पुणे शहरातील पहिला पुतळा: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


पुणे शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात तीन पुतळे उभारले गेले. त्यात १. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मंडईमधील (लॉर्ड रे मार्केट) पूर्णाकृती पुतळा, २. त्याच वर्षी मंडईत उभारलेला विष्णूशास्त्री कृष्ण चिपळूणकर यांचा अर्धपुतळा. (हे दोनही पुतळे १९२४ साली उभारले गेले), ३. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांचा समावेश होतो. शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दीनिमित्त (म्हणजे १९२८ मध्ये) उभारला गेला. असे असले तरी शिवस्मारक उभारण्याची वाटचाल १९१७ सालापासून सुरू झाली होती. या तिन्ही पुतळ्यांचा इतिहास अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या राजकारणावर टिळकवाद्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्याचे नेतृत्व न.चि. केळकर यांच्याकडे आले. केळकर हे पुणे नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष १९२२ साली झाले. त्यामुळे पुणे नगरपालिकेवर टिळक विचारांच्या नेत्याचे व त्यांच्या राजकीय प्रभावाखालील व्यक्तींचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी टिळकांचे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. विलास पायगुडे यांनी लिहिलेल्या ‘शिल्पकथा’ या पुस्तकात म्हटले आहे, की १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे निधन झाल्यावर त्यांचे भव्य तैलचित्र नगरपालिकेत लावावे अशी सुचना ४ ऑगस्ट १९२० रोजी करण्यात आली. परंतु त्यांचा संगमरवरी पुतळा बसवावा असे नगरपालिकेमध्ये १७ ऑगस्ट १९२० रोजी ठरले. त्यानंतर झालेल्या १९ नोव्हेंबर १९२० रोजीच्या सभेत पुतळ्यासाठी पंधरा हजार रुपये खर्च करावेत व शिल्पकार ब्रह्मेश वाघ यांना ते काम द्यावे, वाघ यांना सहा हजार रुपये आगाऊ द्यावेत असा ठराव २१ डिसेंबर १९२१ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. परंतु सरकारी हिशेब तपासणीसाने अशी रक्कम खर्च करता येणार नाही असे १९२२-२३ साली सांगितले. कलेक्टरनेही मनाई हुकूम आणला. ज्यांनी सहा हजार रुपये देवविले त्यांच्याकडून वसूल करावेत यासाठी जिल्हा कोर्टात दावाही दाखल करण्यात आला. अशा वेळी पंधरा हजार रुपयांची जबाबदारी व पुतळा बसवण्याची जबाबदारी न.चि. केळकर यांनी घेतली. केळकरांनी ४ जुलै १९२४ रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत ‘केसरी-मराठा’ विश्वस्तांचे पत्र वाचून दाखवले. त्या पत्रात, ‘लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासंबंधी शहर नगरपालिका व सरकार यांच्यामध्ये वाद उत्पन्न झाल्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्टात फिर्याद दाखल झाली आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत नगरपालिकेने पुतळ्यासंबंधी कोणताही खर्च करू नये’ अशी कोर्टाची ताकीद आहे. यावर ‘केसरी-मराठा’ संस्थेचे ट्रस्टी या नात्याने आम्ही योजले आहे, की कराराप्रमाणे वाघ यांना नऊ हजार व पुतळा उभारण्यासाठीचा खर्च एक हजार रुपये असे मिळून दहा हजार रुपये आम्ही नगरपालिकेस अॅडव्हान्स द्यावेत. नगरपालिकेने कोर्टाचा हुकूम न मोडता ही रक्कम वाघ यांना द्यावी. नगरपालिकेस अनुकूल निकाल झाल्यास आमची रक्कम वाघ यांना द्यावी... निकाल विरूद्ध झाल्यास आम्ही ती परत मागणार नाही... अशी हमी मिळाल्यानंतर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्याचा ठराव बत्तीस विरूद्ध तीन अशा मतांनी मंजूर झाला. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठी नगरपालिकेने काही खर्च करू नये हा सरकारचा दावा अखेर न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे नगरपालिकेला पुतळ्यासाठी खर्च करता आला.

मुंबईचे शिल्पकार ब्रह्मेश वाघ यांनी लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा पांढ-या संगमरवरात घडवला. तो पुतळा पुण्यातील महात्मा फुले मंडईमध्ये बसवण्यात आला. पुतळ्याचे अनावरण २२ जुलै १९२४ रोजी पं. मोतिलाल नेहरू यांच्या हस्ते केले गेले. त्याच वर्षी त्याच ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या आरंभी विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याचे अनावरण महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष न.चिं. केळकर होते. आणि त्यांच्यामागे निर्विवाद बहुमत असल्याने टिळक-चिपळूणकर यांचे पुतळे राज्यकर्त्यांच्या नापसंतीची पर्वा न करता नगरपालिकेला बसवता आले.

