पां. वा. काणे यांचा युरोपचा प्रवास


पाऊणशे वर्षांपूर्वी, प्रवास व त्यातूनही विदेशप्रवास कारणपरत्वेत – मुख्यतः शिक्षणासाठी- होत असे. असाच प्रवास डॉ. पां. वा. काणे (हिंदू धर्मशास्त्राचे पंडित व पहिल्या ‘भारतरत्नांपैकी एक) यांनी १९३७ च्या एप्रिल-जुलै या साडेतीन महिन्यात केला. त्यांनी त्या प्रवासादरम्यान त्यांच्या घरच्या मंडळींना वेळ काढून व तपशिलवार पत्रे लिहिली. त्या पत्रांचे संकलन ‘भारत गौरव ग्रंथमाला’मध्ये पुस्तकरूपाने प्रसिध्द झाले - ‘युरोपचा प्रवास’ या साध्या सुध्या नावाने.

त्या काळच्या पुस्त‍कांप्रमाणे या पुस्तकाला प्रस्तावना व उपसंहार आहे. काणे यांनी प्रस्तावनेत लेखनाचा हेतू विषद केला आहे. “प्रवासात मी महत्त्वाचे काय पाहिले आणि मला काय वाटले या संबंधाने मी रोज जरुरीप्रमाणे तास-दोन तास मोडून टिपणे लिहित असे व ती माझ्या कुटुंबातील मंडळी व विशेषतः माझ्या मुली यांना वाचण्यासाठी, काही दिवसांच्या अंतराने चि.कु.शांता हिच्या नावाने पाठवत असे”. (पृष्ठ २) पुढेही एका पत्रात ते त्यांच्या लिखाणाचे प्रयोजन स्पष्ट करतात. “इतकी लांबलचक हकिगत लिहून पाठवण्यात माझे दोन-चार उद्देश आहेत. एक, मी काय पाहिले याचे टाचण माझ्या स्वतःच्या आठवणीसाठी राहवे. दुसरा, मी जे पाहतो व त्यामुळे मला जो आनंद होतो त्याचा अल्पय अंश तरी वाचून आपणा सर्वांना मिळावा आणि तिसरा म्हणजे तुमच्या सर्वांची आठवण मी रिकामा बसलो म्हणजे फार होते, ती लिहिण्यात वेळ जाऊन होत नाही”. (पृष्ठ ७७)

ह्या प्रवासाच्या वेळी काणे यांचे वय सत्तावन्न होते व ‘विद्यार्थिदशेपासून असलेला आम्ल पित्ताचा व पोटदुखी यांचा आजार याहून जास्त वयात प्रवास करून देईल का’ अशी शंका भेडसावत असल्याने काणे यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशाने इंग्लंड, स्कॉटलँड, जर्मनी, इटली, रोम, झेकोस्लाेव्हाकिया, फ्रान्स, इजिप्त, स्वित्झर्लंड हे नऊ-दहा देश बघितले. इतक्या थोड्या वेळात इतके देश बघितल्याने प्रवासवर्णन तसे संक्षिप्तच आहे. “पत्रे लिहीत असताना मला जे महत्त्वाचे वाटले व आठवले तितकेच यात आले आहे ”. (पृष्ठ ३)

काणे यांचे लेखन संक्षिप्त असले तरी ते वाचनास रंजक वाटेल असा प्रकाशकांना विश्वास वाटला. त्या काळी प्रवास करणा-यांची संख्या कमी असल्याने पाहिलेल्या स्‍थळांची माहिती भरपूर आली आहे. कित्येक ठिकाणी ती माहितीपत्रकांत असते तशी आहे.

