तुळजापुरची तुळजाभवानी (Tuljabhawani)

Think Maharashtra 03/10/2019

_tuljabhavani_tuljapurमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती तुकाई; धारेसुरी, अरूणिका, मीनाक्षी, जांबूवादिनी, महिषासुरमर्दिनी अशा नावांनीही परिचित आहे. तुळजाभवानीच्या प्राचीनतेविषयी 14 नोव्हेंबर 1398 चा एक शिलालेख आहे. तसेच, शके 1126 चा ताम्रपटही आहे. इतिहासाचा आधार पाहता तो चौथ्या शतकातील आहे. त्यातील आख्यायिका सर्वश्रुत आहे. कर्नाटकातील सेन कर्नाट आणि कदंब घराणे तुळजाभवानीशी निगडीत होते. स्कंद पुराणात तुळजाभवानी मातेचा निर्देश आलेला आहे. 

असुराचा अधिपती मातंगसूर उन्मत्त झाला होता. त्याने राजांना बंदीवान करणे, राजघराण्यातील महिलांना पळवणे, यज्ञात धुमाकूळ घालणे असे अनन्वित अत्याचार करून देवादिकांनाही भंडावून सोडले होते. त्यावेळी देवांच्या मदतीला धावून जाऊन देवीने, माजलेल्या मातंगसूराचा, तुंबळ युद्ध करून वध केला. म्हणून तिचे ‘मातंगीदेवी’ असेही रूप प्रकट झाले. तिच्या संबंधी आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. तुळजाभवानी ही मूळत: कुमारिका असून ती नगर निवासी येथील ‘जनकोजी भगत’ या गरीब तेल्याकडे अचानकपणे प्रकटली. त्याची आर्थिक स्थिती सुधारली. त्यानंतर एक दिवस प्रकटलेली बालिका अकस्मात गायब झाली. त्यानंतर ती निराश झालेल्या जनकोजीला पुन्हा भेटली. तेव्हा त्याने तिच्याकडे हट्ट धरला, की ‘तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस’ तेव्हा ती बालिका म्हणाली. ‘माझे मूळ ठिकाण तुळजापूर आहे. मला तेथे जावेच लागेल. येथील कार्यभाग संपला. मात्र तू आणलेल्या पालखीतून मी दसऱ्याला सीमोल्लंघन करीन’ तेव्हापासून ‘बुहानगर’ येथील पालखी नवरात्रातील महानवमीला तुळजापुरात नित्य येते आणि विजयादशमीला पहाटे तुळजाभवानीचे सीमोल्लंघन ‘जनकोजी भगताच्या' वंशजांनी आणलेल्या पालखीतून होते. ती परंपरा आजही चालू आहे. तिचे माहेर नगर, तर सासर तुळजापूर आहे असे मानतात. 

तुळजाभवानीची मूर्ती घट्ट गंडकी शिळेची आणि अती प्राचीन आहे. ती देवी अष्टभूजा असून ती महिषासूरमर्दिनीच्या रूपात आहे. तिच्या मुकुटावर शिवलिंग आहे. तिच्या उजव्या बाजूला सिंह असून डावीकडे तपस्विनी अनुभूती उलटे टांगून घेऊन तपःश्चर्या करत आहेत. विशेष म्हणजे त्या मूर्तीवर मार्कण्डेय ऋषी पुराण सांगत असलेली ‘कथा' कोरलेली आहे. तिचा उजवा पाय महिषासुरावर ठेवला आहे. तिच्या मस्तकी मोत्याचा तुरा आहे. भवानी मातेच्या डाव्या स्कंधाजवळ चंद्र आणि उजव्या स्कंधावर सूर्य आहे. तिच्या आठही हातात वेगवेगळी आयुधे आहेत. तिने डाव्या हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे. तर उजव्या हातातील त्रिशूल महिषासूराच्या बरगडीत खुपसला आहे. तिचे ते महिषासुरमर्दिनीचे महा तेजोमयी रूप पाहता-पाहता पाहणाऱ्याचे भान हरपून जाते! 

‘प्रसिध्द तुळजामाता | श्रीराम वरददायिनी। 
कुळासी पाळिले मुळी, आता आम्हासी पाळिते ।’ 

कुळाचे रक्षण करणारी तुळजाभवानी आई ही तिच्या भक्तांना अनेक साक्षात्कारी अनुभव देते. त्यांना सुख-शांती प्रदान करते. तुळजाभवानीचे तुळजापूर बालाघाट पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिराच्या ईशान्य दिशेला ‘मातंग देवीचे’ प्राचीन मंदिर आहे. मूर्तीसमोर भवानी शंकराचे दर्शन घडते. मंदिराचा पितळी दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. ते मंदिर राष्ट्रकूटकालीन असावे असे पुरातन पुरावे पाहता मानले जाते. 

