केशवजी नाईक फाउंटन (Keshavji Naik Fountain)


_keshavji_nayik_fountant_1.jpgमुंबईतील मस्जिदच्या ‘केशवजी नाईक फाउंटन’ सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन ब्रिटीशकाळात 1876 साली झाले. ती बांधण्यामागील इतिहास थोडक्यात असा आहे - मुंबई पूर्व बंदरही विकसित झाल्यानंतर मालाची आयात-निर्यात करण्यासाठी किनाऱ्यालगत मोठमोठ्या वखारी बांधल्या गेल्या. वखारींचे साम्राज्य मस्जिद बंदर ते वडाळा स्टेशनपर्यंत पसरलेले आहे. त्या वखारी आजही कार्यरत आहेत. मुंबई शहरात बंदिस्त नलिकेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली होती, पण मुख्य शहरापर्यंत मोलमजुरीसाठी येणारा मजूर वर्ग उघड्या विहिरीतील अस्वच्छ पाणी पित असे. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत गेले, तेव्हा ब्रिटिश सरकारने अस्वच्छ विहिरी बंद करून त्या जागेत अथवा जवळपासच्या मुख्य चौरस्त्यावर पाणपोई किंवा फाउंटन बांधण्याचा निर्णय घेतला. धनिक लोकांना पाणपोई हे मोठे समाजकार्य वाटते. त्यास धार्मिक भावनेची जोड असतेच. परंतु ब्रिटिशांचा व काही स्थानिकांचा कल त्या इमारती दीर्घ काळ टिकाव्यात व त्या कलात्मक दृष्टिकोनातूनही बांधल्या जाव्यात, याकडे त्यांचा असे. दक्षिण मुंबईतील अनेक पाणपोया अनेक वर्षें दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांची अवस्था सध्या मात्र बिकट झाली आहे. एसएनडीटी आणि रुईया कॉलेज यांनी संयुक्तपणे 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील पन्नास पाणपोया किंवा फाउंटन्सची नोंद केली आहे. त्या नोंदीत, मस्जिद बंदर (पश्चिम) येथील भात बझार परिसरात मिरची गल्लीच्या मध्यावर असलेल्या केशवजी नाईक फाउंटनचा उल्लेख आहे.

फाउंटनचा आराखडा जागेच्या अभावामुळे अष्टकोनी आकारात बनवण्यात आला आहे. या जागेत एका वेळी चार व्यक्ती पाणी पिऊ शकतील, अशी व्यवस्था आहे. त्या छोटेखानी अष्टकोनी आकाराला उत्तर व पूर्व-पश्चिम भुजेवर दगडी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांची ठेवण दक्षिणोत्तर रहदारीनुसार आहे. कुंडांची रचना पशू-पक्ष्यांनाही सहजपणे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने केलेली असावी. तसेच किमान आकारातील जोत्यावरील भाग उंच दिसण्यासाठी सडपातळ आकारातील स्तंभ ठेवणीतील कल्पकता व वास्तुसौंदर्य खुलवण्यातील वास्तुविशारदाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.

अष्टकोनी वास्तूसाठी चार प्रकारचे नैसर्गिक दगड वापरले आहेत. त्यातील चार फूट उंच जोते व कुंडासाठी काळा बेसॉल्ट, अष्टकोनी भिंतींसाठी मालाड खाणीतील फिकट पिवळसर बेसॉल्ट व बारा स्तंभांतील रेड स्टोन (धोलपूर) आणि नक्षीदार कमान व बट्रेसेससाठी पोरबंदर येथील पिवळा चुनखडी दगड यांचा वापर केला आहे. सर्व स्तंभांचा अर्ध-व्यास भिंतीत दाबला आहे. त्यामुळे स्तंभ व भिंत हे फाउंटनचे वेगळे घटक वाटत नाहीत! जोत्यावरील रेड स्टोन स्तंभाचे तळखडे व कॅपिटलवरील कमळ फुलासमान दिसणाऱ्या उलटसुलट पाकळ्यांतील एकसलग लयबद्धता दर्शकाचे लक्ष खिळवून ठेवतात. स्तंभ व भिंत यांपासून बाहेर काढलेल्या पिवळ्या दगडातील कोरीव नक्षीदार बट्रेसेस आणि कमानी एकूण वास्तूची शोभा वाढवतात. डोमवजा दिसणारे छत हेमाडपंत शैलीत बांधले आहे. पाण्याची टाकी व घड्याळ यांच्या देखभालीसाठी छताच्या तळात पोकळी ठेवली आहे.

