‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - महाराष्ट्राचे समग्र चित्र

5 मार्च 2010

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.

वेबसाइट हे कोणतीही माहिती तत्क्षणी जगभर पोचवण्याचे साधन आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टि.व्ही. चॅनेल्सच या माध्यमांच्या तुलनत वेबसाईटची माहिती साठवण्याची क्षमता मोठी आहे. त्यास ऑडिओ, व्हिडीओ अशा इतर माध्यमांची जोड देऊन माहिती अधिक परिणामकारतेने सादर करता येते. तसेच त्यात कोणताही मजकूर शोधून मिळवता येतो. तो कधीही सुधारता येतो. म्हणून 'व्हिजन महाराष्ट्रा'ने उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी इंटरनेट हे माध्यम निवडले.

वाढत्या ‘ग्लोबल’ वातावरणात ‘लोकल’ स्वरूप झपाट्याने नष्ट होत असल्याची भावना जगभर, प्रांतोप्रांती व देशोदेशी आहे. आपणास ‘थिंक महाराष्ट्र’मार्फत महाराष्ट्रीय समाजापुरता त्या भावनेचा आदर करून आपल्या प्रदेशाचे व संस्कृतीचे संचित जपण्याचे उपक्रम हाती घेता येऊ शकतील आणि तसे काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचे कार्य समाजासमोर सातत्याने मांडता येईल. ही अभूतपूर्व कल्पना आपल्या काळात निर्माण झाली व विकास पावली याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल! कारण 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' हे मॉडेल ठरू शकेल व त्या धर्तीवर 'थिंक कर्नाटक', 'थिंक पंजाब', 'थिंक बंगाल', एवढेच काय 'थिंक स्वीडन', 'थिंक कोरिया' यांसारखे प्रयत्न त्या त्या समाजात आकार घेऊ लागतील.

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.

१. मराठी कर्तृत्वाची नोंद - समाजातील सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांची उपेक्षा होते. दुसरीकडे लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित-नेने, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून घेतली जातात. त्या व्यक्तींना आदर्श म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात असे अनेक आदर्श गाव-खेड्यांपासून शहरांपर्यंत विखुरलेले आहेत. त्यांच्यावर प्रसिद्धीचा लाईमलाइट पोचू न शकल्याने ते अज्ञात राहतात. सेलिब्रिटींसोबत मराठी समाजातील सर्व कर्तृत्ववान मंडळींची माहिती संकलित करून ती 'थिंक महाराष्ट्र'वर मांडली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांतील आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाची नोंद तर होईलच, पण सोबत सर्वसामान्यांमध्ये दडलेली ताकद-ऊर्जा व्यक्त होईल. त्यातून महाराष्ट्रीय समाजातील आत्मविश्वास जागा होऊन महाराष्ट्रीय माणसाचा न्यूनगंड नाहीसा होईल असा विश्वास आहे.

२. स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांच्या निरलस कार्याचा आढावा - महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे गांधीजी म्हणत. कर्नाटकाला सात ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले तर त्या काळात महाराष्ट्राला सात मॅगसेसे अॅवार्ड मिळणे स्वाभाविक ठरले. 2014 मध्येही महाराष्ट्राला दोन मॅगसेसे पुरस्कार लाभले! महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे आहे. त्यांचे काम, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अर्थकारण ह्यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडू शकलो व त्या क्षेत्रातील घडामोडी नित्य कळवू शकलो तर ते महत्त्वाचे काम होईल. संस्थांनाही अधिक बळ लाभेल. महाराष्ट्रात स्वयंसेवी पद्धतीने व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. जर ते काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकलो तर भोवतालच्या बजबजपुरी माजलेल्या परिस्थितीत किती चांगल्या आणि विधायक गोष्टी घडत आहेत हे दिसून येईल. यातून लोकांमध्ये आश्वासकता निर्माण होईलच, पण सोबत त्या कार्यातून व्यक्त होणारा सर्वात महत्त्वाचा घटक, चांगुलपणा, तोही लोकांना भावेल. एवढे मोठे सामाजिक काम होत असताना त्याचा समाजावर हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. उलट, कार्यकर्त्यांची उपेक्षा होते. याप्रकारे व्यक्ती व संस्था यांच्या कामाचा आलेख सातत्‍याने समाजासमोर मांडला तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल.

