बेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा


_Befat_Balya_Vasat_Limaye_1.jpgवसंत वसंत लिमये हा बेफाट ‘बाळ्या’ आहे! त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना केव्हा कशी उद्भवेल ते सांगता येत नाही. तो आयआयटीतून बीटेक झाला. त्याने त्याच्या इंजिनीयरिंगच्या शिक्षणाचे काम पुढे काही केले नाही; ट्रेकिंगचा ध्यास घेतला, मुलांना साहसप्रवण केले. मग तो स्कॉटलंडला जाऊन आऊटडोअर मॅनेजमेंटचे ट्रेनिंग घेऊन आला आणि त्याने तसे प्रशिक्षण देणारी अद्भुतरम्य ‘हाय प्लेसेस’ नावाची कंपनी निर्माण केली. तिला पंचवीस वर्षें होऊनदेखील गेली. भारतीय कसोटी क्रिकेटची टीम विराट कोहली, अजिंक्य राहणे, वगैरेंसह पुरा एक दिवस त्याच्या ‘गरुडमाची’ या प्रशिक्षणस्थळी वर्षापूर्वी राहून व गिरिभ्रमणाचे धडे घेऊन आली. वसंत आता जरी पोक्त व प्रौढ झाला असला (त्याने ती चाहूल व्यक्त करणारा लेख वर्तमानपत्रात लिहिलादेखील!), तरी सर्वांमुखी तो लहानपणीचा ‘बाळ्या’च असतो. तोही ते बालपण ‘एंजॉय’ करतो.

वसंतने हिमालय अनेक वेळा पालथा घातला आहे. त्याच्या बेफाटपणाला आरंभच मुळी कांचनगंगाच्या मोहिमेने झाला. ती मोहीम यशस्वी ठरली नाही, परंतु ती महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाच्या इतिहासात अनेक कारणांनी नोंदली गेली. त्याने एका टप्प्यावर लेखनाचा छंद सुरू केला आणि बघता बघता, त्यात सिद्धहस्तता प्राप्त केली. त्याची गिरिभ्रमणाचा आनंद व्यक्त करणारी दोन पुस्तके आहेत आणि त्याने चक्क दोन बलदंड कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्या लोकांना प्रचंड आवडल्या आहेत. त्याने ‘इंग्रजी फिक्शन’च्या धाटणीचा साहित्यप्रकार मराठीत आणला असे त्याचे कौतुक होत आहे. त्याची तिसऱ्या कादंबरीची तयारी चालू आहे. त्याने त्याच्या त्या लेखनकाळात छोट्यामोठ्या कथा लिहिणे चालू ठेवले होतेच, परंतु ‘झी मराठी’च्या मुलांसाठी प्रसिद्ध झालेल्या वासंतिक अंकात त्याची चक्क मुलांसाठी लिहिलेली गोष्ट आहे! श्री.ना. पेंडसे यांनी रेखाटलेला आणि काशिनाथ घाणेकर यांनी मराठी रंगमंचावर अजरामर केलेला ‘अफाट बापू’ परिचयाचा आहे. ‘बेफाट बाळ्या’चे पराक्रम वेगळ्या क्षेत्रात तेवढेच भन्नाट आहेत.