_keshavji_nayik_fountant_5.jpgइमारतीच्या उत्तर दिशेतील पायऱ्यांच्या पूर्व-पश्चिम कोनात दोन्ही बाजूंना दगडी कुंडे आहेत आणि तिसरे कुंड दक्षिण दिशेस आहे. त्यासाठी बेसॉल्ट दगड वापरला आहे. त्या कुंडात जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जात असे. त्या तिन्ही कुंडांत बंदिस्त नलिकेद्वारे पाणी-जोडणी केली आहे. कुंडाचा आकार सुंदर स्त्रीच्या डोळ्यांसारखा असून, कुंडाची वळणदार त्रिपदरी किनार आणि आतील घडण गुळगुळीत आहे. नागरिकांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था मध्यवर्ती जागेत आहे. त्या जागेत जाण्यासाठी ठेवलेल्या दगडी पायऱ्यांलगत घडीव कठडा व पूर्व-पश्चिम दिशेतील पायऱ्यांना जोडणाऱ्या मध्य जागेलगत वळणदार कठडे असून, दोन्ही बाजूंना सुबक कोरीव नक्षीकामातील बैठे नंदी आहेत. घोडागाडी लांबच्या प्रवासासाठी व बैलगाडी जड सामान वाहण्यासाठी हीच त्या काळात प्रमुख साधने होती. फाउंटनच्या जोत्यावरील तिन्ही दिशांना असलेली नंदीशिल्पे हे त्याचेच निदर्शक आहे! पशूंना पाण्याची आवश्यकता असते, या विचारातून आराखड्यात कुंड रचना समाविष्ट करण्यात आली आहे हे या फाउंटनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

इमारतीच्या पूर्वेकडील दगडी जोत्यावरील संगमरवरी फलकावर प्रमुख देणगीदार केशवजी नाईक यांचे नाव आणि इतर मजकूर कोरलेला आहे. केशवजी नाईक हे गुजराती व्यापारी प्रसिद्ध होते. त्यांची अर्धप्रतिमा फाउंडनच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या मध्यावर चपखलपणे बसवली आहे. फाउंटनचे लोकार्पण आठ जानेवारी 1876 रोजी मुंबईचे गव्हर्नर सर फिलीप एडमंड वुडहाउस यांच्या हस्ते झाले. बांधकामाचा खर्च तेवीस हजार रुपये झाल्याची नोंद आहे.

इमारतीच्या छपरावर उत्तर-दक्षिण दिशेस घड्याळ व पूर्व-पश्चिमेस वायुविजनासाठी घड्याळाच्या आकारातील गोलाकार खिडक्या बसवलेल्या आहेत. घड्याळाच्या देखभालीसाठी छताच्या तळभागातून जाण्याची सोय असावी. आकाशाच्या दिशेने निमुळत्या होत गेलेल्या दगडी छताच्या बाह्यपृष्ठ पटलाचा आधार घेऊन काही भाग हत्ती, मोर व फुल यांच्या आकारात सुशोभित करण्यात आला आहे. तो आकार व त्यावरील कलाकुसर मूळ वास्तूशी जुळत नाही. तो भाग नंतरच्या काळात जोडला गेला असावा.