त्या तुळजाभवानीच्या महाद्वारावर भगवतीमंदिर आहे. तेथून एक हजार फूट अंतरावर असलेल्या नाथपंथीय ‘गरीब नाथाच्या मठात हिंगुलांबिका’ देवीचा तांदळा आहे. गरीब नाथांनी तुळजाभवानीला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे देवीने ‘हिंगुलांबिका’ म्हणून तिचे रूप प्रकट केले अशी आख्यायिका सांगितली जाते. ‘हिंगुलांबिका’ देवीचे मंदिर पाकिस्तानच्या पंजाबमध्येही आहे. 

_tuljapur_mandirतुळजापुरातील धाकटया तुळजापूर भागात रामा विठोबा माळी याच्या शेतात ‘अल्लाउद्दिन शेख' हा एकदा नांगर चालवत असताना त्याचा फाळ एका शिळेला अडकल्याने तेथे खोदल्यावर एक मूर्ती सापडली. ती तीन फूट उंचीची आणि अडीच फूट रूंदीची होती. मूर्तीच्या उजवीकडे सूर्य आणि डावीकडे चंद्र असलेली, त्यावर एक शिलालेख असलेली, ती मूर्ती प्रेक्षणीय आहे. त्याशिवाय ‘यमादेवी’, देवीभोवतीचे ‘अष्टप्रधान मंडळ’, ‘टोळभैरव’, ‘काळभैरव’ इत्यादी उपमंदिरेही आहेत. देवीच्या होमकुंडाच्या पायथ्याशी ‘रक्तभैरव' व ‘त्रिशूल’ ही दोन मंदिरेही आहेत. मंदिरातील नगारा, घंटा, संबळ यांच्या निनादाने मंदिर भारून जाते. तिन्ही त्रिकाळ वाजणाऱ्या चौघड्याने परिसर स्पंदित होतो. तसा कल्लोळ तीर्थकुंडातील स्नानानेही होतो. 

तुळजापूरातील दक्षिणेकडील ‘पापनाशिनी इंद्रायणीदेवी व उत्तर बाजूची रामवरदायिनी’ आहे. रामवरदायिनी देवीची करंगुळी रामाला वर देणारी असल्याने तिला रामवरदायिनी म्हणतात. श्रीराम म्हणे ‘तू का आली। नाम लोकांचे ठायी । अद्यापी राहिलेसी पाठी । म्हणती ‘तुकाई' जगदंबा।।’ भारतीबुवा मठात देवीचे देऊळ आहे. देवी दररोज भारतीबुवा मठात सकाळी व सायंकाळी सोंगट्या खेळण्यासाठी जाते असे म्हणतात. त्या मठातून रोज तिला दोन्ही वेळी बोलवण्याची प्रथा आजही पाळली जाते. 

हे ही लेख वाचा - 
वणी येथील सप्तशृंगी देवी

माहुरगडची रेणुकादेवी
 

तुळजाभवानीची सिंहासनपूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. प्राचीन काळापासून सकाळी व सायंकाळी ती पूजा केली जाते. शिवाय तिची रोज सायंकाळी ‘प्रक्षाळ पूजा’पण असते. देवीचे सायंकाळचे अभिषेक पूजन झाल्यानंतर देवीसमोर विड्याच्या पानाचे (सुमारे दोन हजार विड्यांच्या पानांचे) घर लावतात. प्रक्षाळ पूजेच्या वेळी पंचखाद्याचा नैवेद्य दाखवतात. देवीची गाणी गातात. तुळजाभवानी मंदिरात हळदी-कुंकवाचा सडा घालतात, होमकुंडात हवन करतात. तिची नित्यनेमाने रोज विविध प्रकारे पूजा होते. तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव म्हणजे महापर्वणीच! महादुर्गाष्टमीला हवन-पूर्णाहुती होते. तुळजाभवानीच्या पूजाविधीचा प्रारंभ रोज पहाटे ‘ऊठ अंबे झोपी नको जाऊ।’ या गीताने होण्यापूर्वी सर्वप्रथम ‘चरणतीर्थ' विधी होतो, पहाटेची कवने गाणाऱ्यांची संख्याही कमी नसते. 