_Befat_Balya_Vasat_Limaye_4.jpgत्याच्या मनात आठ-दहा महिन्यांपूर्वी आले, की आपण आता म्हातारपणाकडे झुकू लागलो आहोत, तर याच टप्प्यावर काहीतरी वेगळे साहस केले पाहिजे. त्याला हिमालयाची शिखरे सतत खुणावत असतात, त्याने मनोमन योजला हिमालयातील सिक्किम ते लेह-लडाख हा दोन महिन्यांचा प्रवास. तसे तपशील तयार होऊ लागले आणि मोहिमेची आखणीच झाली की! तो दोन महिन्यांचा प्रवास जीपने होणार आहे. सारे मुक्काम जंगलात, रानावनांत असणार आहेत. स्वाभाविकच, सर्वत्र तंबू टाकावे लागणार आहेत... असे एकेक तपशील मनी तयार होत असताना, पहिली गरज होती ती विश्वासू ड्रायव्हरची. त्याचा हक्काचा जुना ड्रायव्हर अमित शेलार होताच. परंतु त्याला एवढी दोन महिन्यांची फुरसद मिळणार की नाही? वसंत वसंत लिमये दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि शेलारच्या घरी पोचला. शेलार दोन महिन्यांसाठी यायला तयार झाला. मग प्रत्यक्ष क्षेत्रावरील आखणी सुरू झाली. मुक्कामाचे टप्पे ठरले. वसंत गिर्यारोहणाचा अनुभवी आणि व्यवस्थापनशास्त्राचा प्रशिक्षक. सुईदोऱ्यापासून जीपमधील सोयीसुविधांपर्यंत सर्व गोष्टी कागदावर आल्या, संगणकामध्ये प्रोग्रॅमबद्ध झाल्या.

तरी एक भुंगा मनामध्ये त्रास देत होता तो; ते दोघेच- तो आणि ड्रायव्हर- दोन महिने किती फिरणार? किती बोलणार? मग साथीदार कोण हवेत? ते दोन महिने वेळ काढतील का? पुन्हा नवी कल्पना सुचली. दर आठवड्याला दोन नवे साथीदार! मित्रमंडळींत शब्द फिरवला गेला आणि बघता बघता, आठही आठवडे ‘बुक’ झाले! पाहुणे मंडळी दिल्लीमार्गे प्रवासातील त्यांच्या त्यांच्या टप्प्यावर येणार. पुढे, ठरलेले आठ दिवस वसंत वसंत लिमये याच्याबरोबर भ्रमण करणार आणि पुन्हा त्यांच्या त्यांच्या मुक्कामी परत जाणार. त्या जोड्याही झकास जमल्या आहेत. त्यात सचिन खेडेकर आणि सुनील बर्वे एका जोडीत तर सुहिता थत्ते आणि राणी पाटील यांची दुसरी जोडी. शेवटच्या टप्प्यात तर डॉ. आनंद नाडकर्णी वसंत लिमयेबरोबर आठ दिवस हिमालयात काढणार आहे! उद्घाटनाचा पहिला सप्ताहभर त्याची बायको मृणाल आणि ‘हाय प्लेसेस’मधील त्याचे साथीदार प्रेम आणि संजय रिसबुड त्याच्याबरोबर आहेत. त्याला त्याचा हक्काचा साथीदार निर्मल खरे लगेच दोन दिवसांत कोलकाता मार्गे जाऊन नेपाळमध्ये भिडला.

_Befat_Balya_Vasat_Limaye_3.jpgत्याला सिक्कीममध्ये निरोप राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी दिला. पहिले दोन दिवस नेपाळमध्ये गंगटोक-लाचुंग असे मुक्काम आहेत. ते दोन्ही दिवस प्रवासही साठ ते ऐंशी किलोमीटरच्या दरम्यान आहेत. यात्रा चौथ्या दिवशी खरी सुरू होईल, या अर्थाने की यात्रेकरूंचे मुक्काम तंबूमध्ये असतील. तंबूसाठी जागादेखील रोजच्या दीड-दोनशे किलोमीटरच्या प्रवासानंतर शोधून तेथे तंबू ठोकून राहायचे आहे. ही सर्व सेवा त्या त्या वेळच्या भिडूंनी करायची आहे. यात्रेचा प्रवास सिक्कीम, नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर व लडाख असा असणार आहे. यात्रेत रस्त्यातील वस्त्या-खेड्यांतील लोकांशी गप्पा मारून माहिती जमा करायची आहे, त्यांच्याशी हृदयसंवाद साधायचा आहे आणि त्या पलीकडील उत्तुंग ध्येय आहे ते हिमालयास वारंवार व वेगवेगळ्या अंगांनी साद घालण्याचे. हिमयात्रेचा औपचारिक शेवट 2 जुलै २०१८रोजी पंजाबात चंदिगडला होईल.