३. मराठी समाज व संस्कृती यांच्या वैभवाचे डॉक्युमेन्टेशन - महाराष्ट्राच्या गावोगावचे सांस्कृतिक वैशिष्ट्यं  वेगवेगळे आहे. ते सारे वैभव प्रवाहित होत आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे. उद्या ते टिकेल याची शाश्वती नाही. ते काळाच्या ओघात नामशेष होण्यापूर्वी आपण त्यांचे लिखित, फोटोग्राफी, व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉडींग अशा माध्यमांमध्ये त्यांचे डॉक्युमेन्टेशन केले तर ते उद्याच्या पिढ्यांना उपलब्ध करून देता येईल. याचा फायदा वर्तमान अभ्यासकांना आणि भविष्यातील समाजाला होईल. या उद्देशाने 'थिंक महाराष्ट्र'वर 'वैभव' या विभागात महाराष्ट्रातील गावोगावच्या ग्रामदेवता, यात्रा-जत्रा, येथील कला आणि कलाकार, प्रथा, परंपरा, किल्ले , बाजार, खाद्यसंस्कृती, सण-उत्स,व, गावांची माहिती, वन्यावैभव, प्राणीजीवन अशा विविध त-हेने माहिती संकलित करून मांडली जाते.

वेबपोर्टलवरील माहितीचा शोध व्यक्ती, संस्था, कला आणि वैभव अशा विभागांमधून घेता येतो. सोबत जिल्हावार माहिती शोधता यावी यासाठी 'चित्र महाराष्ट्रा 'चे या विभागाची रचना करण्यात आली आहे. वेबपोर्टलवरील ‘लेखसूची’ हे असाधारण महत्त्वाचे सदर आहे. वर्तमानपत्रे-नियतकालिके यांमध्ये येणाऱ्या लेखांची लेखक व लेखाचा विषय अशी नोंद त्यामध्ये नित्य होत असते. त्यांचे वर्गीकरण विविध विषयक्षेत्रांत केले जाते. जेथे शक्य आहे तेथे मूळ लेखाची लिंक देऊन अथवा मूळ लेख पुर्नप्रसिद्ध करून तो लेख वाचकांस उपलब्ध करून दिला जातो. त्याखेरीज वेबपोर्टलवरील 'फोरम'मध्ये विविध त-हेच्या चर्चा घडवल्या जातात. वाचकांना तेथे कोणत्यातही विषयावर चर्चा सुरू करणे शक्य आहे. मराठी भाषा-संस्कृतीसंबंधात जगभर घडणाऱ्या सांस्कृतिक घडामोडी, विशेषत: छोट्या आगळ्यावेगळ्या – ज्यांकडे वृत्तपत्रे, टी.व्ही. माध्यमांचे लक्ष जात नाही, अशांची नोंद नित्यनियमाने व्हावी असाही प्रयत्न आहे. यामध्ये स्थानिक साहित्य-संस्कृती संमेलने, संगीत-नृत्यसमारोह, कला-प्रदर्शने, असाधारण क्रीडाकौशल्य प्रदर्शन, शैक्षणिक-वैज्ञानिक उपक्रम, सामाजिक उपक्रम व मोहिमा अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो.

'थिंक महाराष्ट्र'वरील माहितीसंकलनास अधिक परिणामकारक स्वरुप द्यावे या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये 'सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध' ही मोहिम यशस्वीरित्या राबवण्यात आली. त्या मोहिमेतून सोलापूरातील गावागावांची हाती आलेली विविधांगी माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. अशा त-हेच्या मोहिमा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू व्हाव्यात असा 'व्हिजन महाराष्ट्र्'चा प्रयत्न आहे. मात्र ते स्थानिकांच्या पुढाकाराशिवाय घडू शकणार नाही.