काणे यांनी प्रवास बोटीच्या दुस-यात वर्गाने, म्हणजे खर्चिक तिकिट काढूनच केला. बहुधा स्वतःचा पैसा खर्च होत आहे ही भावना सतत असल्याने अनेक तपशील - तिकिटाचे दर, हॉटेलचे भाडे, खाद्यपदार्थांचे दर, डॉक्टरांची फी, दुर्बीण वापरण्याची फी – दिले आहेत. ज्या काळात प्रवास झाला तो लक्षात घेता आर्थिक बाबींचे उल्लेख स्वाभाविक वाटतात. तसेच, स्वाभाविकपणे काणे यांनी बोटीवर ‘दक्षिणी’ मंडळी कोण आहेत याचा तपशील दिला आहे. त्याच बोटीने अनंत काणेकर जात होते व त्यांच्‍या प्रवासाचा उद्देश (जाहीरपणे सांगितलेला) इंग्लंडच्या राजाचा राज्याभिषेक पाहणे हा होता, (‘पण वस्तुस्थिती अशी होती, की ते विलायतेला गेले ते केवळ लंडन-पॅरिसची शोभा पाहायला नव्हे तर त्याच निमित्ताने रशियाला जायला मिळाले तर पाहवे एवढ्यासाठी’. {त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक 'धुक्यातून लाल ता-याकडे' - अनंत काणेकर- पहिली आवृत्ती १९४०, प्रस्तावना – शं.वा.किर्लोस्कार}) काणे व काणेकर यांच्या पुष्कळ वेळ गप्पा झाल्या. (पृष्ठ ४). पण काणे यांनी त्यांचा तपशील दिलेला नाही. पहिल्या वर्गाने प्रवास करणा-या मंडळींत सांगलीचे युवराज, बॅरिस्टर वेलणकर यांचा मुलगा व सून, सॉलिसिटर मडगावकर व त्यांची पत्नी अशी मंडळी असल्‍याचा पुस्‍तकात उल्‍लेख आहे. (पृष्ठं ४).

पुस्तकात काणे यांनी ज्यांंची भेट घेतली किंवा ज्यांची भेट त्यांच्याबरोबर झाली, त्यांच्याबरोबरच्या संभाषणांचे तपशील किंवा कोणते विषय बोलण्यात आले याचे उल्लेख जवळ जवळ नाहीत. उदाहरणार्थ, त्यांनी भेट घेतलेल्या व्यक्ती - गांधीजींचे मित्र व साहाय्यक पोलॉक, पॅरिसमध्ये प्राध्यापक ज्युल्स ब्लॉच (संस्कृत व प्राच्य विद्येचे प्रोफेसर), मादाम स्टेस्नोपाक (ओरिएंटल लायब्ररीच्या ग्रंथपाल), लासडनमध्ये ‘कर्न इन्स्टिट्यूट’मधील हिंदुस्थान व प्राच्य विद्यांचा चांगला अभ्यास करणा-या प्रोफेसरांशी भेट (पृष्ठ  ७५). याचा अर्थ काणे सर्वत्र प्रेक्षक/ निरीक्षक म्हणून वावरत होते असा नाही किंवा त्यांनी सा-या गोष्टींची प्रतिक्रिया मनातच ठेवली असेही नाही. प्रागमध्ये ते एका संध्याकाळी फिरण्यास गेले तेव्हा - “एका प्रोफेसराची इंग्लिश बोलणारी बायको भेटली. तिने एक-दोन वाक्ये बोलून झाल्यावर हिंदुस्थानचे लोक विधवांना जाळतात हे फार अधमपणाचे आहे असे म्हटले. मग मी तिला दोन तास व्याख्यान दिले. ही चाल शंभर वर्षे नाही. पूर्वीही फार थोड्या प्रमाणात होती वगैरे सांगितले. तिच्याबरोबर पुष्कळ वेळ बागेत हिंडलो व तिला रोमन कॅथॉलिक लोक प्रॉटेस्टंटांना जाळत व उलटही होई त्याची उदाहरणे दिली, तेव्हा ती बरीच वठणीवर आली.”(९३)

काणे यांनी मोजक्या शब्दांत इतरही काही प्रतिक्रिया नोंदल्या आहेत. “नवरा कॅथॉलिक आहे पण मी कोणत्याच धर्मावर विश्वास ठेवत नाही असे तिने सांगितले. त्या बायकोच्या धैर्याची कमाल आहे. ही बाई एकटी व्हिएन्नाहून पॅरिसला चालली होती. (तीस तास लागतात व बाराशे मैल अंतर आहे) नाहीतर आमच्या बायका!” (पृष्ठ.१०९)

“एकंदरीत, प्रत्यक्ष राष्ट्रातील भांडणाचे कामी लीगकडून (लीग ऑफ नेशन्स) विशेष भरीव काम होत नसली तरी या दुय्यम प्रकारची कामगिरी लीगकडून होत आहे.” (पृष्ठ. १२७)

“आल्प्स पर्वतासंबंधी – येथे एक हजार वर्षांची जुनी म्हणून वेल दाखवतात पण त्यात काही अर्थ दिसत नाही. प्रयागला अक्षय्यवट (हजारो वर्षांचा म्हणून) दाखवतात त्यातलाच तो प्रकार दिसला.” (पृष्ठ ११८)

“पार्लमेंटचे काम चालते तो हॉल लहान आहे. सगळे सहाशेच्यावर सभासद आहेत, ते हजर राहिले तर बसण्यासही जागा नाही इतकी लहान ती जागा आहे.” (पृष्ठ ५१)

हिटलर व मुसोलिनी यांच्या संबंधाने नवलाचे वाटावे असे उल्लेख आहेत. त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू व्हायचे होते व दोन्ही नेते त्यांच्या त्यांच्या देशात अति लोकप्रिय होते.