महंताने देवीचा दरवाजा उघडला, की देवीची ‘चरणपूजा’ करतात. पहाटेचा ताजा नैवेद्य दाखवतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होते. रात्री छबीना काढतात. तो संबळ, झांज पथकात, ‘उदो उदो’च्या गजरात! हातात पोत व गळ्यात कवड्यांची माळ घालून देवीभक्त त्या मिरवणुकीत सहभागी होतात. 

तुळजाभवानीच्या पूजाविधीत पोत ओवाळणे हा महत्त्वाचा विधी आहे. तो सायंकाळी सातनंतर करतात. त्यावेळी उदो उदो असा जयजयकार करतात. तुळजाभवानीच्या पारंपारिक नंदादीपापासून पोत प्रज्ज्वलित करतात. ते जागृत स्थानाचे प्रतीक मानतात. तुळजाभवानीची प्राचीन काळापासून ‘चोपदारकाठी’ धार्मिक कार्यक्रमात अग्रभागी असते. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वतंत्र चोपदारकाठी ही देवस्थानात आहे. 
तुळजाभवानीच्या त्या नवरात्रोत्सवात लाखो भक्तांचा उदंड उत्साह तिच्या पालखी सोहळ्यात तर शिगेला पोचतो. चल असलेली तुळजामातेची मूर्ती तशी वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरुन हलवली जाते. ती भाद्रपद वद्य अष्टमीला नवरात्रापूर्वी प्रथम हलवण्यात येते. अश्विन शुद्ध प्रतिपदेस पुन्हा ती सिंहासनारूढ होते. विजयादशमीला ती सीमोल्लंघन करून परतली, की विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ती मंचकी निद्रेत असते. तशीच ती पौष शुद्ध प्रतिपदेपासून पौष शुद्ध अष्टमीपर्यंत शयनगृहात निद्राधीन असते. ते तिचे आगळे वैशिष्ट्य होय. नवरात्रोत्सवांत भवानीमातेची दोन वेळा अभिषेक पूजा होते. नवरात्रीत भक्तमंडळी रात्री भजन भक्तिगीत आळवून जागर घालतात. तुळजापूरला नवरात्र नवमीला अहमदनगर जिल्ह्यातील बुहानगरहून देवीची पालखी आणि भिंगारहून पलंगपालखी येते. 

विजयादशमीला पहाटे बुहानगरच्या पालखीने तुळजाभवानी मंदिरात प्रवेश केला, की भवानीमातेच्या प्रतिमेला एकशेआठ नऊवारी साड्यांचे दिंड वेष्टन भक्त देतात, तर सीमोल्लंघन करून आल्यावर भवानीमाता भिंगारहून आलेल्या मंचावर निद्रा करतात ती अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत. त्या कालावधीत ज्या पालखीतून तुळजाभवानीची प्रदक्षिणा निघते. ती पालखी होममकुंडात जाळतात आणि तिचा दांडा घेऊन मानकरी परततात. तसेच, बुहानगरहून पालखी घेऊन येणारे तेली कुटुंबीय आणि भगत यांचे वंशज भवानीमातेच्या पलंगास त्यांच्या उजव्या हाताची करंगळी कापून, रक्ताचा टिळा लावून अंतरीचा भक्तिभाव व्यक्त करतात. 
_tuljabhavani_shivajimaharajनवरात्रोत्सव म्हणजे समाजात शक्तिगुणांची जोपासना व्हावी, भक्ति रंजनाद्वारे जीवनदिशा जनसामान्यांनाही मिळावी म्हणून साजरा होत असलेला महोत्सव, ‘भक्ति ज्ञानोत्सव’. म्हणून तर त्यात गोंधळ, भोंडला, गरबा-दांडिया, कथा, कीर्तन, भजन इत्यादी लोकजागर करणारे व रंजनातून उद्बोधन करणारे कार्यक्रमही साजरे होतात. 

प्रभात समयी पशुपक्षादी जग जागे होऊन कार्यरत होते. तसे, आदिशक्ती अंबेच्या चरणी अनन्यभावाने माथा टेकला, की नवचैतन्य उसळून येते. भक्तांना तिच्यातील सत्वलहरीचे कृपालेणे लाभते. ते तिच्या जागरातूनही ध्यानी येते. आईला त्या जागरातून जोगवाही मागितला जातो. 