'थिंक महाराष्ट्र'ला गावोगावी त्या त्या परिसरातील माहिती देऊ शकतील असे कार्यकर्ते (संस्कृतिसमन्वयक) हवे आहेत. महाराष्ट्रात तीनशेसाठ तालुके आहेत. किमान प्रत्येक तालुक्यात समन्वयक हवा. महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेबाहेर जो बृहन्महाराष्ट्र पसरला आहे तेथील लोकांनाही, त्यांनी त्यांची माहिती याच पद्धतीने द्यावी असे आवाहन आहे. त्यामुळे महाराष्ट्र संस्कृती गेल्या पन्नास-शंभर वर्षांत जगभर कशी बहरली हे दिसून येईल. तालुका समन्वयकाची जबाबदारी त्याच्या परिसरातील कर्तृत्ववान व्यक्ती, कार्यशील संस्था, देवदेवता, यात्रा व अन्य परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे असा सर्व परिचय छोट्या छोट्या तुकड्यांमधून विषयवार द्यायचा ही आहे. त्यामधून तालुक्याचे चित्र व त्या ओघात संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र साकारेल अशी धारणा आहे. त्या चित्रात अद्यावत संदर्भ टाकत गेले की जे दृश्य दिसेल त्यातून वर्तमान महाराष्ट्र हा संस्कृतिसंपन्न, कार्यवृत्तीने धगधगता, गौरवास्पद देश आहे असा खराखुरा सार्थ अभिमान बाळगता येईल.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन, विशेषत: अतुल तुळशीबागवाले या प्रकल्पाच्या पाठीमागे अंशत: उभे आहेत. त्याखेरीज शिरीष सोहनी व प्रवीण शिंदे या दोघा चार्टर्ड अकाउंटंटनी संस्थेची कायद्याची व हिशोबाची बाजू सांभाळली आहे व सांभाळत आहेत. एकूणच, या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यक्ती-व्यक्तींकडून मिळत असतो. त्याशिवाय व्यक्तिगत देणग्यांचाही छोटामोठा लाभ झाला. त्याखेरीज पहिल्या पाच वर्षांत मिळालेले अर्थसहाय्य.

साने गुरुजी डॉट नेट : साने गुरुजी यांचे साहित्य कॉपीराईट फ्री झाल्यानंतर त्यांची सर्व पुस्तके (छापील सुमारे बारा हजार पृष्ठे) 'साने गुरूजी डॉट नेट' या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत. ती सर्व पुस्तके युनिकोडमध्ये पुनश्च डीटीपी करून घेतली. यामुळे पुस्तकांचे वाचन-संशोधन-शोध सोपे झाले आहेत. धारप असोशिएट्स यांच्या आर्थिक सहाय्यातून ही साइट साकार होऊ शकली.

वेबपोर्टलवर अशी आणखी अनेक आकर्षणे वेळोवेळी निर्माण केली जातात. ती जाणण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे वेबपोर्टलच्या संपर्कात सतत राहणे! किंबहुना, हे वेबपोर्टल प्रत्येक मराठी माणसाचे आहे अशीच भावना आहे.

मराठी कोण? हा सतत विचारला जाणारा प्रश्न. त्यास भाषिक आधार महत्त्वाचा आहेच, परंतु महाराष्ट्र ही भूमीच स्थलांतरितांनी घडवलेली आहे. त्यामुळे जे जे महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात ते सारे मराठीच होत असा आधुनिक संमिश्र संस्कृतीच्या काळात 'मराठी'चा अर्थ लावत आहोत.

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ कंपनीची स्थापना ना नफा तत्त्वावर कंपनी कायद्याच्या कलम आठ (पूर्वीचे कलम पंचवीस) अनुसार करण्यात आली आहे. तिचे सध्या चार संचालक आहेत - दिनकर गांगल, प्रवीण शिंदे, डॉ. यश वेलणकर, व सुदेश हिंगलासपूरकर.
प्रकल्पास पुढील प्रकारे मदत करता येऊ शकते :

१.  तुम्ही राहता त्या परिसराची माहिती देऊन, कार्यकर्ता बनून; त्यासाठी लेखन करून – क्षेत्रीय काम करून. संपर्क साधावा - किरण क्षीरसागर 9029557767

२. विषयतज्ज्ञ म्हणून ‘थिंक महाराष्ट्र’साठी येणाऱ्या लेखनाची तपासणी करून.

३. तांत्रिक दृष्ट्या, वेबसाईट माध्यमाच्या शक्याशक्यता व आपल्या प्रकल्पातील वेबपोर्टल यांची तुलना मांडून.

४. लेखसूची, पुस्तकसूची, सांस्कृतिक नोंदी अशा स्वरूपाच्या संशोधनात्मक कामासाठी मदत करून.

