बाळासाहेब मराळे - शेवग्याचे संशोधक शेतकरी


सिन्नर तालुक्यातील शहा नावाचे गाव. तेथे राहणाऱ्या बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने शेवग्याची शेती करून रोहित-१ नावाचे वाण शोधून काढले आहे. शिक्षित तरूण बेरोजगार ते संशोधक शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. शहा सिन्नर तालुक्यापासून पंचवीस-तीस किलोमीटरवर आहे. शहा रस्ता बराच कच्चा होता. राज्य शासनाने ज्या शेतकरी संशोधकाला कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या शेतकऱ्याच्या गावाला नेणारा साधा रस्ताही बऱ्या अवस्थेत नव्हता. यथावकाश व यथाकष्ट आम्ही गावात शिरलो. गावातून पाच मिनिटांच्या अंतरावर आम्हाला ‘बाळासाहेब मराळे यांच्या शेवगा नर्सरी फार्मकडे’ असा फलक दिसला. पुढेही पुन्हा तसाच दिशादर्शक फलक होता.

मराळे यांचा प्रवास म्हणजे, प्रतिकूल परिस्थितीलाच त्यांचे सामर्थ्य बनवून त्यातून नवी वाट धुंडाळण्याचा अनुभव आहे. मराळे यांच्या शेवगा शेतीचा प्रसार देशापरदेशात होऊ लागला आहे. त्यांनी शोधलेल्या रोहित-१ या नवीन शेवगा वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही चांगले अर्थार्जन होऊ लागले आहे. मराळे यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँडसमध्ये जाऊन अभ्यास करण्याची संधी त्यांना दिली तसेच, ‘कृषिभूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला आहे. वेगवेगळ्या संघटना, संस्थांकडूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.

मराळे यांनी १९९४ मध्ये नाशिक येथून आय.टी.आय.ची पदवी घेतली. शिक्षणानंतरही नोकरीतील अशाश्वतपणा त्यांच्या अनुभवण्यात येत होता.१९९७ चे वर्ष होते. त्यावेळी ते पुण्यात एका कपंनीत नोकरीला होते. ते सहा महिने झाले, की ब्रेक देणाऱ्या कंपन्यांना वैतागून गेले होते. त्याच सुमारास मंदीची लाट आली आणि कंपनी बंद पडली. त्यामुळे मराळे यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. घरच्या शेतीची नाळ सुटलेली नव्हतीच. त्यांच्या मनात गावी परतून शेती करावी असा विचार येऊ लागला. गावी परतण्याच्या आधी ते पुण्याच्या गुलटेकडी बाजारपेठेत विविध शेतीमाल पाहण्यासाठी गेले. तेथे त्यांना ट्रकच्या ट्रक भरून शेवगा आलेला दिसला. शेवग्याचे उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात पाहून ते थक्क झाले. त्यांनी त्याबाबत पाठपुरावा केला आणि त्यांना समजले, की शेवगा तामिळनाडू व गुजरातेतून महाराष्ट्रात विक्रीसाठी येतो! महाराष्ट्रात त्या काळी फारसा शेवगा दिसायचा नाही. गावी तर शेवगा खाऊ नये वगैरे प्रकारचे गैरसमज असल्याचेही त्यांना जाणवू लागले! तशा परिस्थितीत त्यांनी शेवगा शेतीच्या अभ्यासाला प्रारंभ केला.

त्यांना महत्त्वाची अडचण दिसत होती ती पाण्याची. शहा गावचा परिसर वर्षानुवर्षें अवर्षणग्रस्त भाग. उन्हाळ्यातील दोन-तीन महिने तर पाण्याचे दुर्भीक्ष्यच. त्यांच्या वाट्याला आलेली जमीनही खडकाळ माळरानाची होती. तेथे पाणी मुरायचे नाही. शेती करण्यासाठी पुरेसा पैसाही नाही. तशा सगळ्या परिस्थितीने ग्रस्त असताना मराळे यांनी १९९९ मध्ये शेवगा लागवड सुरू केली.

