ववा ग्रामस्थांची जलक्रांती


ववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे! जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे! तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते! भूजलपातळी वाढलेल्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रवाही पद्धतीला फाटा देऊन ठिबकनेच पाणी दिल्यामुळे तसा शिरस्ताच गावात पडत आहे. पाणलोटाची कामे झालेल्या भागात कापूस उत्पादनात एकरी किमान पाच ते सात क्विंटलनी वाढ होणार आहे. त्याच बरोबर, रब्बी पिके व उन्हाळ्यात भाजीपाला व फळबागा यांना पाणी उलब्ध होणार आहे.

पैठण तालुक्‍यातील ववा गावची लोकसंख्या फक्‍त 870 एवढी आहे. तेथील अर्थव्यवस्था शेतीवर आधारलेली आहे. गावातील सुमारे 613 हेक्‍टर क्षेत्रावर खरीप, रब्बीत विविध पिके घेतली जातात. ववा गावात पाणीटंचाई, आरोग्यात गैरसोई, शैक्षणिक मागासलेपणा व वाहतुकीच्या साधनांचा अभाव अशा समस्या होत्या. औरंगाबादमधील 'ग्रामविकास संस्था' व ववा ग्रामस्थ यांनी पहिली ग्रामसभा मे 2005 मध्ये घेतली. त्‍यावेळी ग्रामसभेने दुष्काळमुक्‍तीचा निर्धार केला. ग्रामसभेने गाव शिवारात नवीन विंधन विहीर घेण्यास बंदी केली. त्‍याचबरोबर एक मूल-एक झाड, घर तेथे शोषखड्‌डा, योजनांमध्ये सक्रिय लोकसहभाग, घर तेथे शौचालय, एक गाव, एक रंग, व्यसनमुक्‍त गाव, सप्तसूत्रीचे तंतोतंत पालन, महिन्यातून एकदा सामूहिक श्रमदान असे अनेक निर्णय घेतले. ते गावक-यांच्‍या सहभागाने पूर्णत्वास नेले. त्‍या प्रयत्नांना शासकीय योजनांची जोड दिली. शेततळे, वनराई बंधारे, शेतकरी प्रशिक्षण, महिला बचत गट, ग्राम समिती युवक मंडळ यांच्या माध्यमांतून कामांना गती मिळाली. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या भेटीनंतर 2012 मध्ये या गावाचा आदर्श गाव योजनेत समावेश झाला.

ग्रामविकास संस्था पाणी हा विषय घेऊन प्राधान्याने काम करत आहे. संस्थेचा प्रयास ववा गावास सर्वांगीण विकासाचे मॉडेल म्हणून प्रस्तुत करण्याचा आहे. ‘आपला विकास आपल्या हाती’ या भूमिकेला अनुसरून जनसहभागातून विकास ही संकल्पना राबवण्यात आली आहे. त्या दृष्टीने गावात विविध ग्राम समित्यांची स्थापना करण्यात येऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्प राबवण्यात आले आहेत. ग्रामस्थांचे क्षमताबांधणी प्रशिक्षण, हिवरेबाजार आदर्श गाव येथे सहल, घर तेथे शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन यासाठी घर तेथे शोषखड्डे, परिसरात वृक्षारोपण, एक गाव एक रंग, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिरे आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. त्याद्वारे ववा गावाचा कायापालट घडवून आणण्यात मोठे यश लाभले आहे. आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत सामाजिक बहुउद्देशीय सभागृह व प्रथम टप्प्यातील पाणलोटाची कामे झाली आहेत. ग्रामस्थांचा व संस्थेचा शिवाराच्या उर्वरित भागातील पाणलोटाची कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.

- नरहरी शिवपुरे

(‘जलसंवाद’ नोव्हेंबर २०१३ मधून उद्धृत)

लेखी अभिप्राय

मु.पो.जानवे
ता.अंमळनेर जि.जळगाव महाराष्ट्र

स्वप्निल सुरेश पाटील10/10/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.