अमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी


_AmericetZalak_1.jpgमराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.

त्यांनी ते न्यू जर्सीच्या ‘मराठी विश्व’ संस्थेचे अध्यक्ष असताना, दहा वर्षांपूर्वी ‘झलक’ नावाची नृत्यस्पर्धा सुरू केली. न्यू यॉर्क, न्यू जर्सी, पेनसिल्व्हानिया ह्या तीन राज्यांत काही भारतीय नृत्यशाळा आहेत. त्यांत कथ्थक, भरत नाट्यम व इतर खास भारतीय नृत्यप्रकार शिकवण्यात येतात. त्यांतील बहुतेक शाळा दक्षिण भारतीय लोक चालवतात. त्यात अर्चना जोगळेकर व माधवी देवस्थळे ह्या मराठी शिक्षकांच्या नृत्यशाळाही प्रसिद्ध आहेत. चौधरी यांनी त्या सगळ्यांना एकत्र आणून दरवर्षी नृत्यस्पर्धा करण्याचा स्तुत्य उपक्रम गेली अनेक वर्षें चालू ठेवला आहे. त्याला प्रतिसाद प्रचंड मिळतो. स्पर्धेत क्लासिकल, सेमी क्लासिकल असे दोन गट असतात. त्याशिवाय स्पर्धकांच्या वयोमानाप्रमाणे सहावी ते नववी, दहावी ते बारावी व सीनियर्स असे तीन गट असतात.  

चौधरी यांनी भारतीय वारसा व संस्कृती संस्था (Indian Heritage and Cultural Association) स्थापन करून एकांकिका स्पर्धा चार वर्षांपूर्वी सुरू केली. स्पर्धेचे नाव ‘नाट्यदर्पण’. अशोक चौधरी यांनी न्यू जर्सी शासनाचे अनुदान त्याकरता मिळवले. त्या उपक्रमात मराठी, बंगाली, हिंदी, गुजराती व इंग्लिश ह्या भाषांतील वेगळ्या धर्तीच्या आठ एकांकिका दाखवण्यात येतात. त्याकरता चौधरी, त्यांची पत्नी गौरी, कॉलेजमध्ये जाणारी त्यांची दोन मुले - देवव्रत अन् ईशा व खूप सारे स्वयंसेवक वर्षभर कष्ट करून, अनेक नाट्यसंस्थांना एकत्र आणतात. गेली अनेक वर्षें दरवर्षी पस्तीस-चाळीस हौशी नाट्यसंस्था त्यांच्या एंट्री पाठवतात. त्यांतील आठ निवडण्यात येतात. स्पर्धेत नवीन पिढीतील, अमेरिकेत वाढलेले कॉलेजमधील युवक-युवतीही भाग घेत असतात. नाटकातून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय तरुण पिढीची गुणवत्ता दिसते व मन थक्क होते! त्यांतील विषय इतके विविध व आश्चर्यजनक असतात, की त्यापुढे बॉलिवूडला लाज वाटावी! नाट्य महोत्सव स्थानिक दूरदर्शनवरही दाखवण्यात येतो. कार्यक्रमात नाट्यक्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. त्यात इतर भाषिक गुणी जनांचाही अंतर्भाव असतो.

भारतात व परदेशात साधारण अनुभव असा, की पंजाबी लोक राजकारणात, गुजराती उद्योगधंद्यात, दाक्षिणात्य तंत्रविद्येत व बंगाली साहित्यक्षेत्रात बाजी मारतात. आम्ही  मराठी माणसे मात्र सर्वत्र मागे पडतो! चौधरींनी त्या ‘ग्लास सिलिंग’चा भेद केला आहे व अमेरिकेत सांस्कृतिक क्षेत्रात मराठी माणसाचे प्रभुत्व स्थापन केले आहे.

अशोक चौधरी यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयातून ऑर्गनिक केमिस्ट्रीमध्ये एम. एस्सी पूर्ण केले. त्यांचे पीएच.डी.चे शिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद येथून पूर्ण झाले. त्यांनी पुढे पदव्युत्तर संशोधन स्टीव्हन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (होबोकेन, न्यू जर्सी) येथून पूर्ण केले. त्यांनी फायझर, मर्क या फार्माशुटिकल कंपन्यांत काम केले आणि सध्या ते सिमेन्समध्ये सीनिअर मॅनेजर म्हणून काम पाहतात.

त्यांचा अनेक ना नफा संस्थांत उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यांनी मराठी विश्व (न्यू जर्सी) संस्थेत बोर्ड मेंबर, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट अशी वेगवेगळी पदे भूषवली आहेत. सध्या ते ट्रस्टी आहेत. ते इंडियन हेरिटेज आणि कल्चरल असोसिएशन या ना नफा संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ते भारतीय कलेला वाव मिळावा म्हणून प्रयत्नशील असतात. ते नवव्या वर्षापासून लहान मुलांसाठीच्या ‘बालोद्यान’ या पुणे रेडिओवरील कार्यक्रमात सहभाग घेत. त्यांनी पुरुषोत्तम करंडक या पुणे येथील नाट्यस्पर्धेत भाग घेतला आहे.

गौरी यांचा जन्म वालचंदनगरमध्ये झाला. त्यांचे पदवीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण झाले.

त्या अकाउंट्स मॅनेजर आणि एचआर मॅनेजर या पदावर रेडिसन हॉटेल चेन (नेवार्क, न्यू जर्सी) येथे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा स्वत:चा व्यवसाय ‘गौरी डेकोर’ या नावाने सुरू केला आहे. त्या आकर्षक पद्धतीने डेकोरेशन करतात. अमेरिकेत एकशेपन्नासहून अधिक लग्नसोहळ्यांसाठी; तसेच, अरंगेत्रम, शास्त्रीय नृत्यस्पर्धा, ‘स्वीट सिक्स्टिन’ सेलिब्रेशन आणि शाळेतील नृत्यस्पर्धा यांसाठी काही वर्षांपासून ‘डेकोरेशन’ करतात.

- प्रकाश लोथे

prakashlothe@aol.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.