जयराज साळगावकर त्याच्याबरोबर नंतर एक आठवडा असणार आहे. तो म्हणाला, की मी डोंगर पाहिले, की हरखून जातो. हिमालय तर माझे मोठेच आकर्षण. चार महिन्यांपूर्वी चार दिवस तेथे जाऊन आलो. तेवढ्यात ही संधी मिळाली. मग मी उडीच मारली. मला साहस – त्यातील धोके आवडतात. बाळ्याने हा वेगळाच प्रकार योजला आहे. त्यामुळे आठ दिवस हिमालयाच्या कुशीत या कल्पनेनेच मोहून गेलो आहे.

सुहिता थत्तेला सहज विचारले, ‘एवढे दिवस शूटिंगमधून काढणार का खरंच?’ तर म्हणाली, ‘गिर्यारोहण हा माझा आवडीचा छंद! मी तो कित्येक वर्षें जोपासला आहे. हिमालय मला कायमच आकर्षित करतो. याक्षणी पाऊस, दुसऱ्या क्षणी ऊन, तर तिसऱ्या क्षणी गोठणारी थंडी... निसर्गाचे ते विभ्रम मला मोहित करत आले आहेत. मी चार-पाच वेळा तरी हिमालयाच्या वेगवेगळ्या रांगांमध्ये फिरलेली आहे. तर आता बाळ्याबरोबर जाणारच जाणार!’

_Befat_Balya_Vasat_Limaye_2.jpgअभिनेते सुनील बर्वे व सचिन खेडेकर हिमयात्रेत 20 ते 29 मे च्या दरम्यान सामील होत आहेत. त्यांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सुनील म्हणाला, आम्ही 'गरूडमाची' ला गेलो असताना बाळ्याने ही आयडिया सांगितली आणि आम्ही हरखूनच गेलो. तेथल्या तेथे 'जॉईन' होण्याचे ठरवले. मी प्रकृती ठीक ठेवण्यासाठी जॉगिंग, पदभ्रमण, व्यायाम करत असतो. परंतु ट्रेकिंगला जाण्याइतका वेळ कामाच्या गर्दीत मिळत नाही. परंतु आता या गिरिभ्रमणाकडे उत्सुकतेने पाहत आहे. त्यासाठी ट्रेक शूज, ट्रॅकपॅण्ट, विंड चीटर अशा गोष्टींची खरेदी करून झाली आहे. सुनील म्हणाला, की हिमालयातील रोजचा प्रवास गाडीतूनच आहे. जेथे आकर्षक आव्हानात्मक ठिकाणे दिसतील तेथे उतरायचे आणि वस्त्या-वाडयांतून, डोंगर-दऱ्यांतून शोध घ्यायचा. निसर्गाला अशा तऱ्हेने भिडण्यास उत्सुक का? उतावीळच झालो आहोत!

हिमयात्रेचे पहिले दोन दिवस हिमवर्षावातच गेले, त्यामुळे यात्रेचे नाव सार्थ ठरले असे वसंत वसंत लिमये फोनवर म्हणाला.

- दिनकर गांगल

लेखी अभिप्राय

Lovely!

Ravindranath C…16/05/2018

very nice

Mahesh Sambhaj…16/05/2018

दिनकर गांगल सरांचा हा लेख इतका सरळ सोप्या भाषेत थेट मनाला जाऊन भिडणारा आहे.तो वाचताना आपणही या थरारक हिमयात्रेचे यात्रेचे यात्रेकरू झालो असातो तर काय धमाल आली असती अस वाटल

Hemangi Naniwadekar16/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.