साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस कोरिया (Father Francis Correa)


sahityik_francis_koriaमोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे धर्मगुरू म्हणून वसईत गेल्या बावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून ते त्यांच्या नावापुढे मोन्सी असे लिहितात. तो कोणाही धर्मगुरूसाठी मोठा बहुमान आहे! मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर बत्तीस पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’, ‘मधाच्या घागरी’; तसेच, त्यांनी वसई किल्ल्यांतून नेलेल्या व आता हिंदू तीर्थक्षेत्री असलेल्या अडतीस घंटांचा शोध नऊ जिल्ह्यांत जाऊन लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या ‘बायबलमधील स्त्रिया’ आणि ‘महंतांच्या सहवासात’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ते ‘सुवार्ता’ या मासिकाचे सहसंपादक म्हणून काम करत आहेत.

फादर फ्रान्सिस कोरिया यांचा जन्म, सतपाळ येथे नंदाखाल नावाच्या गावात झाला. त्यांच्या सात भावंडांत फादर हुशार होते. त्यांच्या घरी गरिबी होती, परंतु त्यांची हुशारी पाहून त्यांच्यानंतरच्या दोन भावांनी स्वतःचे शिक्षण थांबवले, पण फ्रान्सिस कोरिया यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांची लहानपणापासून आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहण्याची वृत्ती होती. त्यांना लहानपणापासून अमूक एक असे का, तसे का असे प्रश्न पडत असत. त्यांच्याकडे प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाणारी चिकित्सक वृत्तीही होती. त्यांना जुन्या रूढी-परंपरेच्या गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांची त्याविरूद्ध बंड थोपटण्याचीही तयारी असायची. त्यांच्या बहिणीचे लहान वयात लग्न ठरले. तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातच त्या रूढीविरूद्ध बंड पुकारले. त्यांनी त्यांच्या हुशार बहिणीनेही शिकले पाहिजे ह्या वेडापायी तिच्या लग्नात मोडता घातला! त्यांचा तो स्वभाव वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. त्यांच्या मते, माणसाने नेहमी नवीन व चांगल्या विचारांसाठी तयार असले पाहिजे. फादर कोरिया यांच्यावर शाळेत असताना त्यांच्या शाळेतील फादर यांचा प्रभाव पडला. तेव्हा त्यांनीही पुढे जाऊन फादरच होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दहावी झाल्यानंतर धर्मगुरू होण्यासाठी दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात साहित्याचे अक्षरपर्व सुरू झाले.

ते म्हणतात, पुस्तके म्हणजे माझ्या आयुष्याची खिडकी आहे. मला त्या खिडकीतून माझ्या जीवनाकडे पाहणे आवडते. लेखक पुस्तक घडवतो, पण बायबल हे लेखकांना घडवते.

