नात्यांतला ओलावा जपणारा शेवगा


आता शेवग्याच्या शेंगा बारमाही मिळतात. हव्या तेव्हा आणून त्या सांबार पिठल्यात टाकता येतात आणि त्याचा चवीने तृप्त झाल्याचे भावही आळवता येतात... पण तरीही शेवग्याच्या शेंगामध्ये काहीतरी मिसिंग आहे; असं तुम्हाला नाही वाटत? खात्रीने तुम्हालाही तसंच वाटत असणार! मग काय हरवलंय या शेंगांमधून? वर्षानुवर्षं जो ओलावा, प्रेम, आस्था आणि आपुलकी या शेंगानी जपली होती, तीच तर हरवलीय... आंब्या-फणसाबरोबर बांधावरच्या शेवग्याच्या शेंगांची जुडी बांधली नाही, असं आजवर कधी झालं होतं? गावावरून आलेल्या या शेंगांनी शहरातल्या गृहिणींना गहिवर यायचा आजवर कधी राहिला होता? कारण शेवग्याच्या शेंगांची जुडी म्हणजे नात्यांची बांधलेली सुरेख मोटच तर होती आजवर... म्हणून मग या शेंगा आमटीत टाकल्या काय, पिठल्यात टाकल्या काय किंवा अगदी वांगं-कोलंबीच्या रस्‍स्‍यात टाकल्या काय, शेंगा खाल्ल्यावर नात्यातल्या प्रेमाचा ओलावाच जिभेवर अवतरायचा. त्याची चव बाजारातून आणलेल्या शेंगांपेक्षा खचितच चांगली असायची! आता शेंगा वर्षभर मिळतात, पण मायेचा ओलावा त्यातून मिसिंग आहे...

... पण म्हणून शेवग्याच्या शेंगा खायच्या नाहीत, असं मात्र नाही! उलट शेवग्यासारखं क्वचित एखादं झाड असेल; ज्याच्या केवळ शेंगाच नाही, तर पाना-फुलांचाही वापर भाजी म्हणून करता येतो. शेवगा ऐन बहरात पानं-फुलं आणि शेंगांनी बहरतो. त्‍यांच्‍या भाराने तो असा वाकतो, की जणू काही तो 'या आणि मला न्या' असं आवाहनच करत असतो!

शेवग्याला शेकट, शेगुला अशीही काही नावं आहेत, पण नावं काहीही असली आणि तो कुणाच्याही बांधावरचा किंवा शेतातला असला, तरी शेवग्याच्या शेंगा या ‘शेवग्याच्या शेंगा’च असतात. किती नाना त-हांनी करता आणि खाता येतात या शेंगा! लाल मसाला टाकून केलेल्या तुरडाळीच्या तिखट आमटीत नुसत्याच शिजवलेल्या शेंगा ग्रेट लागतातच, पण तिखटाऐवजी सांबार मसाला आणि सोबत वांगं किंवा भोपळा-कोहळा टाकला, तर सांबारातल्या शेंगाची चव अजुनच वाढते. पिठल्यातल्या शेंगांची खुमारीही अशीच. नेहमीसारखं भरपूर कांद्याचं आणि लसणाच्या सणसणीत फोडणीचं पिठलं करायचं. कांदा शिजवताना शेंगांचे तुकडे त्यात टाकायचे. ते शिजत आले की, बेसन पाण्यात भिजवून गुठळ्या होऊ न देता ओतायचं. चांगली वाफ काढून गॅस बंद करायचा. वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. पिठल्यातल्या त्‍या शेंगा एकदम भारी लागतात. हीच गत सोडे किंवा कोलंबीच्या कालवणात टाकलेल्या शेंगांची. वांगं आणि सोड्यांचं कालवण असेल, तर आधी सोडे भाजून पाण्यात बुडवून ठेवायचे. कालवण करताना आधी तेलावर भरपूर कांदा परतून घ्यायचा. मग त्यात मसाला टाकून छान परतायचा. नंतर शेंगाचे तुकडे आणि सोडे किंवा कोलंबी टाकायची. ते सारं शिजण्यासाठी बेताचं पाणी घालायचं. सोडे-कोलंबी शिजत आली की, मीठ टाकायचं. तो रस्सा दाटसरच छान लागतो. मात्र त्‍यात कुठल्याही प्रकारचं वाटण टाकायचं नाही. त्या रस्स्यात कै-या टाकल्या, तर शेंगांची चव म्हणजे सुखच सुख! शेंगांचे हे सारे प्रकार म्हणजे, त्या कशात तरी टाकून त्‍यांची भाजी तयार केली जाते असे! पण नुसत्या शेंगांचीही भाजी करतात. एरव्ही शेंगांचे बोटभर तुकडे करतात, त्याऐवजी या भाजीसाठी शेंगांचे बोटांच्या पेराएवढेच तुकडे करायचे. तेल कडकडीत तापल्यावर मोहरीची खमंग फोडणी द्यायची आणि मग मिरची, चिरलेला कांदा टाकायचा. कांदा शिजत आला की, शेंगांचे बारीक तुकडे टाकायचे. ती भाजी वाफेवरच शिजवत असल्यामुळे तिची चवही भन्नाट असते. शेंगांच्या या सर्व प्रकारांत शेंगा हा एकच घटक कायम आहे. बाकीचे घटक मात्र बदललेले दिसतात. पण त्‍या बदललेल्या घटकांमुळेच शेंगांची लज्जत वाढते. कारण शेंगांना स्वतःची अशी खास चव नसते. किंबहुना असलीच, तर ती थोडी उग्र आणि तुरटच असते. पण पिठलं, कोलंबीचं कालवण किंवा सांबारात शेंगा टाकल्यावर, त्या इतर घटकांचा अंश शेवग्याच्या शेंगांत असा काही भिनतो की, शेंगांतील गराची चव एकमेवाद्वितीय होऊन जाते. मग या शेंगा चोखून चोखून खाण्यात जी मजा असते, तिला तोड नाही. अस्सल खवय्ये शेंग अशी काही चोखून खातात की, त्या शेंगेचं अक्षरशः चिपाड मागे उरतं. पण शेवग्याच्या शेंगेंची हीच खासियत आहे, ती आपल्याला तृप्त करते.