मराळे सांगतात, शेवग्याचे एकरी उत्पन्न किती मिळते, पाणी किती द्यावे लागते. याविषयी मी आडतदारांकडून माहिती मिळवू लागलो. त्यानंतर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील, चेन्नई, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूतील शेवगा उत्पादकांच्या भेटी घेतल्या.१९९७ मध्ये चेन्नई परिसरातील एका शेतकऱ्याकडे चाळीस एकर शेवगा शेती होती. ऐन उन्हाळ्यातही शेवग्याचा बहर पाहून विश्वास वाढला. पाणी नसताना झाड मरत नाही पण त्याला त्या कालावधीत शेंगा येत नाहीत हे कळले. त्यानंतर पुणे, मुंबई, सुरत येथील बाजारपेठांना भेटी देऊन शेवग्याच्या शेंगाच्या बाजारपेठांचा अभ्यास केला आणि शेवगा लागवडीचा निर्णय पक्का झाला. सुरुवातीस, दोन एकर क्षेत्र त्या पिकासाठी निवडले. ठिंबक सिंचनाने पाण्याचे योग्य नियोजन केले. सहा महिन्यांनी उत्पादन सुरू झाले. पहिल्या सहा महिन्यांतच लागवडीचा खर्च जाऊन एक लाख सत्तेचाळीस हजार रूपये मिळाले. त्यामुळे उत्साह वाढला आणि घरच्यांचा विरोधही मावळला. मुंबईतील कृषीमालाच्या बाजारपेठेतील पुढील शोधात आकर्षक गर्द पोपटी हिरवा रंग, गोड गर, अधिक टिकवणक्षमता, मध्यम आकार असलेल्या शेंगांना निर्यातीसाठी मागणी असते हे समजले. त्यानुसार उत्पादनामध्ये सुधारणा केल्या. व्यापाऱ्यांमार्फत शेवगा आखाती तसेच युरोपीय देशातील इंग्लंड-फ्रान्स-जर्मनीत निर्यात केल्या. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा तीस ते चाळीस टक्के अधिक दर मिळाला.

मराळे यांनी १९९९ पासून शेवगा उत्पादनाला सुरूवात केली. कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी देखील झाले. विविध प्रयोग करत त्यांना या पिकातील अनुभव दांडगा मिळाला. त्यांनी लावलेल्या शेवग्याच्या अठरा वाणांपैकी एका झाडाचे उत्पादन आणि गुणवत्ता त्यांना विशेष वाटली. त्यांनी निवड पद्धतीच्या संशोधनासाठी त्या झाडाची निवड करून २००१ ते २००५ या पाच वर्षांत त्या झाडाची निरीक्षणे, नोंदी, उत्पन्न व गुणवत्ता यांचा अभ्यास केला. तसेच, त्याची स्वतंत्र प्लॉटमध्ये लागवड केली. त्या वाणाचा आकर्षक गर्द हिरवा रंग, मध्यम लांबी, चवदारपणा हे गुण ग्राहकांच्या व निर्यातदारांच्या पसतीस उतरणारे होते. निवड पद्धतीने संशोधित केलेल्या त्या वाणाचे त्यांनी त्यांच्या मुलाचे ‘रोहित-१’ असे नामकरण केले.

वाराणसी येथील अखिल भारतीय भाजीपाला संशोधन केंद्रात त्या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. तामिळनाडू कृषी विद्यापीठाने २०१० मध्ये त्या वाणास मान्यता देऊन तो निर्यातयोग्य उत्तम दर्ज्याचा वाण असल्याचे घोषित केले.

मराळे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून शेवगा शेतीत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. सेंद्रीय व रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि कमी पाण्यात उत्पादन यासाठी त्यांचे प्रयोग महत्त्वाचे आहेत. मराळे यांची सहा एकर जमिनीत शेवग्याची लागवड सुरू आहे. त्यापैकी तीन एकर शेतातील शेवगा विक्रीतून त्यांना वार्षिक दीड ते अडीच लाख रूपये मिळतात. उर्वरित तीन एकर जमिनीत यंदाच्या वर्षी लागवड केल्याने त्याचा फायदा यंदाच्या वर्षापासून मिळेल. मूळात त्यांचे गाव दुष्काळी पट्यात आणि तेथील जमीन हलकी व बरड आहे. परंतु ते योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर उत्पादनात अग्रेसर ठरले आहेत. त्यातून त्यांचा मराळे शेवगा पॅटर्न तयार झाला आहे. लागवडीची पद्धत, छाटणीतंत्र व खत व्यवस्थापन या गोष्टी त्या पॅटर्नमध्ये येतात. हलक्या बरड जमिनीसाठी १० बाय ६ फुट एकरी सातशे झाडे तर मध्यम भारी जमिनीसाठी १२ बाय ६ फुट एकरी सातशे झाडे ही पद्धत उपयुक्त असल्याचे ते सांगतात. त्यांचे हे प्रयोग पाहण्यासाठी दररोज पाच ते दहा शेतकरी येतात.

त्यांनी फक्त शेवगा रोपांची स्वतंत्र नर्सरी सुरू केली आहे. त्यातून उच्च दर्ज्याच्या रोपांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना पुरवली जातात.