५. आर्थिक मदत करून; दरवर्शी पाचशे रुपये भरून आश्रयदाते बनणे. एकदा दहा हजार रुपये देणगी देऊन आधारस्तंभ बनणे. संपर्क – प्रवीण शिंदे 9820057014

‘थिंक महाराष्ट्र’चा पसारा मोठा आहे. तो जेवढा पसरू तेवढा आणखी वाढत जाऊ शकतो आणि वेबपोर्टलची खरी उपयुक्तता त्याच टप्प्यावर (म्हणजे अजून तीन-चार वर्षांनी) कळून येणार आहे. त्यावेळी वर्षाला नव्वद लाख रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो. परंतु त्यासाठी सुस्थित मराठी माणसांनी उदारता दाखवण्याची आणि तितकाच विश्वास ठेवण्याची गरज आहे. आश्रयदाते व आधारस्तंभ या दोन प्रकारांशिवाय मोठ्या व्यक्तिगत व कॉर्पोरेट देणग्या देता येतील आणि वेबपोर्टलसाठी जाहिराती. तीतून उत्पन्न करण्यासाठी मदत करता येईल.

वर सुचवलेल्या रकमेपैकी योग्‍य वाटेल त्‍या रकमेचा चेक/ड्राफ्ट /मनीऑर्डर ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पत्त्यावर पाठवावे. चेक/ड्राफ्ट त्याच नावाने पाठवावा किंवा आपण रक्कम परस्पर पुढील खात्यांमध्ये जमा करू शकता. मात्र आम्हास तसे कळवावे :

State Bank of India
A/c No. – 31759182464
IFSC code – SBIN005352

Cosmos Bank
A/c No. –  0121001015862
IFSC code – COSB000002

'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन' आयकर कायद्याखालील ८०जी (80G) कलमा नुसार देणगीदारास आयकरात सूट देण्यासाठी प्रमाणीत आहे.

८०जी प्रमाणपत्र क्रमांक DIT(E)/MC/80G/2920/2011-12
vide order dated 31-03-2012

वेबपोर्टलचे मुख्य संपादक – दिनकर गांगल 9867118517
मुख्‍य कार्यकारी अधिकारी - किरण क्षीरसागर 9029557767

संपर्क:

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
22, मनुबर मेन्‍शन, पहिला मजला, 193 डॉ. आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई – 400 060
9892611767/ (022) 24131009 / (022) 024183710

info@thinkmaharashtra.com

वाचकांच्या प्रतिक्रीया..

आपन हाती घेतलेले काम खरोखरच

आपण हाती घेतलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी मातीचे उपकार परत फेडण्याची संधी आहे ही.

Marathichya seveche vrat hati

Marathichya seveche vrat hati gheun tumhi je kam karat ahat tyal manahpurvak salaam! Tumchya karyala lakh lakh shubhechha!!

Aaple Hati Ghatlele Kam Khup

Aaple Hati Ghatlele Kam Khup Sundar Aahe.Best Luck. 9920837596

मा.श्री.दिनकररावजी गांगल सर

मा. श्री. दिनकररावजी गांगल सर यांच्या संकल्पनेतून तयार झालेली चळवळ म्हणजे थिंक महाराष्ट्र डॉट कॉम. खरंच, संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन माहित संकलन करताय आणि जगासमोर मांडत आहात. हे सर्वच काम अतिशय अप्रतिम आहे. त्यांना व त्यांच्या टिमला सलाम व शुभेच्छा.

दिनकर गांगल यांच्या कल्पनेतून

दिनकर गांगल यांच्या कल्पनेतून तयार झालेली 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' ही साहित्य, संस्कृती, इतिहास व कला क्षेत्रात एका मानबिंदू ठरेल! खरंच, हे एक वेगळे कार्य आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात भटकून आपला चमू माहिती संकलन करत आहे, हे कौतुकासपदच आहे. खऱ्या अर्थाने मराठी-महाराष्ट्र GLOBAL होतोय. आपल्या सर्व 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' परिवाराला शुभेच्छा!

Kal aple bhashan aikle ani

Kal aple bhashan aikle ani aaj website pahili. Kam khoop sundar aahe.

प्रिय दिनकर गांगल ,

प्रिय दिनकर गांगल, आपले कार्य कौतुकास्पद आहेच, शिवाय आपली दूरदृष्टी वाखाणण्यासारखी आहे. या चळवळीस शुभेच्छा!

मी अगदी सरुवातीचं स्वरूप

मी अगदी सरुवातीचं स्वरूप पाहिलं होतं. आता आमुलाग्र बदल झालेला आहे. सर्व काही आखीव-रेखीव, अनेकांगी, विविधता. माहितीपूर्ण आणि नेत्रदीपकही. अप्रतिम. सर्व परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!

Pages

आपला अभिप्राय नोंदवा