महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू


अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२ जून २०१६ रोजी दिली. ज्यू समाज त्या निर्णयाची गेली अनेक वर्षें वाट पाहत होता. स्वाभाविकच, तो समाज आनंदित झाला आहे. ते लोक महाराष्ट्रात खरोखरी अल्पसंख्य म्हणजे बारा कोटी लोकसंख्येमध्ये फक्त दोन-चार हजारांच्या दरम्यान आहेत. पश्चिम बंगालने तेथील ज्यू लोकांना अल्पसंख्याक ही मान्यता दहा वर्षांपूर्वी दिलेली आहे. त्यावेळी तेथे फक्त सत्तेचाळीस ज्यू नागरिक होते! महाराष्ट्र हे ज्यू धर्मियांना मान्यता देणारे भारतातील दुसरे राज्य आहे.

अल्पसंख्याक या उपाधीच्या मान्यतेमुळे त्यांना विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी करणे सुलभ होईल. तसेच, त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करता येतील, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि ‘विकास निधी’ मिळवता येईल. अल्पसंख्याकांना त्यांच्या ऐतिहासिक स्थानांचे रक्षण करण्यासाठी खास तरतुदी आहेत त्यानुसार ज्यू समाज त्यांच्या तशा स्मृतिस्थळांचे जतन प्रभावी रीतीने करू शकेल.

महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी म्हणतात, की ज्यू धर्मीयांना तशी मान्यता या आधीच द्यायला हवी होती, कारण त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे.

मात्र राज्य सरकारकडे त्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही! जनगणनेच्या अर्जामध्ये त्यांच्यासाठी वेगळा रकाना (कॉलम) सुद्धा नसे, अधिकारी त्यांना सांगत, की ख्रिश्चन किंवा मुसलमान असे लिहा, त्यामुळे ज्यू धर्मीयांची खरी जनगणना होत नसे. महाराष्ट्रात१९६१ साली पंधरा हजार आठशेएक्कावन्न ज्यू नागरिक होते, तत्पूर्वी ती संख्या तीस हजारापर्यंत असावी. आता मात्र पश्चिम किनारपट्टीवर (मुख्यत: महाराष्ट्रात व केरळमध्ये) चार-साडेचार हजार ज्यू नागरिक असावेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यूंचे योगदान भरीव आहे. ज्यूंचे हे ‘अल्पसंख्याक’ होणे त्याला स्थलांतर हे कारण आहे; पक्षी एकामागोमाग एक उडून जावेत तसे येथील ज्यू नागरिक त्यांच्या धर्मदेशी, इस्रायलला निघून गेले आहेत. ज्यू लोक साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी - इसवी सनपूर्व ७३० मध्ये - पॅलेस्टाईनमधून स्वसंरक्षणाकरता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले. कथा अशी, की त्यांची जहाजे अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ या बंदरकिनारी बुडाली व त्यातून जे वाचले त्या सात-आठ जोडप्यांचे जे वंशज ते बेने-इस्रायली! त्यांचे वंशज महाराष्ट्रात दोन-अडीच हजार वर्षें नांदले. दुसरे जहाज दक्षिण किनाऱ्याला लागले. ते कोचीनला उतरले, ते कोचिनी ज्यू! बगदादहून स्थलांतरित झाले ते बगदादी ज्यू – ते कोलकात्यामध्ये स्थिरावले होते. ‘बेने इस्त्रायल’ या हिब्रू शब्दाचा अर्थ इस्त्रायलची लेकरे!

