कोकणातील गावपळण


कोकणातील अनेक गावांमध्‍ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली 'गावपळणा'ची किंवा 'देवपळणा'ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा.

‘गावपळण’ म्हणजे गावातून वेशीबाहेर पळून जाणे! अर्थात, नेहमीच्या गावातील घर सोडून गावकुसाबाहेर वस्तीला जाणे. तो कालावधी साधारणत: तीन दिवस व तीन रात्रींचा असतो. ‘गावपळण’ साधारणत: देवदिवाळीनंतर किंवा महाशिवरात्र व शिमगोत्सवादरम्यान होते. गावकरी त्यांच्या ग्रामदैवताचा कौल घेऊन गावपळणीचा दिवस निश्चित करतात. निर्धारीत कालावधीनंतर पुन्हा देवाचा कौल घेऊन गावात परतात. ‘गावपळणा’च्‍या काळात गावातील सर्व माणसे गुरे-ढोरे, कुत्रे-मांजरी, कोंबड्या व पाळीव पक्षी यांच्यासह तीन दिवस पुरेल इतके धान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे व पैसाअडका आदी गोष्टी सोबत घेऊन जातात. ग्रामस्थ कौल मिळाल्यानंतर जागा पक्की करण्यासाठी शेजारच्या गावात, नदीकिनारी अथवा वेशीवरच्या माळरानावर (सड्यावर) जाऊन झोपडी किंवा राहुटी उभारणीच्या कामाला लागतात. गावपळणाच्‍या तीन दिवसांच्‍या काळात संपूर्ण गावात नेहमीच्या वर्दळीऐवजी स्मशानशांतता पसरलेली असते. ग्रामस्‍थांची त्या काळात ओस पडलेल्‍या गावातील घरा-दाराची काळजी वा चिंता नसते. प्रत्येकाचे कुटुंब गावाबाहेर स्वतंत्र झापाच्या झोपडीत किंवा कावनात तात्पुरता संसार थाटून दैनंदिन जीवन जगत असतात, तेही भांडणाशिवाय! वेशीवर संपूर्ण गावानेच ठाण मांडलेला असल्याने जणू काही ‘महावनभोजन’ असल्याप्रमाणे तो महाउत्सव असतो.

गावकरी गावाबाहेर राहण्याच्या जमिनी शेणाने सारवतात. त्यांच्या जेवणावळीही लज्जतदार असतात. नदीतील माशांचे कालवण, खेकडा, कोंबडीचे मटण, शिकारीचे मटण असे चमचमीत व खुमासदार भोजन म्हणजे पर्वणीच असते. रात्री एकत्र भजने, गाण्‍याच्‍या भेंड्या, अंताक्षरी, बायकांच्या फुगड्या आदी करमणूकीचे कार्यक्रम असतात. बच्चे कंपनीचीही धमाल असते. त्यात ना कुठे खंत, भांडण ना वैर! त्यातून गावपण व सलोखा जपला जातो व सामाजिक संबंध दृढ होण्यास मदत होते.

एरवी चार भिंतींत संसार मांडणारे गावकरी भटक्या जमातीप्रमाणे जीवनाचा आनंद मनसोक्त उपभोगताना दिसतात. गावपळणात काही चाकरमानीही सामील झालेले असतात. पोलीस कर्मचारीही त्यांचा वेगळा संसार थाटून आनंद लुटतात. लोकांना रोजच्या काबाडकष्टांपासून काही दिवस मोकळीक मिळावी हा त्या परंपरेमागचा दृष्टिकोन आहे. ‘गावपळणी’त श्रीमंतांपासून गरिबापर्यंत सर्वांनी एकत्र यावे, त्‍यांच्‍यातील एकोप्‍याची भावना वाढीस लागावी हा त्‍या कृतीमागचा उद्देश असल्याचे मानले जाते.