“पुन्हा इटली प्रमुख राष्ट्रांत स्थान मिळवत आहे, याला कारण डुशे मुसोलिनी आहे. त्या पुरुषात दोष आहेत. त्याने डेमॉक्रेसी नष्ट केली आहे व त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा छळ केला आहे असे म्हणतात व ते खरेही असेल. पण त्याने इटलीत नवचैतन्य पसरवले आहे. त्याने वरील गोष्टी केल्या नसत्या तर फार उत्तम झाले असते. पण कोणता कर्तृत्ववान मनुष्य किंवा मानवी कृती निर्दोष असू शकेल? चांगले व वाईट यांचे नेहमी मिश्रण आढळते. ती निर्भेळ मिळत नाहीत. राष्ट्रांचे उत्कर्ष व अपकर्ष कशाने होतात हे सांगणे मोठे कठीण आहे. एक गोष्ट खरी आहे, की सृष्टीत ज्याप्रमाणे मनुष्याला शंभर वर्षे आयुष्य, वृक्षांनाही नियमित आयुष्य, त्याचप्रमाणे राष्ट्रांनाही उत्कर्ष व अपकर्ष लागलेलेच आहेत” (पृष्ठ २८)

“जर्मनीत अलिकडे तर हिटलर यांनी प्रत्येक तरुण मनुष्याने त्याच्या हातांनी एक वर्षभर राष्ट्राकरता काहीतरी उपयोगी काम करण्याचे शिक्षण घेतले पाहिजे. (labour service) अशी प्रथा पाडली आहे. या पद्धतीचे ध्येय हे आहे, की सबंध राष्ट्र उपयोगी उद्योगात गर्क असावे व तरुणांना कामधंदा येत नसल्यामुळे व मिळत नसल्यामुळे जी एक प्रकारची हानी होते ती बंद व्हावी, शारीरिक आणि मानसिक तरतरी यावी, शिस्त अंगी बाणावी आणि समाजातील निरनिराळ्या थरांतील माणसे राष्ट्रोपयोगी उद्योगात एकत्र येऊन त्यांनी परस्परांपासून पृथक राहण्याच्या सवयी मोडाव्या. अशा प्रकारचे शिक्षण आपल्या देशात जर शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांना दिले जाईल तर किती बरे होईल!” (पृष्ठ ८५)

“अचानक मला तेथे प्रो. कान्हेरे म्हणून मराठी व गुजरातीचे लेक्चरर भेटले. ते बावीस वर्षापूर्वी येथे आले. त्यापूर्वी ते ठाकुरद्वारवर गीतेचे प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते. पुढे येथे येऊन त्यांनी एका इंग्लिश बाईशी लग्न केले. काय मनुष्याच्या चरित्रात फरक पडतो!  ठाकुरद्वारी गीता प्रवचनात त्या वेळच्या सुधारकांवर ते पुष्कळ तोंडसुख घेत असत.” (पृष्ठे ३८-३९)

काणे यांच्या युरोप प्रवासाचा हा वृत्तांत प्रवासवर्णनाच्या इतिहासातील महत्त्वाचा ऐवज ठरेल.

'युरोपचा प्रवास'
लेखक – डॉ. पां.वा.काणे
पृष्ठे 137 किंमत 1 ¼ रुपये

- मुकुंद वझे

Last Updated On - 13th Jan 2017

लेखी अभिप्राय

विद्वानाने गरिबी भोगलीच पाहिजे, हे समीकरण भारतात इतक्या अलिकडंपर्यंत रूढ होतं. महामहोपाध्यायांना दुसऱ्या वर्गाने प्रवास करावा लागला!
पुस्तकाला वाड़मयीन मूल्य फारसं नसलं तरी एवढ्या थोर भारतीय विद्वानाच्या तत्कालीन पाश्चात्य जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया वाचणं निश्चितच उद्बोधक आणि मनोरंजकही असणार!

प्रा. सुरेन्द्…02/01/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.