रोहित-१ ह्या शेवग्याच्या वाणाला लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. वर्षांत दोन बहर मिळतात. शेंगांची लांबी दीड ते दोन फूट असून शेंगाचा रंग गर्द हिरवा आहे. पहिल्या सहा महिन्यांत प्रतिझाड दहा ते पंधरा किलो उत्पन्न मिळाले आहे. पाच वर्षें वयाच्या झाडापासून पस्तीस किलो तर दहा वर्षें वयाच्या झाडापासून साडेबासष्ट किलो उत्पन्न मिळाले आहे. लागवडीपासून दहा वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. इतर शेवगा जातीच्या शेंगा लालसर रंगाच्या होतात.

जपानमधील महिला कृषितज्ज्ञ साईयाको ताकीओ आणि ओकोबो मिको मराळे यांच्याशी संपर्क साधला. त्या कृषितज्ज्ञांनी मार्च २०१२ मध्ये मराळे यांची शेती, प्रयोग पाहिले. त्यानंतर त्या पुन्हा ऑगस्ट २०१२ मध्ये मराळे यांच्या शेतावर येऊन काही बियाणे व रोपे घेऊन त्यांची लागवड जपानमधील कुमिटोमो प्रांतात केली. त्यांनी रोहित-१ वाणाची तीन ते चार एकरावर लागवड केली असून पुढील टप्प्यात ऐंशी एकरावर लागवडीचे नियोजन आहे.

या सगळ्या कामासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांचीही साथ मिळते. त्यांचे पुतणे नामदेव मराळे व गोरक्षनाथ मराळे हे प्रत्यक्षरित्या त्यांना शेतीच्या कामात मदत करतात. यांसह लहान-मोठे एकूण तेरा जण कुटुंबात आहेत. वेळ व आवश्यकता असल्यास ही इतर मंडळीही त्यांच्या ‘मराळे पॅटर्न’ला आपला हातभार लावतात.

बाळासाहेब मराळे - 9822315641

- हिनाकौसर खान

लेखी अभिप्राय

उत्कृष्ट माहितीबद्दल धन्यवाद! परंतु रोहित या नावाखाली भेसळयुक्त बियाणे बाजारात विकले जाते. शुध्द बियाणे मिळेल का?

गजानन प्रकाश स…17/06/2016

छान माहिती!

मंगला घरडे ग़ा18/06/2016

मराळे स्वत: रोपं करून विकतात. त्यांची स्वत:ची नर्सरी आहे. अन्यत्र कोठेही त्याची विक्री केली जात नाही. त्यामुळे फसगतीपासून वाचण्यासाठी थेट मराळे यांच्याशी संपर्क साधावा.

अज्ञात05/07/2016

मला तुम्हाला भेटायचं आहे. शेवगा लागवडी विषयी माहिती साठी.

Dr Yogesh Mar…16/09/2016

छान माहीती

Dhikale Tukaram 13/10/2017

शेवग्याचे मार्केटिंग विषयी माहिती द्यावी ही विनंती
. मला मार्केटींगची खात्री झाल्यास जून १८ मध्ये ३ एकर लागवड करायची आहे . गाव मलकापूर जि बुलढाणा

अरूण तायडे04/02/2018

शेवग्याचे मार्केटींगविषयी माहिती द्यावी ही विनंती .

अरूण तायडे04/02/2018

छान माहीती .वाचून शेवगा लागवडीची हिम्मत येत आहे .

अरूण तायडे04/02/2018

छान !

अरूण तायडे04/02/2018

छान माहिती आपण बियाणे पाठवू शकाल काय,

प्रभाकर चव्हाण08/02/2018

मला रोहीत १ चे बी मिळेल काय

Nikrad Sandip12/02/2018

शेवगा लागवड बिनधास्त करा! मार्केटिंग किंवा विक्री साठी मला संपर्क साधा! dattatathele@gmail.com
पणन विभागामार्फत विक्रीसाठी मदत मिळेल!

Datta Tathele18/03/2018

शेवग्याच्या मार्केटिंगची माहिती द्यावी ही विनंती मला मार्केटिंगचीा खात्री झाल्यास शेवगा लागवड गाव खामगाव जि बुलढाणा

abhishek lahudkar22/03/2018

खुप छान माहीती दिली मी वावी घोटेवाडी दुष्काळी भागातील व्यक्ती मला हे जमेल का मला तुम्हाला भेटायचे

Gorkh chattar23/05/2018

लागवडी संदर्भा त पुस्तक असेल तर बरे होई

रणधीर वी र07/10/2018

सर, बियाणे मिळेल का? 8788790652

राम सिंगल06/03/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.