_keshavji_nayik_fountant_2.jpgफाउंटनचे पुनरुज्जीवन आणि लोकार्पण 2015 मध्ये झाले. पुनरुज्जीवित वास्तूचे उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्याचा उल्लेख नवीन कोनशिलेतील माहितीत आहे. संवर्धन वास्तुविशारद राहुल चेंबूरकर यांनी या सौंदर्यपूर्ण पुरातन इमारतीचे पुनरुज्जीवन, केले आहे. मुंबई महापालिकेने त्या पुरातन इमारतीला ‘ग्रेड 2-A’चा दर्जा देऊन गौरवले आहे.

बैलगाड्यांतून केल्या जाणाऱ्या जड मालवाहतुकीची जागा आता तीन चाकी रिक्षावजा वाहनांनी घेतली आहे. फाउंटनच्या आजूबाजूस असलेल्या एकंदर गर्दीमुळे परिसरात एक चौरस फूटही जागा मोकळी दिसणे अवघड होते. सीलबंद बाटल्यांतून हवे तेव्हा हवे तेवढे पाणी आता उपलब्ध आहे, तरीही पाणपोईतील पाणी पिणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही अशी माहिती पाणीवाटप करणाऱ्या व्यक्तीने दिली.

फाउंटनभोवतालचा रस्ता सर्व प्रकारची वाहने व माणसे यांनी दिवसभर गजबजलेला असतो. एकेकाळी अवजड सामानाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची जागा आता रिक्षा व छोटे टेम्पो यांनी घेतली आहे. त्या रस्त्यावर तीस सेकंदांपेक्षा अधिक वेळ एका जागेवर उभे राहणे अशक्य आहे.

वास्तविक पाहता मूळ रचनेत घडीव दगडात बनवलेल्या कोनाड्यातून नलिकेद्वारे पाणी पिण्याची व्यवस्था असल्याचे दिसून येते. प्यायल्यानंतर उरलेल्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्याचा मार्ग बंदिस्त नलिकेदारे थेट तिन्ही कुंडांत नेऊन तेथे पाणी साठवण्याची सोय असावी. ते पाणी पशू-पक्ष्यांसाठी उपलब्ध व्हावे अशी रचना होती. त्या पूर्वापार पद्धतीला काटशह देऊन अर्ध्या उघड्या असलेल्या रांजणातील पाणी तांब्याच्या भांड्यातून दिले जाते. बहुतांश लोक अर्धेअधिक पाणी फेकून देतात. त्यामुळे, आजूबाजूची जागा सतत ओली व अस्वच्छ राहते. ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

वाहने चोरीस जाऊ नयेत, म्हणून नंदीच्या गळ्यात लोखंडी साखळी अडकावणे, तसेच, पुरातन इमारतीचे सीमांकन निश्चित करणारे काही घडीव दगड अस्ताव्यस्त पडल्याचे चित्र व्यथित करणारे आहे. किरकोळ वस्तूंची विक्री करणारे विक्रेते त्या दगडाचा व जागेचा वापर विविध प्रकारे करताना दिसतात.

_keshavji_nayik_fountant_3.jpgस्थानिक प्रशासनाने सार्वजनिक शौचालयाची इमारतदेखील त्याच पाणपोईजवळ बांधली आहे. गंमत म्हणजे मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणारा फलक तेथे लावलेला आहे. त्याखालील घाण दृश्य म्हणजे त्या फलकाचा विरोधाभासच होय. परिसरात शिस्तीचा अभाव आहे. एकेकाळी परिसराचे सौंदर्य खुलवणाऱ्या व सामाजिक गरजेची पूर्तता करणाऱ्या व उदात्त भावनेतून बांधलेल्या समाजोपयोगी इमारतीच्या परिसराचे वर्तमान रूप वाईट आहे. पुरातन वास्तूचे पुनरुज्जीवन झाले खरे; परंतु उद्देश साध्य झाला नाही. मग पुनरुज्जीवन करून नेमके काय साधले? वास्तूच्या पुनरुज्जीवनाबरोबर आजुबाजूच्या परिसराचे सौंदर्य अबाधित राखणे आवश्यक आहे.

- चंद्रशेखर बुरांडे, fifthwall123@gmail.com

(‘बाईट्स ऑफ इंडिया’वरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.