अपघाताने अलिबाग तालुक्यात आलेल्या निराधार लोकांना स्थानिकांनी आश्रय दिला. त्यांना तेल गाळण्याची कला अवगत होती. म्हणून त्यांनी गलबतांना लागणाऱ्या उंडीच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला. ते शनिवारी विश्रांती घेत. म्हणून त्यांना ‘शनिवार तेली’ असे म्हटले जाई. त्यांनी मराठी भाषा स्वीकारली, ज्या गावात ते राहिले, त्या गावांची नावे त्यांनी स्वीकारली. म्हणून अष्टमीचे अष्टमकर, झिराडचे झिराडकर, चरीकर, मळेकर, रोहेकर, आवासकर अशी आडनावे त्यांच्यात आहेत. त्यांची प्रगती कान्होजी आंग्रे यांच्या काळात चांगली झाली. रायगड जिल्ह्यातील बेने-इस्रायली १७४६ मध्ये मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संख्या मुंबई-ठाण्यात वाढली. त्यांनी रायगड जिल्ह्याप्रमाणेच (कुलाबा जिल्हा) मुंबईतही त्यांची प्रार्थनामंदिरे बांधली. ते सुतारकामासाठी प्रसिद्ध झाले. स्त्रियांनी शाळेत शिक्षिका म्हणून नोकऱ्या पत्करल्या. मुंबईमध्ये भायखळ्याला ‘सर एली कदूरी’ ही शाळा ज्युईश मुलांसाठी सुरू झाली. त्यांचे स्वतंत्र कॅलेंडर प्रसिद्ध होऊ लागले. सण व इतर धार्मिक संस्कार मंदिरात (सिनेगॉग्ज) होऊ लागले, त्या लोकांनी मराठी साहित्यात, संगीत नाटक, किर्तने ह्यामध्ये योगदान दिले. मराठीमध्ये महाराष्ट्रात त्यावेळी बेने इस्रायली समाजाने बावीस लहानमोठी नियतकालिके चालवली. एडवीन रोहेकर, रेचल गडकर (अनुबंध- ग्रंथाली प्रकाशन), नाथान सातामकर, भाई बंदरकर यांनी नाटके, कादंबऱ्या लिहिल्या. बिनयामीन अष्टमकर हे हरिदासबुवा किर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. हिंदी, गुजराथी व ऊर्दू भाषेतही ज्यू समाजाचे योगदान आहे. बनी रुबेन, सिनेनट डेव्हिड, रिबेका रूबेन, डॉ. जेरूषा झिराड, निस्सीम इझीकेल, विजू पेणकर (भारतश्री), डॉ. ई. मोझेस ही आणखी काही प्रसिद्ध नावे! इझिकेल रोहेकर यांनी ज्ञानेश्वरीवर सलग आठ दिवस प्रवचने सोलापूर, अमरावती येथे दिली होती.

इस्रायलचे राष्ट्र १९४८ साली निर्माण झाल्यानंतर, जगातील अनेक देशांतील ज्यू इस्रायलला स्थलांतरित झाले. भारतात ज्यू समाजाला कोणता त्रास झाला नव्हता. ते सुखी व समाधानी होते. त्यामुळे त्या समाजातील फारच थोडे लोक १९४८ ते १९६० पर्यंत इस्रायलला गेले. इतकेच नव्हे तर तेथे गेलेल्या काही लोकांना परत भारतात यायचे होते म्हणून पंडित नेहरूंनी त्यांच्याकरता विमानही पाठवले होते. सुरुवातीला, जे १९४८ च्या आसपास गेले त्यांना राष्ट्रउभारणीसाठी फार कष्ट करावे लागले. बेने इस्रायलींचे स्थलांतर १९६४ नंतर मात्र महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात झाले. ते स्थलांतर मुख्यत्वे धर्मासाठी, मुले-नातेवाईक तिकडे गेले म्हणून किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घडून आले. मराठी भाषिक ज्यू मुख्यत्वे रामले, बेरशेवा, किर्यातगात, दिमोना या शहरांतून राहतात. इस्रायल सरकारने त्यांना घर, नोकरी अशा अनेक सुविधा पुरवल्या. अनेकांनी सैन्यातील सक्तीच्या शिक्षणामुळे इस्त्रायलसाठी लढाईत - अरब-ज्यू संघर्ष - भाग घेतला. इस्रायलच्या प्रगतीमुळे त्यांचीही आर्थिक भरभराट, कष्टाची कास धरल्यामुळे झाली. त्यांना हिब्रू भाषा शिकावी लागली. त्याबरोबरच वेश आणि खाणे-पिणे ह्यात बदल करावा लागला. आता ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ते मराठी सर्व जगभर फिरतात; अनेक वेळा भारताला भेटी देतात.

ती मंडळी इस्रायलमधील सिनेगॉग्जमध्ये भेटू लागली. तेथे स्त्रीमंडळे निघाली, त्यातून तेथे महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना झाली. ते ‘१ मे’ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात; सर्वजण एकत्र जमून मराठी पेहराव, मराठी भाषा, मराठी जेवण आवर्जून करतात. मुंबईमधून गेलेला एखादा सांस्कृतिक कलाकार कार्यक्रम सादर करतो. तसेच, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे भारताचे राष्ट्रीय सणही साजरे करतात. फ्लोरा सॅम्युअल या उच्चशिक्षित स्त्रीने सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे ‘मायबोली’ मासिक चालवले, ते अजूनही चालू आहे. त्यांना मराठी भाषा, आपला गाव, आपले शेजारी ह्यांचा विसर पडलेला नाही. येलू पेणकर नावाचे नाटकवेडे मराठी वाचनालयही लूद या शहरी चालवत असत.

मराठी ज्यू-ज्येष्ठ नागरिक मुंबईत विमानतळावर उतरला, की त्याच्या मातापित्यांच्या गावाकडील कबरीवर मेणबत्ती लावण्यासाठी सर्वप्रथम तिकडे जातो. तो कबरस्थान सुव्यवस्थित राहण्यासाठी आर्थिक निधी देतो आणि मगच पुढे भारतभेटीला निघतो. मानवी आयुष्याच्या प्रेम, कष्ट, भावनांचा ओलावा, कर्तव्यनिष्ठा या साऱ्या गुणांचे तेथे दर्शन होते.