शेवग्याच्या पानाफुलींचीही तीच गोष्ट. उन्हाळ्यात शेवगा बहरला, की त्याची फुलं वा-यानं अनेकदा अंगणात पडतात. सकाळी उठल्यावर तर शेवग्याच्या झाडाखाली फुलांचा सडा परसरेलला असतो. ती फुलं गोळा करायची आणि स्वच्छ धुऊन घ्यायची. नंतर बारीक कांदा चिरुन तो तेलावर परतला की, त्यात हळद-मीठ-मसाला टाकायचा आणि त्यानंतर ती पांढरीशुभ्र फुलं बारीक सुक्या कोलमाबरोबर टाकायची. फक्‍त तेलावर आणि वाफेवर केलेली ती भाजी तांदळाच्या आणि नाचणीच्या भाकरीबरोबर एकदम फर्मास लागते. त्‍याचप्रमाणे शेवग्याच्या बोंबलांची सुद्धा सुका कोलीम टाकून भाजी केली जाते. आता शेवग्याच्या झाडावर बोबींल कुठून आले असा प्रश्न कुणालाही पडेल. पण शेवग्याच्या ज्या शेंगा जीव धरुन मोठ्या कडक होत नाहीत, त्या कायम मलूलच राहतात. शेवग्याच्या झाडावर बोंबील लटकवावेत अशा त्या दिसतात आणि म्हणूनच त्यांना बोंबील म्हणतात. असे हे शेवग्याचे बोंबील एकदम लुसलुशीत असतात. गावाकडे ते झाडावरून काढून बारीक चिरुन त्याचे कोलमाबरोबर भाजी केली जाते, जी एकदम चवदार असते. शेवग्याची, शेकटाची किंवा शेगुलाच्या पानांचीही अशीच भाजी केली जाते. शेवग्याची कोवळी पानं काढून त्याची कांद्यावर नुसती भाजी करतात. परंतु कोवळ्या पानांच्या भाजीपेक्षा सुक्या पानांच्या भाजीची पद्धत अनेक ठिकाणी आहे, विशेषतः कोकण सोडून. त्यासाठी शेवग्याची पानं उन्हात सुकवून, ठेवली जातात. नंतर पावसाळ्यात जेव्हा कोरड्यास काही नसेल, तेव्हा तीच पानं काढून ती पाण्यात भिजवली जातात आणि त्‍याची पीठ पेरून भाजी केली जाते. शेवग्याचे असे अनेक रुचकर प्रकार आहेत आणि ते महाराष्ट्राच्या पाठीवर जाल तिथे वेगळे, तसेच रुचकरही आहेत.

या रुचकरपणासाठीच शेवगा चवीने खाल्ला जातो, कधी भाजीत, तर कधी आमटीत टाकून. फक्त या शेंगा कुणी आठवणीने खास आपल्यासाठी पाठवलेल्या असतील, तर त्यांची चव जरा अंमळ वाढते इतकंच!

- मुकुंद कुळे

(महाराष्ट्र टाइम्स, १६ एप्रिल २०१६)

लेखी अभिप्राय

मस्त जमलेला लेख

Varsha Oak23/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.