परडी घेऊन तुझी ग अंबे । स्त्री शक्ति जागते । 
जोगवा मागते । आईचा जोगवा मागते ।।

आईकडे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी शक्तीची मागणी करणारा तो जागर आहे. कारण समाजात कोणत्याही काळी शुभ निशुंभ माजतात तेव्हा, त्यांचा शक्तिशस्त्रानेच नायनाट करावा लागतो. त्यासाठी म्हटले जाते.

पदोपदी शुंभ-निशुंभ । निर्दयी झाले बघ नभ । 
प्रेमाची कुठे ना ऊब । दे शक्ति दे तुझे खड्ग ।। 
येऊ दे तुला आता जाग ।।

अंबेला जागर असा घातला जातो. आई अंबाबाईला जोगवा मागितला जातो. महालक्ष्मी माते! तू समाजातील राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट कर, सद्भावाचे संवर्धन कर. ‘सर्वेत्रि सुखिनः संतु’ त्यासाठी हा जागर. स्त्री रुपातील ईश्वर म्हणजे महालक्ष्मी. तीच सर्व देवांची माता अदिती, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी. त्या त्रयस्वरुपी अंबेचीही पीठे व उपपीठे आहेत. त्यातील काही लक्षणीय पीठे मराठवाड्यात आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे पूर्णपीठ वा सप्तशृंगी येथील वणीचे अर्धपीठ अशा साडेतीन पीठांची उपपीठेही भारतभूमीने, भारतीय संस्कृतीने जपावीत तशी ती मराठवाड्याच्या मातीनेही जतन केली आहेत. उपासना, परंपरा यांचेही जतन केले आहे. 

देवीच्या नवरात्रात जोगवा मागताना, देवी भक्तांनी कामक्रोधाच्या चिंध्या फाडून त्याचे पोत करून ते पेटवावेत, ते घरोघरी फिरवावेत, त्यावर भक्ताने प्रेमरसाचे तेल टाकावे अशा उदात्तभावाचा तो जोगवा! हातात पोत, गळ्यात कवड्यांच्या माळा, कपड्यांवरही लावलेल्या कवड्या, कपाळाला भस्म, हातात परडी घेऊन मागितलेली भिक्षा म्हणजे जोगवा! प्रत्येक मंगळवारी काही ठिकाणी तसा जोगवा मागण्याची परंपराही आहे. 
महालक्ष्मी-महिमा गाताना कधी देवीभक्त अंबामातेला गोंधळाला बोलावतात, गोंधळगीतातून केलेल्या कथनातून लोकप्रबोधनही साधतात. ‘गोंधळी' हा अष्टपैलू कलावंत असतो. देवीचे स्थान कोणतेही असो, तो त्या देवीच्या नित्य-नैमित्तिक उत्सवांशी बांधलेला असतो. महाराष्ट्रातील दैवत व्यवस्था ध्यानी घेता प्रत्येक परिवाराचे, गावाचे कुलदैवत असते. त्या त्या ठिकाणचे देवीचे ‘ठाणे' हे कोणत्यातरी मूळ पीठाशी-माहूर, _tuljabhavaniतुळजापूर कोल्हापूर अशा स्थानांशी-संलग्न असते. ते गोंधळी त्यांच्याशीही संबंधित असतात. देवी महालक्ष्मीची आराधना व शक्तीची उपासना हा लोकांच्या कुळधर्माचा भाग असतो. गोंधळ गीतांत मूळ पीठांचा महिमा गातात. रात्री सुरू झालेल्या 'गोंधळ’ कार्यक्रमाची सांगता उषःकाली करतात. संबळ आणि तुणतुणे यांच्या तालावर गोंधळी अन्य साथीदारांसह गोंधळाची गद्य-पद्यात्मक कथा गीत-अभिनयासह सादर करतात. 

‘शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला हो । 
उदो बोला ! उदो बोला ! तुळजाभवानी माऊलीचा हो ।' 

असा उदो, उदो म्हणजे गोंधळ एकपात्री नाट्य प्रयोग - रंगत जातो.

नवरात्रोत्सवात भारूडांचे कार्यक्रम खूप रंगतात. संत एकनाथ महाराजांची भवानीमातेची ‘बया दार उघड’सारखी सोंगीभारूडे रंजनातून लोक प्रबोधनही करून जातात. ‘कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया । तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया ।। असे अज्ञ जनांसाठी अंबेला दार उघडण्यास सांगतात. तिचा उदो उदो म्हणत जयजयकार करतात. 

-संकलन

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.