सोलापूरचा वीर जवान राहुल शिंदे


_Rahul_Shinde_1.jpgसोलापूर जिल्ह्यातील माढा गावापासून दहा किलोमीटर अंतरावर सुलतानपूर हे गाव आहे. त्या गावाला निजामशाहीचा इतिहास आहे. त्यामुळे त्या गावाला सुलतानपूर असे नाव पडले. त्याच गावातील एकवीस वर्षांचा तरुण राहुल शिंदे हा मुंबईतील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झाला. त्यामुळे तो सुलतानपूरचा वीर जवान ठरला.

राहुलच्‍या वडिलांची, सुभाष शिंदे यांची वडिलोपार्जित कोरडवाहू पाच एकर शेती आहे. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आणि राहुल अशी तीन अपत्ये. राहुलच्‍या वडिलांनी मोलमजुरी करत राहुलचे शिक्षण पूर्ण केले. राहुलचे आईवडील, दोघे कामाला जात. थोरला भाऊ फार शिकला नाही. तो त्याच्या मामाकडे कोल्हापुरला कामाला होता. कुटुंबाची मदार राहुलवर होती. राहुलचे शिक्षण चौथीपर्यंत गावात झाले, तर पुढील शिक्षण माढा येथे. त्‍याला सैन्यात जाण्याची इच्छा होती. तो उच्च शिक्षणासाठी बार्शीला गेला. तेथे त्‍याने कला शाखेत त्याने महाविद्यालयात एस.वाय.बी.ए.ची परीक्षा दिली आणि 'पोलिस भरतीला जातो' असे घरी सांगून, राहुल निघाला तो सोलापूरला जाऊन राज्य राखीव दलामध्ये भरती झाला! त्‍याने एस.आर.पी. बल गट क्रमांक 10 मध्ये ट्रेनिंग पूर्ण केले. त्याला अंतर्गत सुरक्षा गटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला त्यावेळी त्याची पलटण भेंडी बाजारात उतरली होती. त्याने तेथून वडिलांना फोन केला. त्याने वडिलांना मुंबईवर हल्ला झाल्याची माहिती फोनवर दिली. तो म्हणाला, "मी भेंडी बाजारात आहे. निवांत आहे." पण त्यानंतर लगेच त्याच्यावर मोठी जबाबदारी आली. पोलिस अधिकारी विश्‍वासराव नांगरे पाटील यांनी ते स्वतः, राहुल शिंदे आणि दोन पोलिस शिपाई अशा चौघांनी मिळून ताज हॉटेलात प्रवेश केला व अतिरेक्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न चालवला. त्यावेळी राहुल शिंदे व त्याचे दोन सहकारी, माने व जाधव त्यांच्याबरोबर होते. नांगरे पाटील माघारी परतले. ते तिघे पुढे जात राहिले. त्यांनी त्यांच्याजवळ शस्त्रसाठा पुरेसा नसल्यामुळे पाचव्या मजल्यावरून माघारी परतण्याचा निर्णय घेतला. माने व जाधव हे दोन शिपाई पुढे आणि राहुल पाठीमागे होता. ते चालत जात असताना अतिरेक्यांना ताजमधील सी.सी. टीव्हीवर दिसले. त्यांनी डाव साधला आणि वरून ग्रेनाईड हल्ला चढवला. राहुल एकटा त्यामध्ये सापडला. दोन जवान पुढे निघून गेले.

_Rahul_Shinde_2.jpgवडील सुभाष शिंदे राहुलला फोन त्यानंतर, साठ तासापर्यंत करत होते. फोनची रिंग वाजे, परंतु प्रतिसाद कोठलाच येत नव्हता. तेव्हाच, त्यांच्या मनामधे राहुलचे काही बरेवाईट झाले नाही ना अशी भीती निर्माण झाली होती. ते टी.व्ही.वर साठ तासांचा थरार अनुभवत होते व सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. कमांडो ऑपरेशन साठ तासांनंतर यशस्वी झाले आणि त्यांना 26/11 ला दुपारी बारा वाजता फोन आला, तो नांगरे पाटलांचा! सुभाष यांच्या अंगावर काटा उभा राहिला. मनातील भीती खरी ठरली होती. राहुल हा देशासाठी अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाला होता! राहुलचे स्मारक सुलतानपूरमध्ये बांधले गेले असून गावाचे नाव सुलतानपूरऐवजी राहुलनगर करण्याचा ठराव गावातील ग्रामपंचायतीसह सोलापूर जिल्हा परिषदेने मंजूर करून तो शासनाकडे पाठवला आहे. राहुलचे भाऊ प्रवीण असे म्हणाले, की शासनाने ग्राम पंचायतीच्या ठरावाबाबत पाच विचारणा करून ते पत्र तहसील कार्यालयाकडे पाठवले आहे. तेथून ते ग्राम पंचायतीकडे येईल. पुन्हा त्याच क्रमाने शासनाकडे जाईल. त्यासाठी किती काळ लागेल याला गणित नाही. त्या पाच विचारणांमध्ये महत्त्वाचे अशी कोणतीच नाही किंवा त्यावरून वाद होण्याची शक्यताही दिसन नाही. ही बाब नगरविकास खात्याच्या अखत्यारित येते.  

सुभाष शिंदे यांची शेती दहा एकर आहे. त्याच्या जोडीला त्यांची गॅस एजन्सीही आहे. त्यांचा मोठा मुलगा प्रवीण ते काम प्रामुख्याने पाहतो. त्यांची कन्या ही पण लग्न होऊन राणे झाली आहे. ती दारफळला राहते.

राहुल यांचे स्मारक बांधण्यासाठी शिंदे यांना मुंबई महापालिकेने दहा लाख रुपये दिले. ते स्मारक ग्रॅनाइटमध्ये बांधले गेले आहे असे शिंदे यांनी सांगितले. गावाचे नाव राहुलनगर करण्याचा ठराव मात्र सरकारकडे प्रलंबित आहे, त्यावर काही हालचाल नाही.    

माढा हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाई. शेतीसाठी पाण्याची सोय नसल्यामुळे तेथील तरुणांना शिक्षण घेऊन नोकरी करण्याशिवाय पर्याय नसे. राहुलच्या गावाजवळून सीना नदी गेली आहे, परंतु ती हंगामी! मात्र भिमा-सिना जोड कालवा झाल्यामुळे चित्र बदलले. गावाचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

वीर जवान तुझे सलाम!

सुभाष विष्णु शिंदे (राहुलचे वडील) 9423537213

सुलतानपूर, ता. माढा, जिल्हा सोलापूर

- गणेश पोळ

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.