काही लोकांच्या वाडवडिलार्जित जमिनी रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. जमिनीच्या किंमती अतोनात वाढल्यामुळे, दलाल ज्यांच्या नावावर सात-बाराचा उतारा आहे अशा इस्रायलमधील व्यक्तींचा शोध घेतात, त्यांच्या जमिनींची विक्री करून देतात. काही लोक ते पैसे इस्त्रायलमध्ये घेऊन जातात, तर काही उदार लोक तो पैसा महाराष्ट्रातील स्थानिक शाळांना, दवाखान्यांना दान करतात.

मूळ मराठी लोकांच्या इस्रायलमध्ये जन्मलेल्या पिढीचे लोकही भारतभेटीला येतात. त्यांना मराठी येत नाही तरी थोडेफार शब्द बोलतात, वडापाव-भेळ आवडीने खातात, बॉलिवूडच्या आकर्षणाने मुंबईत फिरतात, ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमामुळे शनिवार वाडा पाहण्यास मुद्दाम पुण्यास जातात.

माधव गडकरी ह्यांच्या प्रयत्नाने इस्रायलमध्ये ‘जागतिक मराठी अकादमी’चे अधिवेशन जेरुसलेम येथे १९९६ साली झाले. त्यावेळी ‘इस्रायल - माणूस आणि देश’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच सुमारास फ्लोरा सॅम्युअल ह्यांचे ‘संस्कृती संगम’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर रेचल गडकर ह्यांचे ‘आम्ही भारतवासी बेने इस्त्रायली’ हे पुस्तक व ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञ’ प्रकल्पातून मी लिहिलेले ‘इस्त्रायलची मराठी लेकरे’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली. इस्रायलच्या मराठी स्थलांतरांची कहाणी, त्यांच्या व्यथा, त्यांची कर्तबगारी आणि त्यांचा आनंद सांगणारी ही तीन पुस्तके आहेत. त्यापूर्वी ‘छळाकडून बळाकडे’ हे इस्रायलची माहिती देणारे पुस्तक नाना पालकर ह्यांनी लिहिले होते. त्यानंतर इस्रायलवर काही पुस्तके प्रकाशित झाली, एक्झोडस (अनुवादित) – नीळकंठ देशमुख; २. शालोम इस्त्रायल – अभिजित वैद्य; 3. एक होती बाय (अनुवादित) – आपटे - राजहंस प्रकाशन, ३. जेरुसलेम ओ जेरुसलेम – निळू दामले; ४. छेडिता हृदय हे (अनुवादित) – उषा तांबे - राजहंस प्रकाशन, ५. विशेष पर्व (अनुवादित) – स्नेहा महाजन, ६. जेरुसलेम एक चरित्रकथा(अनुवादित) – सविता दामले - डायमंड पब्लिकेशन ही काही महत्त्वाची पुस्तके मराठीत आहेत.

लिऑन उरीसच्या कादंबऱ्यांचे अनुवादही मराठीत झाले आहेत. ‘शायली’ नावाचे मासिक ठाण्याहून ‘इव्हज् असोसिएशन’ तर्फे प्रसिद्ध केले जाते, ‘मक्काबी’ नावाचे मासिक भाई बंदरकर व त्यांचा मुलगा रेमंड बंदरकर ह्यांनी मिळून, सदुसष्ट वर्षें चालवले. ‘मक्काबी’ नुकतेच बंद झाले आहे.

