दीपमाळ - महाराष्ट्रीय शिल्पप्रकारदीपमाळ हा महाराष्ट्रीय शिल्पप्रकार आहे. तो मंदिरवास्तूचा अविभाज्य घटक. महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी जे दगडी स्तंभ उभारलेले असतात, त्यांना दीपमाळ असे म्हणतात. मंदिर प्रांगणातील दीपमाळा अनेक जुन्या मंदिरांत आढळतात. दीपमाळांचा आकार गोल, षटकोनी किंवा अष्टकोनी (दंडगोलाकार) असतो. त्यांचा तळाकडील भाग रुंदीला विस्तृत तर वर निमुळता होत जातो. दीपमाळ सहसा दहा फुटांपेक्षा अधिक उंच असते. दिवे लावण्यांसाठी त्यांना खालपासून वरपर्यंत क्रमाने लहान कोनाडे, दगडी हस्त अथवा पायऱ्या असतात.

दीपमाळा मंदिर प्रांगणात प्रवेशद्वारी असतात, पण त्यांचे चित्ताकर्षक सौंदर्य नजरेत भरते ते रात्रीच्या समयी! जणू भाविकांच्या जीवनातील अंध:कार नाहीसा करून त्यांचे मंगलमय वातावरणात स्वागतच होत असते. पुणे जिल्ह्याच्या चास गावातील प्राचीन सोमेश्वर मंदिरासमोरील प्रचंड मोठी दीपमाळ हे मंदिरवास्तूमधील शैलीदार रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराचा बाज पुरातन आहे. त्या दीपमाळेलाही महत्त्वपूर्ण स्थान लाभले आहे. तेथे अडीचशे दिवे लावण्याची व्यवस्था दीपमाळेच्या बांधकामातून साधली आहे. त्यातून तिच्या व्याप्तीची कल्पना येते. ती दीपमाळ त्रिपुरा पौर्णिमेच्या रात्री शेकडो दिव्यांनी उजळून निघते तेव्हा परिसरातील वातावरणात मंगलमय दीपोत्सवाचा जल्लोष साजरा होतो.

काही मंदिरांसमोरील दीपमाळा तर दहा फुटांपेक्षाही कमी उंचीच्या आहेत. त्यांचा आकारही लंबगोलाकार व वरच्या भागी निमुळता होत जाणारा असतो. काही मंदिरांतील दीपमाळा षट्कोनी व अष्टकोनीदेखील आहेत. त्या निर्माण करताना त्यांच्या रचनाकारांनी भूमितिशास्त्राचा आधार घेतला असल्याचे जाणवते. काही मंदिरांतील दीपमाळा जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झाल्या; तशाच, मंदिरद्वारी छोटेखानी चौथऱ्यावर त्यांचे बांधकाम करून उंचीचा उद्देश साधला गेला आहे.

दीपमाळ अस्तित्वात येण्याआधी मंदिर प्रांगणात उंच जागी दिवे लावण्याची प्रथा अस्तित्वात होती. मंदिरासमोर दीपमाळा बांधणे हे पुण्यकृत समजले जाई. ती बांधण्यासाठी मजबूत दगडी खांब उभारून त्यावर कापूर; तसेच, अन्य ज्वालाग्राही द्रव पदार्थांच्या साहाय्याने दीप प्रज्वलित करून हेतू साध्य केला जात असे. तशा प्रकारचे दगडी खांब शिवालयासमोर उभारण्याचा प्रघात होता. तसे स्तंभ देशाच्या दक्षिण प्रदेशातील प्राचीन मंदिरांतून अधिक आढळतात. त्या स्तंभांना ‘दीपदंड’ या नावाने संबोधले जाते.

दीपमाळेचे बांधकाम येण्याआधीपासून ‘दीपलक्ष्मी’चे काही प्रकार दक्षिण प्रदेशातील प्राचीन मंदिरवास्तूंमधून पाहण्यास मिळतात. त्यातील काही धातूंच्या तर काही कोरीव काम केलेल्या दगडांच्या आहेत. धातू आणि दगड यांच्या समया तर सुमारे दहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत, तर काहींना वृक्षांच्या आकारात साकारण्यात आले आहे. तो दीपमाळेचा पूर्वप्रकार आहे असे जाणकारांचे मत आहे.

शिलाहार-यादव साम्राज्य काळातील मंदिरवास्तूंमधून दीपमाळ हा प्रकार आढळत नाही. इसवी सनाच्या तेराव्या शतकानंतर इस्लामी आक्रमणानंतर त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या ‘मिनार’ शिल्पाच्या प्रभावातून हिंदू मंदिरात दीपस्तंभ, दीपवृक्ष आणि नंतर दीपमाळ आलेले दिसतात.

उत्सवप्रसंगी शहरात दीपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायणासारख्या ग्रंथात आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दीपलक्ष्मी व दिव्यांची झाडे असतात, तसेच देवालयांसमोर दीपदंड किंवा दीपस्तंभ असतात. पण दीपमाळ हे महाराष्ट्रीय मंदिरशिल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विटांचा वा दगडांचा वर निमुळता होत जाणारा स्तंभ उभारून त्यात ओळीने असलेल्या हातांवर व स्तंभाच्या माथ्यावर पणत्या ठेवण्यात येतात. उत्सवप्रसंगी, दिवाळीच्या वेळी, त्रिपुरी पौर्णिमेला दीपमाळा दिव्यांनी उजळण्यात येतात. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रूढ होती. विशेषतः जेजुरीला खंडोबाच्या मंदिराच्या टेकडीवर साडेतीनशे दीपमाळा त्यासाठी उभारलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरांसमोर दीपमाळेचे बांधकाम आढळतेच. विशेषत: शिवाच्या; तसेच, देवीच्या मंदिरासमोर दीपमाळा आढळतात. पेशव्यांच्या आधी दगडी दीपमाळांबरोबर विटांच्याही दीपमाळा बांधल्या गेल्या. त्यांची रचनाही मीनारसदृश्य आहे. त्या आतून पोकळ असून वर जाण्यासाठी नागमोडी जिना असतो. त्या दीपमाळांचे बांधकाम अत्यल्प आहे. तशा प्रकारच्या दोन दीपमाळा मराठवाड्यातील बीड येथील प्राचीन खंडोबाच्या मंदिरासमोर पाहण्यास मिळत, असे उल्लेख आढळतात.

पूर्व प्रसिद्धी - 'शब्द रुची' एप्रिल २०१८

संदर्भ - भारतीय संस्कृतिकोश, खंड चौथा

- अरुण मळेकर

लेखी अभिप्राय

फारच उपयुक्त माहिती आहे ही.

मधुसूदन थत्ते29/09/2015

Mast

Bhushan29/08/2016

भारतीय संस्कृती जाेपासणारी माहिती.

अजय टाले 29/08/2016

Shastranusar bandhkam kase have hi Tahiti dyavi

Vilas kumkat20/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.