वैराग्यवारी - परतवारी


_Vairagyavari_Paratvari_1.jpgपंढरपूरकडे जाणारी वारी ही ऐश्वर्यवारी असते. वारकऱ्यांची सोय गावोगावचे लोक, स्वयंसेवी संस्था, मंडळे करत असतात. दान देण्याची प्रवृत्ती त्या काळात दिसून येते. चहा, अल्पोपहार, फळफळावळे, उपवासाचे पदार्थ, पाणी यांचे वाटप सतत चालत असते. त्यामुळे वारीत श्रद्धाळू असतात तसे पोटार्थीही दिसून येतात. त्या दिंड्या परत कधी फिरतात? त्यांची व्यवस्था काय असते? परतीचा प्रवास किती दिवसांत होतो? किती लोक पालखीबरोबर असतात? या प्रश्नांची उत्तरे देणारे एक पुस्तक सुधीर महाबळ यांनी लिहिले असून ते पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे नावच ‘परतवारी’ असे आहे.

सुधीर महाबळ हे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर. उच्चशिक्षित असणारे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात- उद्योगविश्वात काम करणारे महाबळ यांनी एकदा आळंदी ते पंढरपूर पायी वारी केल्यावर त्यांना परतवारी करावीशी वाटली आणि त्यांनी ती 2005 पासून प्रतिवर्षी सुरू केली. महाबळ मुंबईत पार्ल्यासारख्या ठिकाणी राहतात. त्यांनी पहिल्यांदाच परतवारी केली तेव्हा मुंबईत पावसाने कहर मांडला होता. मुंबई जलमय झाली असताना, तुंबलेली असताना महाबळ परतवारी करत आळंदीला निघाले होते. संपर्क यंत्रणांनी मान टाकलेली असताना, कोणतीच फिकीर न करता पहाटे दोन वाजता उठून महाबळ परतवारीत पायी चालत होते. त्यावेळी न त्यांनी घरच्यांशी संपर्क केला न घरातील मंडळींनी त्यांना जलसंकटाची हाळी दिली. सुधीर महाबळ परतवारी करून मुंबईत पोचले तेव्हा त्यांना जलसंकटाची कल्पना आली.

महाबळ यांनी पायी वारी ही ऐश्वर्यवारी असते तर परतवारी ही वैराग्यवारी असते असे वर्णन केले आहे. पायवारीत हजारो, लाखो लोक सहभागी होतात, पण परतवारीत काही शेकडयांनीच लोक सहभागी होत असतात. आषाढीनंतरच्या तीन दिवसांनी गुरूपौर्णिमा असते. त्या दिवसापासून अवघ्या दहा दिवसांत परतवारी आळंदी-देहूला पोचते. म्हणजे परतवारीत एका दिवसात डबल अंतर चालावे लागते. दोनशेपस्तीस किलोमीटरचे अंतर दहा दिवसांत चालताना सासवडपर्यंतच्या प्रवासात सरासरी पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर अंतर होई. त्यांनी पुस्तकात वेळापत्रक दिले असून पंढरपूर ते वाखरी व हडपसर ते पुणे हे अंतर एकआकडी आहे. मात्र वाखरीपासून पुढे ते अंतर पंचवीस ते तीस किलोमीटरचे होते. नातेपुते ते फलटण हे अंतर अडतीस किलोमीटरचे आहे. त्यासाठी पहाटे दोन-सव्वादोन वाजता निघावे लागते. रात्रीचा अंधार, चंद्रप्रकाशाचा खेळ पाहत मजल-दरमजल करावी लागते. रस्त्याने कुत्र्यांचे आवाज, गाड्यांचे लाईट, पावसाच्या सरी किंवा पावसाचा मागमूसही नसतो. सारा प्रवास चार-दोन सोबत्यांसह करायचा असतो. सारी स्वयंसेवा असते. फक्त कल्याणहून आलेली मंडळी स्वयंस्फूर्तीने भोजनाची व्यवस्था सासवडपर्यंत करत असतात. ‘माऊली सेवा मंडळ, कल्याण’ या मंडळींनी सासवडपर्यंतच सेवा देण्याचे कारण असे, की पुढे परतवारी हडपसर, पुणे, आळंदी असा प्रवास करते. तो प्रवास शहरातून होतो आणि शहरात वारकऱ्यांचे आप्तस्वकीय असतात. लेखकाने ‘सखा आकाशाएवढा’ या प्रकरणात ती सेवा पुरवणारा सखाशेठ आणि त्याची गँग यांचा परिचय करून दिला आहे. सखा हा घरकाम करणारा, कमी शिक्षण झालेला माणूस. पण जिद्द, चिकाटी, सचोटी या गुणांनी बांधकाम व्यावसायिक झाला तो अपघाताने आणि त्याने स्वतः स्थिरस्थावर झाल्यावर पंढरीची वारी केली. पुढे, त्या माणसाने परतवारीत सहभागी होऊन वारकऱ्यांची पोटपूजा करण्याचे काम पुढाकार घेऊन सुरू केले. त्यांना सेवाभावी सहकारी मित्रांची मदत मिळाल्याने परतवारीतील वारकऱ्यांची पोटापाण्याची सोय झाली. परोपकारी मंडळी परतवारीत थोडी असतात. परत येणाऱ्या मंडळींना स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागते.

_Vairagyavari_Paratvari_2_0.jpgवारीत आणि परतवारीत इरसाल, बेरकी, नाना ढंगी, नाना रंगी माणसे भेटतात. व्यावसायिक स्पर्धेतून एखाद्या माळणीवर नजर ठेवणाराही असतो. स्त्री-पुरुषांमधील नैतिक-अनैतिक संबंधांचेही दर्शन वारीत आणि परतवारीत घडते. वाल्हे हे वाल्मिकी ऋषींचे गाव पण तेथे वाल्या कोळ्याची परंपरा चालवणारे भेटतात, त्याचे फार सुंदर वर्णन महाबळ यांनी केले आहे. परतवारीत चालणारा इमानी कुत्रा आणि माणूस यांतील फरक तरीही कळत जातो. शहरात वारकऱ्याकडे पाहण्याचा सुरक्षा रक्षकाचा दृष्टिकोन आणि भक्तिमार्गी वारकरी यांचेही चित्रण पुस्तकात केले आहे. वारीचा ‘इव्हेंट’ दृकमाध्यमातून घरोघरी पोचला असताना परतवारी मात्र अंधारात आहे. ‘न लगे मुक्ती धन संपदा’ म्हणणारा वारकरी देहावर तुळशीपत्र ठेवून, गळयात तुळशीमाळा घालून हरिनामाचा जप करत, अभंग, हरिपाठ, गौळणी, भारुडे म्हणत देहू-आळंदीला पोचतो. वारीचा अनुभव घेतला असेल, पाहिला असेल तर परतवारीचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक आस्तिकांनी आणि निरीश्वरवादी मंडळींनीही वाचायला हवे.

परतवारी - सुधीर महाबळ
मनोविकास प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती - मार्च 2017
पृष्ठे - 176
मूल्य - 199.00 रुपये

- शंकर बोऱ्हाडे
shankarborhade@gmail.com

लेखी अभिप्राय

छान!

रावसाहेब जाधव18/08/2018

उत्तम परिचय

रावसाहेब जाधव18/08/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.