हते. कारण देशात गांधी यांच्यानंतर बरीच मोठी माणसे होती. त्यात विशेषतः जयप्रकाशजी होते. आता तेच गेले आणि आत्यंतिक पोरके वाटू लागले. एवढा मोठा यात्रिक गेला. आपण पडलो केवळ वाटसरू. जेथे वाट सरेल तेथेच विराम. आपली वाट तरी किती मोठी, दोन पावलांनी व्यापली जाईल एवढीच. जयप्रकाशजी यांच्यासारखी माणसे सहस्र पावलांनी जीवनयात्रा क्रमत असतात व लाखो पावलांसाठी राजरस्ते निर्माण करत असतात. गेला, तो वाटाड्याच आज निघून गेला.” जयप्रकाशजी यांचा व्यक्तित्वविशेष सांगताना त्यांनी लिहिले, “सत्त्वगुणाला सगुण करण्याचे ठरले तर जयप्रकाशजी यांच्या रूपाचा आश्रय करावा लागेल. त्यांना क्रांतीचा ध्यास होता, परंतु त्यांची क्रांती गांधीजी यांच्या आदर्शाप्रमाणे निर्वैराचा हात धरूनच जाणारी होती. त्यांचे क्रांतिकारकत्व दाहक नव्हते. त्यांच्या क्रांतीला शीतल असे तेज होते. म्हणूनच त्यांना नंदादीपाची उपमा दिली आहे. नंदादीपाचा प्रकाश अंधारालाही सुसह्य वाटतो. तो प्रकाश फुलाच्या लोभस व मृदू स्पर्शाने अंधारात शिरतो आणि त्याला उजळून टाकतो. जयप्रकाशजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तो आगळा विशेष होता.” 

श्रीनिवासराव बोरीकर हे हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील निरलस आणि पूर्णपणे निःस्वार्थ कार्यकर्ते. त्यांनी संघटनेचे सगळे काम केले; पण कोणत्याच पदाची कधी अपेक्षा केली नाही. त्यांचा मोठा सहभाग मराठवाड्यात आणि विशेषतः परभणी जिल्ह्यात बहुजन समाजाला जागृत करून आंदोलनात सहभागी करून घेण्यात होता. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी प्रकृतीचे अस्वास्थ्य आणि आयुष्यभर बाळगलेले दारिद्र्य या दोघांची सोबत त्यांना होती. मृत्यूपूर्वी दोन दिवस रस्त्यावर फिरण्यास जात असताना बोरीकर आणि अनंतराव यांची गाठ पडली होती. तो सगळा संवाद अनंतरावांनी अग्रलेखात नेमका नोंदवला आहे. “हल्ली वाचताच येत नाही. एकेक अवयव निकामी होत चालला. मोठी गंमत वाटते, आपल्याच शरीराची ही निवृत्ती बघून. आपण ज्यांच्याकडून हयातभर भरपूर काम करून घेतले, ज्यांना आपण वाटेल तसे वापरले, तेच आता उलटले आहेत. हे पाय बघा, सुमारे चाळीस वर्षें मी भाड्याने आणल्याप्रमाणे वापरले. खेड्यापाड्यांतून रानोमाळ पिदाडून घेतले. आता काम करण्यास तयार नाहीत.” बोरीकर थोडा वेळ बोलून पुढे निघाले. अनंतरावांनी _pustak_bhaleravलिहिले आहे, “सुमारे पन्नास वर्षांचा मराठवाड्याचा इतिहास काठी टेकत चालला होता!” अनंतराव यांनी चळवळीतील त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांबद्दल जसे लिहिले, तसेच त्यांनी काशिनाथराव जाधव यांच्यासारख्या पुढे राजकारणात वेगळी वाट धरलेल्या एकेकाळच्या सहकाऱ्याबद्दलसुद्धा लिहिले. 

