चंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे


विदर्भातील नांदोरा गावात जन्मलेले (४ जानेवारी १९३३) मनोहर सप्रे चंद्रपुरकर झालेले आहेत. ते नांदोरा, अकोला अशा ठिकाणी शिक्षण घेत घेत चंद्रपूरला येऊन पोचले, तेव्हा त्यांच्याजवळ दुहेरी एम.ए. (राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान) अशा पदव्या होत्या. त्यांना चंद्रपुरातील एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागली. चंद्रपुरातील वास्तव्य, तेथील दैनंदिन गरजा भागवूनही पैसा शिलकी राहायचा. ते म्हणाले, “आयुष्य सुरू होते, पण मजेत नव्हते. तशा जगण्यात ‘क्वालिटी’ वाटत नव्हती. एकाकी एकाकी असे वाटत राहायचे.”

मनोहर सप्रे त्या वेळेस तीस-बत्तीस वर्षांचे असतील, ते एके दिवशी मुलांसोबत जंगलात फिरत असताना, मुलांनी रस्त्यालगतचा एक लाकडी ओंडका उचलला. सप्रे यांना त्या लाकडात आकार दिसला! त्यांनी ते लाकूड घरी आणले. त्यांनी त्या लाकडाला कल्पकतेने थोडा आकार देऊन, त्यातून एक शिल्प साकारले - ‘आईचे व मुलाचे’! सप्रे यांना ते ‘जिवंत झालेले’ शिल्प खूप आवडले. झाले! सप्रे यांना मार्ग सापडला. ते त्यांचे पहिलेवहिले शिल्प! ते तेथील एका दर्दी राजकारण्याने शंभर रुपयांत विकत घेतले. सप्रे यांचा हुरूप वाढला. ते जुनोना, ताडोबा अशा जंगलांत ‘लाकडे’ शोधण्यासाठी भटकू लागले. त्यांच्या डोक्यातील विचार कल्पना व समोरील काष्ठ यांतून एकेक शिल्प आकाराला येऊ लागले.

त्यांना व्यंगचित्रे काढण्याची आवड पूर्वीपासून होतीच. त्यांची व्यंगचित्रे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होत. लिखाणकामही सोबतीला होते. पण जंगलाशी नाते जुळल्यावर ते रानावनांत अधिक वेळ रमू लागले. जंगल त्यांना ‘रॉ मटेरियल’ पुरवू लागले. त्यांना पूर्वी वाटणारे एकाकीपण दूर झाले होते. त्यांना पाहिजे होती ती ‘क्वालिटी’ जगण्यात दिसू लागली.

पण सप्रे यांच्या मनात एक शल्य होते. त्यांची प्राध्यापकाची नोकरी सुरू होती. त्या नोकरीत पगाराच्या मानाने त्यांचे काम थोडे होते, ते त्यांच्या मनाला पटत नव्हते. फुकटचा पगार घेतो असे सारखे वाटायचे. त्यांना काय करावे ते सुचेना!

आणि एके दिवशी, त्यांनी त्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचे दोन सारखे तुकडे केले. ते तुकडे एका लिफाफ्यात बंद केले. सोबत त्यामध्ये एक पत्र टाकले, की ‘उद्यापासून मी निरक्षर वा अडाणी असा एक नागरिक आहे. पदवीचा आणि माझा काहीही संबंध नाही.’

असा तो वेडा माणूस नोकरीच्या मोहमायेतून व जाळ्यातून सुटला आणि पूर्णवेळ काष्ठशिल्पासाठी काम, काम अन् फक्त काम करत सुटला! ते कधीतरी व्यंगचित्रे काढत व लिखाण करत. त्यांच्याकडून उत्तमोत्तम काष्ठशिल्पांच्या कलाकृती आकाराला येत गेल्या. वेगवेगळे प्राणी, पक्षी, घड्याळे, फोटोंच्या फ्रेम्स, मानवी आकार अशा काष्ठशिल्पांनी घर भरून गेले. त्यांना काष्ठशिल्पांचे प्रदर्शन भरवण्यासाठी फ्रान्स देशातून बोलावणे आले. त्यानंतर अमेरिकेतही प्रदर्शन भरवले गेले.

सप्रे यांचे ‘सोनेरी दिवस’ सुरू झाले होते. चित्रे, काष्ठशिल्पे मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली. सप्रे यांच्या काष्ठशिल्पांनी श्रीमंत, उद्योजक, कारखानदार, सिनेकलावंत यांच्या घरांतील-कार्यालयांतील भिंती, कॉफीटेबले सजू लागली.

सप्रे यांनी चंद्रपुरात मूल मार्गावर प्रशस्त जागेवर घर बांधले. त्यांनी त्या घरातच वर्कशॉप उभे केले. त्यांनी एक-दोन सुतारांना प्रशिक्षित करून मदतीला घेतले. सप्रे यांचे काम वाढले होते. सोबतच, काष्ठशिल्पांचे जाणकार व त्या कलेसंबंधी आवड असणारे विद्यार्थी सप्रे यांच्याकडे येऊ लागले.

