वागुर


_Vagur_1.jpgपारध्यांच्या शिकारीच्या साधनांमध्ये ‘वागुर’ या साधनाचा उल्लेख येतो. वागुर, वागुरा, वागोरा, वागोरे, वागोऱ्या हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून पक्ष्यांना पकडण्याचे जाळे, पाश, बंधन असे त्यांचे अर्थ दिलेले आढळले. ज्ञानेश्वरी वाचनातही एक-दोन ठिकाणी ‘वागुर’ शब्द दिसला. ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील

‘म्हणोनि संशयाहून थोर । आणिक नाहीं पाप घोर।
हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥२०३॥’

या ओवीत ‘वागुर’ हा शब्द पाश, जाळे या अर्थाने आलेला आहे. त्याचा अर्थ, ‘वागुर’ प्राकृत भाषेमध्ये शेकडो वर्षांपासून रूढ झालेला आहे, पण गंमत म्हणजे ‘गीर्वाणलघु’ कोशातही ‘वागुरा’ हा शब्द पाश, जाळे या अर्थानेच आढळला. वागुरिक: म्हणजे पारधी; तसेच, वागुरावृति: म्हणजेदेखील पारधी. ‘वाघाटी’ या वनस्पतीला संस्कृतमध्ये ‘वागुरा’ असे म्हणतात.

‘वागुर’ शब्द संस्कृत शब्दकोशात आढळला, त्यावरून तो प्राचीन काळापासून अस्तित्वात असला पाहिजे. पारध्यांसारख्या भटक्या जमातीच्या भाषेमध्ये संस्कृत शब्द वापरात आहेत, त्यावरून संस्कृत भाषा येथील सर्वसामान्यांच्या जीवनात किती खोलवर रूजली आहे  हे मला जाणवले आणि आश्चर्यही वाटले. पण नंतर थोडा विचार केल्यानंतर मला जाणवले, की ‘वागुरा’चा प्रवास संस्कृताकडून प्राकृताकडे असा नसून प्राकृताकडून संस्कृत असा असावा. त्याचे कारण मानव शेती करून स्थिर जीवन जगू लागला. हजारो वर्षे भटकंती करत पारध्याचे जीवन जगत होता.

नंतर शिकार हे त्याच्या उपजीविकेचे साधन होते. तो जाळे, चिकटा, अणकुचीदार दगडाची हत्यारे तो तेव्हापासून वापरत होता. शिवाय, तो समूहाने जगत होता आणि भाषेच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होता. त्याच्या रोजच्या जीवनाशी निगडित वस्तूंना, गोष्टींना, साधनांना त्याच्या भाषेत शब्द असणार ही गोष्ट स्वाभाविक आहे. ते शब्द परंपरेने रूढ झालेले असणार. ‘वागुर’ हा तसाच त्याच्या भाषेतील शब्द. तो जाळ्याला कोणता शब्द वापरू असे विचारण्यासाठी कोठल्या संस्कृत पंडिताकडे गेला नसणार. कारण त्यासाठी तो त्याच्या भाषेतील शब्द वापरतच असणार.

त्यामुळे ‘वागुर’ हा शब्द पारध्यांच्या भाषेत प्राचीन काळापासून रूढ झालेला असावा. तो प्राकृतातून संस्कृत भाषेत जसाच्या तसा शिरला असावा असे मला वाटते.

- उमेश करंबेळकर
(राजहंस ग्रंथवेध, सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.