महाराष्ट्रातील ज्यूंचे वर्णन ‘सूक्ष्मदर्शी अल्पसंख्यांक’ असे करता येईल. त्यांना नुकतीच मिळालेली तशी मान्यता त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते. ज्यू धर्मीय म्हणजे नेमके कोण ते महाराष्ट्रात माहीत नसते. कोणी त्यांना ख्रिश्चन समजतात. ज्यू समाजाचे मुंबईतील कुलाबा येथील ‘छाबाड हाऊस’ही २००८ साली झालेल्या २६/११च्या अतिरेकी हल्ल्यात सापडले होते. त्यामुळे भारतात ज्यू आहेत असे अनेकांना कळले. भारतात त्यांची सिनेगॉग्ज आहेत, त्यांपैकी दहा मुंबईत आहेत, ठाणे, पनवेल, पेण, अलिबाग येथे प्रार्थना मंदिरांच्या इमारती आहेत, पण तेथे स्थानिक ज्यू नसल्यामुळे प्रार्थनेसाठी दहा माणसे जमणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यांच्या ए.जे.डी.सी. आणि ओ.आर.टी. ह्या संस्था आहेत. ज्युईश मध्यवर्ती संस्था सुद्धा आहे. इस्त्रायलमधील सधन नागरिक येथील प्रार्थना मंदिरे सुस्थितीत राहवी म्हणून देणग्या देतात. कबरस्थानातून जागा अपुरी आहे. किप्पूर, रोश-हा-शाना आणि हान्नुका(या सणांच्या) सुट्ट्या मिळाव्यात अशी ज्यू समाजाची अपेक्षा आहे. अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ येथे स्मृतिस्तंभ आहे. खंडाळा या खेड्यामध्ये ‘येलिहाउहन्नाबी’च्या रथाच्या टापांचा खडक आहे. त्या स्थानांची निगा राखली जाईल असे स्थानिकांना वाटते. ‘सर एली कदूरी’ या एकेकाळी ज्युईश विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळेत ना एकही शिक्षक ज्यू आहे ना विद्यार्थी ज्यू आहेत. मुंबईतील उरलीसुरली तरुण मुले इस्त्रायल भेटीसाठी जातात, तेथील जीवनशैली आणि झगमगाट, आर्थिक सुस्थिती पाहून इस्रायलला स्थलांतरित होतात. अल्पसंख्याक मान्यतेमुळे कदाचित महाराष्ट्रातील उरलेल्यांना अधिक सुरक्षितता, अधिक फायदे मिळतील व स्थलांतराचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वाटते.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांनी तेल अवीव येथे मराठी भाषा शिकवण्याची सोय करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तेथील युवकही महाराष्ट्राकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. ४ जुलै २०१६ रोजी, ‘तेल अवीव विद्यापीठा’त मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू झाले आहेत. ही मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने त्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातून सरकारने विजय तापस, कादंबरी भंडारी आणि सोनल गुजर ह्या तीन प्राध्यापकांना तीन महिन्यांसाठी इस्रायलला पाठवले आहे. ‘तेल अवीव विद्यापीठा’तील सव्वीस विद्यार्थी तेथे ‘ग म भ न’चे धडे घेत आहेत. पुढील पिढीमध्ये मराठी आणि महाराष्ट्र या त्यांच्या पूर्व भूमीतील भाषेविषयी, प्रदेशाविषयी औत्सुक्य व आत्मीयता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
  
ज्यू प्रार्थनेत, ‘आम्ही जेरुसलेमला विसरलो तर उजवा हाता कापा’ असे म्हणतो. मराठी ज्यू ‘आम्ही भारताला विसरलो तर दोन्ही हात कापून टाका’ असे सांगतो तेव्हा ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या ओळी आठवतात.

- संध्या जोशी

लेखी अभिप्राय

Article is too good. Nice information about the Jewish community.

shirish lele20/07/2016

संध्या जोशी यांनी अतिशय उत्तम लेख लिहिला आहे. विषय अतिशय वेगळा आहे व थोडासा दुर्लक्षित, पण त्यावर परिश्रमपूर्वक माहिती संकलित करून अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. संध्या अभिनंदन!

अनुराधा म्हात्…20/07/2016

अतिसुंदर लेख, कि ज्यांच्‍यामुळे ज्यू लोकांच्‍या इतिहासाची माहिती मिळाली आणि त्यांचे योगदान भारतासाठी इतर अल्पसंकीक लोकांपेक्षा उजवे ठरते. आणि विशेष म्हणजे त्यांची प्रार्थना देशप्रेम दाखवते.

Paresh Patil20/07/2016

Very good information.

Aparna Gitay20/07/2016

संध्या ताई, अभ्यासपूर्ण लेख . एवढा मोठा विषय छान शब्दात लिहीलात. छान!

लीना जोशी20/07/2016

Khup sunder mahiti milali

aparna sanjau …21/07/2016

Very good. Now each and every Indians will know about the Jews in India. Thanks to the India as well as Maharashtra govts. I am very anxious to see and discuss with you on this subject. Thanks once again and waiting your positive reply.

Joel s. bandarkar22/07/2016

Sunder lekh aahe

Mary David Chordekar22/07/2016

अतिशय अभ्यासपूर्ण व सविस्तर माहिती देणारा लेख. महाराष्‍ट्र सरकारने त्यांंना अल्पसंख्यांंकांंचा दर्जा देऊन खूप चांंगले काम केले. संध्याजी आपल्या लेखाबद्दल धन्यवाद!

प्रशांंत संंपते22/07/2016

In 1960s my mother Rebecca, as Gov. Servant, applied to the authorities at that time, to grant the Indian Jews holiday on their high holidays as we are 'ATI alp sankhyank'. After few years only , 'Yom Hakippurim' was accepted as a holiday for the Jews!

Esther R Bamnolkar22/07/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.