क्वचित एखाद्या मृत्युलेखात त्या माणसाच्या कार्याचे जसे स्मरण असे, तसेच त्याच्या उत्तुंग कर्तृत्वाचा सोयीस्कर विसर पडलेल्या जगाची निर्भत्सनाही असे. स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते, आचारानेच नव्हे तर वृत्तीनेही पूर्णपणे संन्यासी. त्यांचा हैदराबादच्या मुक्ततेबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतही सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी झालेल्या चव्हाण-हिरे संघर्षात स्वामीजी आणि त्यांचे सहकारी हिरे यांच्या बाजूने होते. त्यामुळे आणि नंतर राजकारणात सर्वत्र घुसलेल्या अपप्रवृत्तीमुळे स्वामीजी काँग्रेसच्या दृष्टीने नावडते झाले होते. त्यांची विरोधी पक्षांनाही फारशी बूज राहिलेली नव्हती. स्वामीजी यांचे हैदराबादेत 22 जानेवारी 1972 रोजी निधन झाले. स्वामीजी यांच्या भाग्याने त्यांचेच एक शिष्य पी.व्ही.नरसिंहराव तेव्हा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यामुळे स्वामीजी यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाले. त्या अंत्यसंस्काराला महाराष्ट्रातील एकही मंत्री हजर नव्हता. आपण ज्या महाराष्ट्राचे मंत्री आहोत, तो एकसंध महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी त्या संन्याशाने हातभार लावला आहे, याची त्यांना आठवणच नव्हती. स्वामीजी त्यांच्याबरोबरचे बरेच महत्त्वाचे सहकारी काँग्रेस पक्ष सोडून गेले असतानाही काँग्रेस पक्षात राहिले होते; पण त्या पक्षालाही स्वामीजी यांच्याबद्दल त्यांचे काही कर्तव्य आहे, याची जाणीव नव्हती. अनंतराव यांनी लिहिलेल्या ‘स्वामीजी, होय आम्ही कृतघ्न आहोत!’ या अग्रलेखात त्या उपेक्षेच्या दुःखापेक्षा चीडच व्यक्त झाली आहे. त्यांनी अतिशय कडक शब्दांत लिहिले आहे, “स्वामीजी तुम्ही एखाद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष असता, एखाद्या साखर कारखान्याचे संचालक असता किंवा सत्तेच्या रिंगणात असेच कोठे तरी असता, तर सरकारी अधिकारी झाडून तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले असते. त्या लोकांना हे प्रासंगिक तंत्र फार पाठ झाले आहे! एखादा सहकारमहर्षी मेला, की त्यांचे अष्टभाव जागृत होतात, डोळ्यांचे पाणी खंडत नाही. मृताच्या फोटोसमोर असे बसून राहतात, की जणू त्याचा सख्खा बापच मेला आहे! काय तो सुतकी चेहरा, काय ते रडण्याचे सोंग! स्वामीजी नावाचा एक मोठा पुढारी होता, त्याने निजामी सत्तेच्या विरुद्ध बंड केले. लोक संघटित केले आणि भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व आणले वगैरे गोष्टी त्यांना माहीतदेखील नसतील. त्यांना बिचाऱ्यांना दोष लावण्यात काय हशील? जे तुमच्या खांद्यावर चढून मोठे झाले तेच मस्तवाल आहेत. इतरांना काय बोलावे? थोडक्यात एवढेच, की स्वामीजी आम्ही सारेच एकजात कृतघ्न आहोत!” 

हे ही लेख वाचा -
वि.का. राजवाडे - विद्वान संशोधक (V.K. Rajwade - Researcher)
भारतीय कृषिअर्थशास्त्राचे प्रणेते पी.सी. पाटील
ऋणानुबंध मालतीबाई बेडेकर यांचा (Maltibai Bedekar)