ते त्यांच्या धर्मगुरू म्हणून जीवनाच्या तयारीसाठी कॉलेजचा अभ्यास करत असताना त्यांच्या वाचनात वि.स. खांडेकर यांची ‘अश्रू’ नावाची कादंबरी आली. त्यातील शंकर या शिक्षकाने त्यांच्या मनात कायमचे घर केले. त्या पाठोपाठ त्यांनी खांडेकर यांच्या अनेक कादंबऱ्या नजरेखालून घातल्या. त्या त्यांना फार आवडल्या. त्यात त्यांना ‘उल्का’, ‘हिरवा चाफा’, ‘पांढरे ढग’ या कादंबऱ्या विशेष भावल्या. त्यांना त्यांच्या लेखनावर खांडेकर यांच्या काव्यमय चिंतनपर लेखन शैलीची छाप पडली आहे असे वाटते. ते जुहू मुंबई येथून 1972 च्या उन्हाळी सुट्टीत रखरखत्या उन्हात स्कुटर घेऊन खांडेकर यांच्या शोधात तळकोकणात जाऊन पोचले. त्यांना वाटले, की ते शिरोडा ट्युटोरियल स्कुलमध्ये अद्यापही शिकवत असतील. परंतु त्यांना ते तेथून निवृत्त होऊन कोल्हापूर येथे गेले असे समजले. मग कोरिया यांनी थेट कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ गाठले. खांडेकर यांना एक कॅथलिक धर्मगुरु त्यांच्या शोधार्थ त्यांना धुंडाळत गावोगावी फिरतो याचे आश्चर्य वाटले. कोरिया हे त्यांच्या घराच्या पायऱ्या चढत आहेत हे पाहून कोरिया यांनी त्यांना नमस्कार करण्याआधी त्या वयोवृद्ध साहित्यिकाने फादर कोरिया यांचेच पाय धरले! ती मनोज्ञ अशी आठवण कोरिया यांच्यापाशी आहे. कोरिया यांच्या अभ्यासिकेत वडिलांचा फोटो नाही, परंतु खांडेकर यांचा फोटो फ्रेम करून ठेवलेला आहे.
खांडेकरांनंतर त्यांच्या वाचनात आले ते प्रो. फडके, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे. तसेच, त्यांनी व.पु.काळे यांच्याही अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्यांना रंगनाथ पठारे यांची शोधक नजरेतून प्रसिद्ध झालेली पुस्तकेही आवडतात. त्यांना विनोदी साहित्य जास्त आवडते म्हणून पु.ल. देशपांडे या विनोदी लेखकाचे पुस्तक पाहिले, की त्यांचा हात सहज तेथे जातो.

हे ही लेख वाचा -
नजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका
मधु मंगेश कर्णिक : रिता न होणारा मधुघट

त्यांच्या गोरेगावच्या कॉलेजमध्ये मराठी क्लब होता. त्या क्लबमध्ये रोज संध्याकाळी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विषयावर निबंध लिहून आणत असे. तेथे फादर कोरिया यांच्या निबंधांना नेहमीच दाद मिळत असे. फादर कोरिया यांचे ते झपाटलेपण त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत पाहण्यास मिळते. त्यांनी दहा वर्षांच्या धर्मगुरूपदाचा खडतर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी त्या काळात बायबलबरोबर कुराण, गीता आदी धर्मग्रंथांचे वाचनही केले. त्यांना त्या अभ्यासक्रमात इंडियन, वेस्टर्न आणि मॉडर्न फिलॉसॉफी अभ्यासण्यास मिळाली. त्यांना तेथे मानसोपचार, नीतिशास्त्र हे विषयही शिकवले जात असत. त्यांनी शेवटच्या चार वर्षांत संपूर्ण ख्रिस्त धर्माचा अभ्यास केला. त्यांची पहिली नेमणूक वसईतील निर्मळ गावात प्रिंसिपल म्हणून करण्यात आली. त्याच दरम्यान, त्यांच्यावर ‘सुवार्ता’ या मासिकाची जबाबदारी आली. तेथून ते लिहिते झाले. त्यांनी नोकरी करून पदवीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून घेतले. त्यांनी समाजशास्त्र विषयात एम ए केले. त्यांनी बीएडची पदवीही घेतली. ते अध्यात्मावर बोलतात, तेव्हाही त्यात समाजभान डोकावते पण, ते समाजशास्त्राच्या अभ्यासाने असे ते म्हणतात. त्यांनी चर्चमधील शाळांमधून शिक्षणात जे प्रयोग केले जातात, त्यावर प्रकाश टाकणारे शिक्षण विचार’ नावाचे मासिक सुरू केले. त्याही मासिकाला जवळपास पंचेचाळीस वर्षें होत आली आहेत. त्यांनी त्या मासिकाची प्रेरणा पुण्यातील आनंद मासिकाकडून घेतल्याचे ते सांगतात. त्यांचा कटाक्ष कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करण्यावर असतो. काम अध्यात्माशी निगडित असेल वा समाज, संस्कृतीशी निगडीत असेल त्यासाठी वाटेल ते कष्ट सहन करण्याची त्यांची तयारी असते.

त्यांचे पहिले पुस्तक 72 साली प्रकाशित झाले- पद्मविभूषण व्हलेरिअन कार्डिनल ग्रेशस यांच्या जीवनावर आधारित - ‘भारताचे पहिले कार्डिनल’.