सप्रे यांनी जरा कोठे ऐकले, की शेतीसाठी जंगल साफ करणे सुरू आहे, तर सप्रे तेथे तात्काळ जात, मोठमोठी झाडे, बांबू विकत घेत आणि ट्रकच्या ट्रक भरून लाकडे त्यांच्या घरी घेऊन येत अन् मग सुरू होई त्यांची शिल्पे निर्माण करण्याची कलाकारी!

त्यांच्यावर त्यांच्या पहिल्यावहिल्या ‘आई व मूल’ या शिल्पकृतीचा मोठा प्रभाव दिसून येतो. ती कलाकृती नंतरही त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांत अनेकदा साकारली गेली आहे.

एकदा, त्यांना घोड्याच्या आकाराचे लाकूड कोठे दिसले. त्यांनी ते घरी आणले. ते लाकूड वरकरणी घोड्याच्या आकाराचे होते, पण सप्रे यांना त्यामध्ये घोड्याच्या मानेवरील आयाळ शोधण्यास खूप कष्ट पडले. आणि शेवटी, एकदाचे ते घोड्याचे काष्ठशिल्प तयार झाले. ते शिल्प नंतर खूप प्रसिद्धी पावले.

जपानी भाषेत MOTTINAI असा एक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो, की जगात, निसर्गात एकही वस्तू निरर्थक वा व्यर्थ नाही. जपानमध्ये अशा waste वस्तूंवर हजारो उद्योग आहे. भारतात तर जंगल विपुल प्रमाणात आहेत. कितीतरी जणांना त्यांतून रोजगार मिळू शकेल. सप्रे यांनी स्वत: केले व नंतर सगळ्यांना उदाहरणातून सांगणे सुरू केले. त्यांनी स्वत:च्या मुलांना नोकरीला न लावता त्यांच्या त्यांच्या आवडीच्या उद्योगात रमायला सांगितले.

सप्रे यांचे नोकरीमुळे आयुष्याचे खूप नुकसान होते असे मत आहे. एखाद्याला डॉक्टर व्हायचे असते. तो त्यासाठी प्रवेशही घेतो. पण त्याच्या आवडीची वैद्यकीय क्षेत्रातील शाखा त्याला मिळते का? मग मनाविरुद्ध जगणे सुरू असते, आयुष्यभर! रडत-रखडत आयुष्य जाते. त्यामुळे व्यक्ती त्या क्षेत्रात उच्च प्रतीचे काम वा यश संपादन करू शकत नाही. उलट, आवडीच्या छंदाचा व्यवसाय केला, की रात्रंदिवस त्यातच काम केल्याने ते काम न वाटता मजेने, आनंदाने दिवस जातात.

मी सप्रे यांच्या घरी गेलो तेव्हा घराभोवतीच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारची लाकडे पडलेली दिसली. त्यांच्या नावाची वैशिष्ट्यपूर्ण पाटी दारावर होती. त्यांची काष्ठशिल्पे घरातील प्रत्येक भिंतीवर टांगलेली होती. घड्याळे, फोटोच्या फ्रेम्स, पेपरवेट, पुस्तकांची आलमारी...  सारे सारे त्यांच्या काष्ठशिल्पांनी तयार झालेले! त्यांनी ‘कोणाला तरी इमेल करून येतो’ असे सांगून मला बसायला सांगितले. ते येईपर्यंत मी त्यांचा काष्ठशिल्पांचा खजिना मस्तपैकी बघत व कॅमेऱ्यात उतरवत होतो. मी उत्साहाने वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीही क्वालिटीचे आयुष्य जगणाऱ्या अवलियाला अनुभवत होतो.

“सोडा ती नोकरी! अन् लागा तुमच्या छंदामागे” सप्रे मला माझ्या लिखाणकामाला आयुष्य वाहण्याबद्दल सांगू लागले.

मनोहर सप्रे यांची पुस्तकसंपदा – रुद्राक्ष, दहिवर, व्यंगार्थी, बिल्लोरी, अळसपळस, सांजी, व्यंगविनोद, हसा की, Book of Indian Cartoons

मनोहर सप्रे ९३७०३२०१२०
मूल रोड, सहकारनगर,
पटेल सॉ मिलजवळ, चंद्रपूर
msapre77@gmail.com

- श्रीकांत पेटकर

Last Updated On 3rd March 2017

लेखी अभिप्राय

Nice article on versatile personality

kishor petkar02/03/2017

मनोहर सप्रे द ग्रेट।
तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करताय का ?
लेख आवडला.छान

मिलींद दाणी02/03/2017

उत्तम ज्वलंत लेख सर..
जिवन जगण्याची नवी उर्मी मिळाली....

Arun Ghorpade,…02/03/2017

हैट्स अॉफ टु श्रि. सप्रे सर.............आणी हो पेटकर साहेब त्यांचे छंदा मागे लागन्याचं आव्हानही अगदी उपयुक्त आहे........पण कौटुंबिक जबाबदार्यां पार पाडता पाडता कदाचित शक्य होणार नाही.........आणी शक्य झाल्यास थोडा वेल लागेल.......

रमण उंबरकर03/03/2017

kharach "Awaliya" ....manas..

Why we are try in our life?

snehal04/03/2017

आपल्या कलात्मकतेला तर करावाच ऊर्जेलाही सलाम करावा एवढी ऊर्जा अलिकडच्या पिढीमध्ये पहावयास मिळत नाही.

धोंडोपंत मानवतकर27/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.