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी मद्रास शहरातील उन्मळून पडलेल्या एका झाडाबद्दल एक मृत्युलेख लिहिला होता. अनंतराव यांच्या स्मरणात असलेल्या त्या लेखाचा आधार घेत अनंतरावांनी ‘बोलके झाड’ (10 जुलै 1978) या शीर्षकाचा ललित अग्रलेख लिहिला आहे. मद्रासमध्ये दीर्घकाळ जगलेल्या त्या झाडाला एक इतिहास होता. मागे एकदा उन्मळून पडलेले ते झाड त्यावेळच्या इंग्रज गव्हर्नरने परत लावून घेतले होते. एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात तसे तो गव्हर्नर त्या झाडाशी बोलत असे. मानवी जीवनाशी असलेले झाडांचे नाते सांगत सांगत अनंतरावांनी तीस-चाळीस वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या सीमेवर असलेली वृक्षराजी कशी निदर्यपणे नष्ट करण्यात आली ते मांडून, आपला परिसर नयनरम्य करण्यासाठी सरकारी हकूमशाहीच कशाकरता आवश्यक समजावी असा प्रश्न विचारला आहे (त्या काळी वृक्षारोपण हा संजय गांधी यांच्या कार्यक्रमाचा भाग होता). सरकारला एवढे स्थान मिळत गेले, तर हनीमूनसाठीसुद्धा सरकारचा जीआर निघावा लागेल, असे त्यांनी उपहासाने विचारले आहे. 

मराठवाड्यात त्यावेळी उद्योगधंदे तर अजिबात नव्हते; पण पाणभरती जमीन किंवा डेअरीसारखे शेतीपूरक उद्योगसुद्धा अपवादानेच अस्तित्वात होते. शेतकऱ्यांचेच नव्हे तर सर्वच मराठवाड्याचे आर्थिक जीवन कोरडवाहू शेती पिकण्यावर अवलंबून असे. अनंतरावही शेतीवर अवलंबून असण्याची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी खरे ग्रामीण जीवन विविध निमित्तांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. मराठवाड्यात त्या काळी सिंचनाखाली असलेली जमीन फार थोडी होती व बहुतेक शेती कोरडवाहू होती. जर पाऊस वेळेवर पडला नाही, तर शेतकरी संकटात असे; पण मराठवाड्याचे एकूण जीवन शेतीवर अवलंबून असल्याने तेही मरगळून जाई. एखाद्या वर्षी मृग वेळेवर व भरपूर पडला तर ‘मृगाने बहार केली’सारखा अग्रलेख अनंतराव यांच्या लेखणीतून बाहेर पडे. त्यांना ‘पुढच्या पेरण्याची काळजी’ असले विषयसुद्धा अग्रलेखासाठी आवश्यक वाटत. अनंतराव यांनी शेतीतील अडचणींचा सर्व दृष्टीने विचार केलेला असे. गुदस्ता शेजारच्या राज्यात दुष्काळ नव्हता, म्हणून तेथून आपल्याला चारा मागवता आला. यंदा तेथेही दुष्काळ असल्यामुळे तसे करता येणार नाही व गुरांना वाचवणे हा फारच मोठा गंभीर प्रश्न होईल याची त्यांना जाणीव असे व ते त्या अडचणीची वाचकांना आठवण करून देत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत यंदा गव्हाचे पीक चांगले आले आहे. तेथे गव्हाची खळी झाल्यानंतर उरलेला कचरा गुरांसाठी उपयोगी पडू शकतो. तेथून चाराही आणता येऊ शकेल. अनंतराव यांनी सरकी, हुलगे, पेंड, तेलबियांचे पाचट या सगळ्यांचा पुरवठा झाला तर हे कठीण दोन महिनेही निघून जातील असा आशावाद व्यक्त केला आहे (२२ नोव्हेंबर १९७२). शेतीविषयक स्वतंत्र नियतकालिके नंतर निघाली, पण अनंतरावांचा ‘मराठवाडा’ शेती हा राजकारणाइतकाच महत्त्वाचा विषय आहे असे मानत असे. अनंतराव यांचे व ‘मराठवाड्या’चे प्रादेशिकत्व भौगोलिक अर्थाचेच नव्हते. ते त्या भूभागाच्या प्रश्नाविषयीच्या आस्थेतून जन्माला आलेले होते. 