त्यांनी वसईच्या बारा गावांतील जवळपास चाळीस हजार ख्रिस्ती धर्मिय लोकांच्या मुलाखती घेऊन ‘सामवेदी बोलीभाषा’, ‘मधाच्या घागरी’ यांसारख्या लोकसाहित्याची निर्मिती केली आहे. त्यांचे गाजलेले आणखी एक पुस्तक म्हणजे ‘बायबलमधील स्त्रिया’. त्यात त्यांनी पहिल्यांदा बायबलमधील स्त्रियांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्या पुस्तकाला शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.

त्यांनी चर्चचे रूटीन काम करत असताना जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे सर्वसमावेशक तत्त्वज्ञान रूजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विविध ठिकाणची व्याख्याने असोत अथवा प्रबंधलेखन वा मासिकांतून केलेले लिखाण, त्या प्रत्येक ठिकाणी उदारमतवादी धोरण ठेवले. त्यांनी अध्यात्माला समाजभानाची जोड देत सर्वसमावेशक तत्त्वज्ञान रूजवले. काही धर्माधांमुळे विविध जातिधर्मात तेढ निर्माण केली जाते किंवा तेढ नकळतही निर्माण होते. कोरिया त्यावर भाष्य करताना अगदी सहज अशी काही उदाहरणे देतात, की समोरच्याच्या तोंडून ‘वा!’ आल्याशिवाय राहत नाही! उदाहरणार्थ, ते विविध धर्मांतील तेढीचे कारण समजावताना पिरॅमिडचे सुंदर उदाहरण देतात. “जोवर तुम्ही चिखलात असता, तोवर तुम्ही एकमेकांवर चिखलफेक करता. जेव्हा तुम्ही पिरॅमिड रचण्यास घेता तेव्हा तुम्हाला केवळ तुमची बाजू दिसते. _francis_koriaतुम्ही जसेजसे त्या पिरॅमिडच्या अंतिम टप्प्यात येता तेव्हा तुमच्यातील अंतर मिटत जाते.” त्याचाच अर्थ विचारांची प्रगल्भता माणसात जसजशी येते तसतसा तो एकमेकांच्या जाती-धर्माचा, संस्कृतीचा आदर करू लागतो. त्यांनी तशाच विचारांचे धन त्यांच्या विविध लेखनातून प्रकट केले आहे. त्यांच्या त्या लेखमालेचे तीन भाग प्रकाशित झाले आहेत - ‘अमृततुषार’, ‘मोरपिसी स्पर्श’ आणि ‘महंतांच्या सहवासात’. त्यांनी त्यात केवळ ख्रिश्चन धर्मशास्त्राचा विचार मांडलेला नाही तर त्यात इतरही धर्मांतील संत-महंतांच्या वचनांचा विचार आहे. ते बायबलमधील निवडक तीन-चार हजार ओव्यांचे मराठीत सुबोध भाषांतर करण्याचे काम सध्या करत आहेत.
दरम्यान, ते गुजराती शिकले; त्या भाषेतील कादंबऱ्या वाचू लागले, पण मराठी कादंबरीची जी वीण त्यांच्या मनात गुंफली गेली ती घट्ट राहिली आहे. ते इतिहासाचे विद्यार्थी नाहीत, पण ते इतिहासाच्या अभ्यासाकडेही वळले. त्यांनी चर्चच्या इतिहासाविषयी जवळजवळ पंधरा पुस्तके लिहिली आहेत.

त्यांचे ग्रंथालय दोन- तीन ठिकाणी आहे. तेथे पुस्तकांची बरीच कपाटे आहेत. मात्र पुस्तके शिस्तबद्ध लावलेली नाहीत. येणाराजाणारा प्रत्येक पाहुणा त्यांच्या सर्व ग्रंथांना व पुस्तकांना पसारा असे म्हणतो. पण त्या पसाऱ्यात काय पडले आहे हे त्यांना माहीत आहे.

-नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.