टिळक व चिपळूणकर यांचे पुतळे उभारले गेले या घटनेमुळे पुण्यातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, टिळक-फुले वाद उफाळून वर आला. त्याचे परिणाम वृत्तपत्रातून होणाऱ्या टीकाटिपण्ण्या, सभा-मेळावे, मेळ्यांच्या माध्यमातून पद्यांची निर्मिती, ‘देशाचे दुश्मन’ यासारख्या ग्रंथाची निर्मिती आणि त्यावरून झालेल्या कोर्टकचेऱ्या व शिक्षा इत्यादी सर्व प्रकार पुतळा उभारण्याच्या प्रयत्नातून पुढे आलेत. त्यामुळे पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पुतळा उभारला जावा असा ठराव १९२५ साली ब्राह्मणेतरांचे तरुण नेते केशवराव जेधे यांनी पुणे नगरपालिकेत मांडला. त्यावेळी लक्ष्णराव आपटे हे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. जेधे यांनी मांडलेल्या ठरावास ब्राह्मण (लवाटे, दामले, दंडवते वकील, दा.वि. गोखले, डॉ. फाटक) व ब्राह्मणांच्या बाजूने उभे असलेल्या ब्राह्मणेतर सदस्यानींही (बाबुराव फुले, रंगोबा लडकत, नारायण गुंजाळ, किराड, मुदलियार, डॉ. नायडू, भगत, बारणे इत्यादी) कडाडून विरोध करून फेटाळून लावला.“टिळकांचे ब्राह्मणेतरांवर फार प्रेम होते. त्यांच्या पासंगालासुद्धा ज्योतिबा उरणार नाहीत”असा निर्वाळा रंगोबा लडकत यांनी दिला. तर“असला धर्मद्रोही माणूस फुल्यांच्या घरात जन्मला म्हणून आम्हाला लाज वाटते”असे बाबुराव फुले म्हणाले. या घटनेमुळे पुणे शहरात व महाराष्ट्रात परस्पर विरोधी संघर्ष सुरू झाला. तो निरनिराळ्या पातळ्यांवरून पुढे आला. या परिस्थितीचे पडसाद त्या वर्षीच्या गणेशोत्सवातील ‘मेळ्या’मध्ये उमटले. टिळक व चिपळूणकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेविरूद्धची प्रतिक्रया म्हणून छत्रपती मेळ्याने पद्ये केली. त्यांनी त्यांचा संताप मेळ्यातील पदांतून व्यक्त केला होता... १९२५ साली टिळक पुतळ्याची विटंबणा होईल या भीतीने पोलिसांची मदत मागितली गेली... टिळकांच्या पुतळ्याभोवती पोलिसांचा गराडा पडला होता... छत्रपती मेळ्याने, आपली पद्ये जोगेश्वरीच्या गणपतीपुढे सादर केली. त्यावेळी लोकसमुदाय दोन हजारांवर असल्यामुळे ब्राह्मण समाजाला ते आवडले नाही. त्या पदांमुळे चिडलेल्या ब्राह्मण श्रोत्यांनी ब्राह्मणेतरांबरोबर चक्क मारामारी केली होती.

टिळक व चिपळूणकर यांच्या कार्यावर टीका करणारे ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक दिनकरराव जवळकर यांनी लिहिले. त्या ग्रंथाविरूद्धची प्रतिक्रिया म्हणून १७ सप्टेंबर १९२५ रोजी पुण्यातील हिंदू नागरिकांची सभा शिवाजी मंदिरात भरली होती. त्या सभेत आक्षेपार्ह लेखनाचा निषेध करणारा ठराव वामनराव पोतदार यांनी मांडला. इतकेच नव्हे तर टिळक अनुयायांनी जेधे,जवळकर, बागडे, लाड यांच्यावर खटले भरून त्यांना न्यायासनासमोर खेचण्यात आले. श्रीकृष्ण महादेव चिपळूणकर वकील यांनी ‘देशाचे दुश्मन’ पुस्तकाने चिपळूणकर घराण्याची बदनामी होते या आरोपावरून सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्या न्यायालयात फिर्याद केली. याच पुस्तकाने लोकमान्य टिळक यांची बदनामी केली जात आहे अशी फिर्याद श्रीधर बळवंत टिळक यांनीही फ्लेमिंग यांच्यासमोर केली. फ्लेमिंग यांनी १५ सप्टेंबर १९२६ रोजी ‘देशाचे दुश्मन’ खटल्याचा निकाल दिला. त्यात, ‘पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर व मुद्रक रामचंद्र नारायण लाड यांना प्रत्येकी एक वर्षाची साधी कैद व अडीचशे रुपये दंड व दंड न दिल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. केशवराव जेधे व प्रस्तावना लेखक केशवराव बागडे यांना प्रत्येकी सहा महिने कैद व शंभर रुपये दंड आणि दंड न दिल्यास दोन महिने कैद अशा शिक्षा सांगण्यात आल्या.

चिपळूणकर-टिळक यांच्यावर जवळकर ज्या तऱ्हेने चिखलफेक करत होते त्याच तऱ्हेने महात्मा फुले यांच्यावरही त्याच काळात विरोधकांकडून चिखलफेक होत होती. ‘सत्यशोधक का ख्रिस्तसेवक’ या शीर्षकाची एक पुस्तिका गणपतराव नलावडे यांनी प्रकाशित केली होती. ती पुणे नगरपालिकेच्या सभासदांना वाटण्यात आली होती. विश्वनाथ फुले या ज्योतिरावांच्या चुलतभावाच्या नातवाने या पुस्तकास प्रस्तावना लिहिली होती... भाऊबंदांनी भरीला घातल्यामुळे आपण प्रस्तावना लिहिली असे विश्वनाथ फुले यांनी काही महिन्यांनी माळी समाजाच्या परिषदेत कबुली देऊन माफी मागितली होती...

चिपळूणकरांचा पुतळा मंडईत कशाला? असा वाद सुरू झाला आणि म्हणून तेथील पुतळा हलवून तो टिळक रस्त्यावरील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या प्रवेशद्वारापाशी बसवला गेला, अशी माहिती पुणे शहराच्या ज्ञानकोशात मिळते.

- डॉ. सोपान रा. शेंडे

(मूळ लेख - त्रैमासिक 'इतिहास शिक्षक')

Last updated on - 19th Jan 2017

लेखी अभिप्राय

Lekh changalya ritine prashidha kela. Dhanyavad!

dr.Sopan Shende27/04/2016

खूप सुंदर माहिती आहे .

अज्ञात28/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.