अधिक महिना


चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर चांद्रवर्षात एक महिना जास्त धरावा लागतो, त्याला अधिक महिना असे म्हणतात. त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. भारतात वैदिक काळापासून चांद्रमास आणि सौरमास यांनुसार कालगणनेचा प्रचार झालेला दिसून येतो. बारा महिन्यांची कालगणना वैदिक काळापासून आहे. सौर वर्षाचे सुमारे तीनशेपासष्ट दिवस असतात. चांद्रमासाचे दिवस मात्र साधारण तीनशेचौपन्नच येतात. त्यामुळे बारा चांद्रमासांचे एक वर्ष मानले तर हळूहळू काही दिवसांचा फरक पडू लागेल. तसे होऊ नये म्हणून बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर एक महिना अधिक धरावा लागतो. पण कोणता महिना अधिक धरायचा? शास्त्रकारांनी तो सुद्धा विचार केलेला आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक चांद्रमासात एक सौर संक्रांत होते. परंतु ज्या मासात अशी एकही संक्रांत येत नाही, जो चांद्रमास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिक महिना धरून त्याला त्याच्या पुढील महिन्याचे नाव दिले जाते. दोन महिन्यांतील फरक स्पष्ट दाखवण्यासाठी पुढील महिन्याला ‘निज’ म्हणजे नेहमीचा महिना म्हणतात. जसे 2018 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्याने पुढील महिना निज ज्येष्ठ ठरला व ज्येष्ठातील सगळे सणवार, तिथी निज महिन्यात गृहित धरतात. साधारणपणे चैत्र, ज्येष्ठ आणि श्रावण हे महिने दर बारा वर्षांनी, आषाढ अठरा वर्षांनी, भाद्रपद चोवीस वर्षांनी, आश्विन एकशेएकेचाळीस वर्षांनी व कार्तिक सातशे वर्षांनी अधिक महिना होतो. परंपरेप्रमाणे भाद्रपदापर्यंतचे महिने अधिक महिने म्हणून समजले जातात. ज्यावर्षी आश्विन अधिक येतो, त्यावर्षी पौष महिना क्षयमास होतो. त्या वेळी दोन प्रहर मार्गशीर्ष व दोन प्रहरांनंतर पौष महिना आहे असे मानून दोन्ही महिन्यांची धार्मिक कृते एकाच महिन्यात करण्याची पद्धत आहे. अशा जोड मासाला ‘संसर्प’ असे म्हणतात. क्षय मासाचा विचार कसा आला असावा? तर अधिक महिना धरूनही कालगणनेत काही दिवसांचा फरक पडतोच. तो ‘क्षय‘ मासाने पूर्ण केला जातो. कार्तिक, मार्गशीर्ष व पौष यांपैकी क्षयमास मानले जातात. 1822 नंतर 1963 मध्ये कार्तिक महिना, 1982-83 मध्ये पौष महिना क्षय होता.

भारतीय पंचांगात महिना, तिथी, नक्षत्र यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच अधिक महिन्याचेही आहे. त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. ती अशी - महर्षी व्यास आणि नारदमुनी यांच्या भेटीत मुनी म्हणाले, सर्व देव-देवता, मास, नक्षत्र, तिथी स्थानापन्न झाले, पण मलमास मात्र दु:खी आहे. त्याला सर्वजण धोंड्याचा महिना म्हणून चिडवत आहेत. म्हणून मी त्याला गोलोकी नेले. तेथे मुरलीधर पुरुषोतम ध्यानस्थ बसले होते. तुम्ही कशाचे चिंतन करत आहात असे मी त्यांना विचारताच, भगवान विष्णू म्हणाले,” नारदा, आता अधिक महिना येईल. त्या महिन्यात रवीचे संक्रमण नसल्याने मंगलकार्येही नसतात. त्यामुळे सर्वांचा सुखाचा मी विचार करत आहे.” त्यावर नारद म्हणाले, “प्रभो, माझ्याबरोबर हा अधिक महिनाच आला आहे. तो जरा दु:खी असल्याने त्याच्याकडेही पाहवे.” त्यामुळे भगवंतांनी लगेच अधिक महिन्याला वर दिला. भगवंत म्हणाले,” तुला मी माझा पुरुषोत्तम मास म्हणून गौरवतो. जे भक्त या महिन्यात तीर्थस्नान, अनुष्ठाने, दान, तप, व्रताचरण करतील त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. माझी कृपा त्यांच्यावर अखंड असेल.” आणि त्यानंतर अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला. त्या महिन्याची देवता पुरुषोत्तम म्हणजेच विष्णू मानली आहे.

बृहन्नारदीय पुराणात पुरषोत्तम मासाचे महात्म्य वर्णन केलेले आहे. त्याची स्वतंत्र पोथी असून तिचे वाचन अधिक महिन्यात करतात. त्या महिन्यात प्रामुख्याने श्रीमद्भागवताचे वाचन, श्रीविष्णूसहस्रनामाचे पठण करतात. दीपदान व अन्नदान यांना या महिन्यात विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात अधिकाचे वाण करण्याची प्रथा असून 30+3 अनारसे व दिवा यांचे वाण जावयाला देतात. मुलगी व जावई यांना लक्ष्मी-नारायण मानण्याच्या कल्पनेतून ही प्रथा रूढ झाली असावी. तेहेतीस असे म्हणण्याऐवजी तीस तीन असे बोली भाषेत म्हणण्याची पद्धत आहे. त्या महिन्यात तेहेतीस मेहुणे जेवण्यास बोलावण्याचीही पद्धत आहे. काही कुटुंबात त्या महिन्यात श्रीसत्यनारायण पूजा करतात. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राची आवर्तने करण्याचीही प्रथा आहे. आषाढ महिना अधिक आल्यास त्या महिन्याच्या पौर्णिमेस कोकिलाव्रताची सुरुवात करून श्रावण पौर्णिमेस समाप्ती करतात. कोकिलारूपी गौरी ही त्या व्रताची मुख्य देवता मानतात. हे व्रत प्रामुख्याने महिलांनी करण्याचे आहे.

अधिक महिन्यात देवप्रतिष्ठा, विवाह, उपनयन, गृहप्रवेश इत्यादी वर्ज्य सांगितली आहेत. त्या महिन्यात जन्म झालेल्या बाळाचा जन्ममास त्याचा शुद्ध म्हणजे निज महिना धरतात. तसेच, त्या महिन्यात निधन झालेल्यांचे श्राद्ध व महालय - पक्ष शुद्ध मासात त्या तिथीला करतात.

- स्मिता भागवत

smitabhagwat@me.com

(आधार - भारतीय संस्कृति कोश)

लेखी अभिप्राय

अधिक मास म्हणजे काय माहिती झाले. उत्सुकता होती ती अचानक पूर्ण झाली. धन्यवाद.

रामचंद्र गोडबोले 20/06/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.