शेतीप्रश्नाप्रमाणेच अनंतराव यांना महत्त्वाचे वाटत असे आणखी दोन प्रश्न म्हणजे दलित समाजावर होणारे अन्याय आणि मुस्लिमांची धर्मांधतेकडे सुरू असलेली वाटचाल. अनंतराव हिंदुत्ववादी कधीच नव्हते. त्यांची घडण संतवाङ्मयाच्या वाचिक आणि बौद्धिक सान्निध्यात झाली असली, तरी त्याचा मनाला विशाल करणारा संस्कार त्यांच्या मनावर झाला होता. अनंतराव यांना मुस्लिमांना बरोबरीचे स्थान आणि समान हक्क हे मान्य होते. गांधीजी यांच्या मार्गदर्शनाने चाललेला हैदराबादचा मुक्तिलढा हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष होता. राजा आणि जुलूम करणारे अधिकारी मुस्लिम आणि भरडली जाणारी जनता हिंदू अशी विभागणी असतानाही, लढ्याला मुस्लिमविरोधाचे वळण कधीही लागू देण्यात आले नव्हते; परंतु अनंतराव यांनी इतरांबरोबर निजामी राजवटीत जातीयवादी प्रचाराने सामान्य मुस्लिम कसा भडकू शकतो आणि त्याला कसे बहकावले जाऊ शकते याचा अनुभव घेतला होता. त्यामुळे त्यांची मुस्लिमांबद्दलची भूमिका पुस्तकी धर्मनिरपेक्षतेपुरती मर्यादित नव्हती. तिला वास्तवाच्या आकलनाची बाजूही होती. त्यामुळे ती इतर समाजवाद्यांपेक्षा अधिक रोखठोक आणि अधिक स्पष्ट असे. हमीद दलवाई यांच्यासारख्या विचारवंताला म्हणूनच अनंतराव यांच्याबद्दल विशेष आस्था होती. अनंतराव यांना त्यांचे शिक्षण निजामी राजवटीतच झाल्यामुळे उर्दू उत्तम येत होते. _sepiyaत्यामुळे त्यांना उर्दू वृत्तपत्रांत आणि पुस्तकांत काय प्रसिद्ध होत आहे, मुस्लिम मंडळींच्या मनात काय चालले आहे, याची व्यवस्थित जाणीव असे. सरकारने आठवीच्या अभ्यासक्रमाला जे इतिहासाचे पुस्तक तयार करून लावले होते त्यात महंमद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग आहे असा आरडाओरडा काही मुस्लिम मौलवींनी केला. अनंतराव यांनी संपादकाला शोभणाऱ्या जिज्ञासेने तो वाद निर्माण झाल्यानंतर त्याच अभ्यासक्रमाचे उर्दू माध्यमाचे पुस्तक मिळवून वाचले. त्यात तर असंख्य चुका होत्या. तुकाराम भागवतधर्माचे मेंबर होते यांसारखी विनोदी वाक्यरचनाही त्यात होती. त्यांनी त्या पुस्तकावर एक स्वतंत्र लेख लिहिला. तो ‘मराठवाड्या’बरोबरच ‘महाराष्ट्र टाइम्स’नेही प्रकाशित केला. त्यावेळी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. विधिमंडळात तो प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारला ते पुस्तक रद्द करावे लागले. अकारण वाद निर्माण करावे आणि त्याद्वारे आपल्या लोकप्रियतेत भर घालावी हे जातीयवाद्यांचे धोरणच असते. माजलगाव येथे सिंदफणा नदीवर एक धरण आज उभे आहे. त्याचे काम सुरू झाल्याबरोबर तेथील एक दर्गा किंवा तत्सम वास्तू पाण्यात जाईल म्हणून त्या धरणाचे काम थांबवावे अशी मागणी काही उचापत्यांनी केली. पुढे इसाक जामखानवाला या काही काळ मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याने मध्यस्थी केली आणि तो वाद मिटला. अनंतराव यांना या पद्धतीने वाद मिटवणे पसंत नव्हते. त्यांनी ‘सरकार कोणाचे? पवारांचे की मुल्ला-मौलवींचे?’ असा परखड अग्रलेख लिहिला. सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष एस.एम.जोशी असतानाही त्यांनी सरकारच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली होती. 

- नरेंद्र चपळगावकर 9623088880
nana_judge@yahoo.com
(‘साधना'वरून उद्धृत संपादित-संस्कारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.