वैभववाडीतील साडेचारशे वर्षांपासून शिराळे गावात ‘गावपळण’ पाळली जाते. तिचा कालावधी आठवडाभराचा असतो. ती दरवर्षी साजरी केली जाते. गावपळणाच्‍या काळात तेथील शाळा उघड्या माळरानावर भरते. शेजारच्या सडुरे गावात माळावर सर्वांचे आठवडाभरासाठी वास्तव्य असते. रात्री मनोरंजनासाठी भजन, तमाशा, पथनाट्य अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जवळच्या गावातील लोक ते पाहण्यास आवर्जुन उपस्थित असतात.

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा व चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्‍ये शिराळे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील वाघण आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते. सध्या लांजा येथील वाघण गावची ‘गावपळण’ तिचा कालावधी कमीजास्त करण्याच्या कारणावरून ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद करण्यात आली आहे. मुणगे गावात काही समाजाचीच माणसे ‘गावपळणी’ची प्रथा पाळतात.

वायंगणीत श्रीदेव रवळनाथाच्या रात्रीत होणाऱ्या देवपळणीनंतर गावकऱ्यांची ‘गावपळण’ सुरू होते. आचरे येथे रामेश्वराच्या मंदिरातील तोफांचे आवाज झाल्यावर ‘गावपळणी’ला प्रारंभ होतो. तेथे अन्य धर्मांचेही लोक सामील होतात. शेतकरी शेतीची सर्व कामे आवरून मोकळा झाल्याने ‘गावपळणी’च्या आदेशाकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात. त्यात चाकरमानी आनंदाने सहभागी होतात. काही काळ निसर्गाच्या कुशीत, आभाळाच्या छायेत, स्वच्छंदी वातावरणात नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळा अनुभव घेत असतानाच सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्याचे महत्त्वाचे कार्यही ‘गावपळणी’च्या माध्यमातून होत असते. गावपळणीची परंपरा सुरु होण्यामागे विविध दंतकथाही सांगितल्या जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, भूतभुताटकीचा वावर किंवा सतीच्या शापांची पूर्तता असे अनेक संदर्भ येतात.

‘गावपळणी’चा कालावधी संपण्यापूर्वी गावातील बारा-पाचाचे मानकरी त्यांच्या ग्रामदैवताकडे जाऊन पुन्हा परतीचा कौल घेतात. तो मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थ त्यांच्या सामानाची बांधाबांध करून मूळ घराकडे परतण्यास उत्सुक असतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, समाधान असते. निर्मनुष्य झालेले गाव पुन्हा एकदा गजबजल्याने दैनंदिन जीवनाला प्रारंभ होतो. सर्व कौटुंबिक, व्यावहारिक व शासकीय व्यवहार पुन्हा सुरळीत होतात. त्या अनोख्या प्रथेची दखल घेऊन पूर्वीच्या ‘गावपळणी’चे जर्मनीतील काही हौशी पर्यटकांनी चित्रिकरण केले होते. 2014 साली गतवर्षी त्या संबंधीच्या छायाचित्रांचे कणकवली येथे प्रदर्शन भरवण्यात आले असे समजते.

मनाला आल्हाददायक, आगळीवेगळी परंतु वैशिष्ट्यपूर्ण ‘गावपळण’ जशी कोकणात पाहायला मिळते, तशी ती कोल्‍हापूर येथील टिक्‍केवाडी नावाच्‍या गावातही अस्तित्‍वात आहे. तेथे त्या प्रथेला 'गुळं काढण्‍याची प्रथा' असे म्‍हटले जाते. कदाचित महाराष्‍ट्रातील इतरही काही गावांत ही परंपरा  एकाच प्रकारची ती परंपरा वेगवेगळ्या प्रदेशांमध्‍ये अस्तित्‍वात असल्‍याचे

- पांडुरंग भाबल

लेखी अभिप्राय

Maharashtratil ha sanskritik thsva shodhun eaktra kela tar Maharashtratil sanskriti vaibhav samruddh hoil. lekhak v Think Maharashtra yenna Dhanyavad!

Dr. S.R. Shende27/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.