अपेक्षा बहुआयामी ज्ञानप्रकाश (रिनेसान्स) चळवळीची


संस्कृती या संकल्पनेची साधीसोपी व्याख्या ‘सामाजिक वर्तनव्यवहार’ अशी करता येईल.

तो शब्द जेव्हा ऐतिहासिक संदर्भात येतो तेव्हा त्याला संचिताचे मोल लाभते. ते परंपरेचे असते, पण आजकाल त्यात रमायला जास्त होते व म्हणून त्यास स्मरणरंजनाचा गोडवा वाटतो. मात्र, स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) हा गेल्या पाचशे वर्षांत, स्थित्यंतराच्या काळात निर्माण झालेला भाव आहे. ती निरंतर भावना नव्हे हे जाणले पाहिजे.

संस्कृती वर्तमानात घडत असते. ते एक प्रकारे दस्तऐवजीकरण असते. वर्तमानातील सामाजिक वर्तन दस्तऐवजाप्रमाणे कोरडे, वस्तुनिष्ठ मात्र होता कामा नये. त्यात परंपरेची हृद्यता जपली गेली पाहिजे; त्याचवेळी नवे संकेत निर्माण केले गेले पाहिजेत. निर्मितीची ही ऊर्मी वर्तमानातून व्यक्त व्हायला हवी. ते समाजाचे चैतन्य असते. आज परंपरा जपणे हा उपचार झाला आहे तर नवे काही घडत असल्याचे संकेत वर्तनव्यवहारात जाणवत नाहीत. काळाचा झपाटा आकलन होत नाही आहे.

भविष्यवेध त्यामुळे फार मुश्किलीचा झाला आहे. कोरड्या व्यवहारामुळे संवेदना हरपल्याचा भास होतो. त्यात परंपरेची खुंटी रुढीप्रमाणे घट्ट पकडून ठेवल्यामुळे नित्यनुतनाचे आकलन करून घेण्याचे कष्ट टाळले जातात. उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या 'व्हॅनलेंटाइन डे'चे घेता येईल. या नव्या गोष्टीने सर्व प्रदेशांतील समाजाच्या सर्व स्तरांतील युवक-युवतींवर गारुड केले आहे. त्यातील तरुण-तरुणींचे जे हसरे खेळकरपण आहे ते जुन्या वंचिततेच्या, अभावाच्या काळात वाढलेल्या मंडळींनी त्यांच्या त्याच संदर्भात पाहून चालणार नाही. त्यावेळी रोकड पैसे आणि गुलाबाची फुले असती तर त्यावेळचे युवक वेगळे वागले नसते. भविष्यवेध हा सर्व तऱ्हेच्या उपलब्धीच्या आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याच्या संदर्भातच घ्यावा लागेल. त्यास भौगोलिकतेच्या, देशप्रेमाच्या सीमा नसतील, पण त्याचवेळी स्थानिक प्रथापरंपरा यांचा धागा जपावा लागेल, कारण जागतिक भानाच्या व्यापकतेला स्थानिक भावविश्व गाभास्वरूपात आधार देत राहील.

आपल्याला चर्चा करायला हवी ती भूतकाळाचे भान ठेवून वर्तमानकाळाचे अवधान सांभाळत भविष्यातील शक्यतांची. पुन्हा, आपण विचारी व संवेदनाशील मंडळी असल्याने त्या शक्यतांचा नुसता अंदाज बांधून न थांबता समाजव्यवहाराला वळण लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा कदाचित मोठा दावा वाटेल, परंतु समाजातील सर्व विचारी व भावनाशील मंडळींनी स्थित्यंतराच्या वेगाला बिचकून-घाबरून हातपाय गाळून चालणार नाही. उलट, अशा वेळीच समाजाचे सांस्कृतिक बळ वाढवण्याची गरज आहे. आपण त्याचा आरंभ करू शकतो. त्याचे साद-पडसाद उमटून एकाद्या आंदोलनास तोंड फुटू शकते! हे घडू शकते, काही उदाहरणे गेल्या पन्नास वर्षांतील आपल्यासमोर आहेत. या काळात :

 • नवनाट्याचे बीज रुजले. आज ती चळवळ विखुरल्या प्रकारे साऱ्या महाराष्ट्रात धुमाऱ्यांच्या स्वरूपात दिसते. तिला आरंभी एकात्म आशय विजय तेंडुलकर, सतीश आळेकर यांनी दिला. तसे लेखक-दिग्दर्शक नाहीत.
 • गिर्यारोहणाची चळवळ फोफावली. त्यातून काही एव्हरेस्टवीर-वीरांगना घडल्या. अभ्यासक-लेखक तयार झाले. त्यांचाही एकत्रित प्रभाव नाही. तिचाच भाग म्हणून लोक गड-किल्ल्यांवर जाऊ लागले.
 • विज्ञानप्रसाराचे महत्त्व समाजात रुजवले गेले. मात्र, त्याचे संस्कृतीशी नाते यथार्थ उलगडून सांगितले गेले नाही. एकादा शरद काळे (भाभा अणुशक्ती) अथवा डॉ. विश्वास येवले (‘योगार्थु’) फार जाणिवेने भारतीय संस्कृतीचे महात्म्य समुचित रीतीने सांगत राहिला, पण ते तथाकथित नवविचारांच्या अथवा अंधभक्तीच्या रेट्यात वाहून गेले.
 • ग्राहक चळवळीने विचारी लोकांना नव्या अर्थकारणात अभिरुची व जिव्हालालित्य यांची वाट दाखवली. मात्र लोकांनी दिमाखाच्या (शो) प्रेमात त्या वाटेकडे दुर्लक्ष केले. चळवळीनेही ‘मार्केट’चे सूत्र जाणून घेतले नाही. मार्क्सवादाचे विलक्षण आकर्षण असलेल्या काळात अशोक दातार या विचारी माणसाने सांगितले होते, की मार्क्सवाद भांडवलशाही मार्गानेच येऊ शकतो! त्या सूत्राची आठवण येते. कल्याणकारी राज्यांच्या रूपाने तसे घडलेही.
 • स्त्रीमुक्ती विचारांची रूजुवात जाणीवजागृती, संघर्ष व रचनात्मक कार्य असे तीन टप्पे पार करत समाजात झाली आहे. मात्र तो विचार अंगवळणी पडायचा आहे.
 • कवितेने नवनवी रूपे घेत वाङ्मयीन आविष्काराचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणून तिचे स्थान प्रस्थापित केले. नव्या रूपात ती एका बाजूला निबंधात्मक घडली तर दुसऱ्या बाजूला तिने मंचीय रूप घेतले. कविता कोणी वाचत नसले, तरी कविता लिहिणे समाजाच्या सर्व स्तरांत वाढत चालले आहे.
 • फिल्म सोसायटी या अभिधानाने रसिकांचे क्लब निर्माण करत असताना जब्बार, अमोल यांच्यासारखे निष्ठावंत चित्रपट दिग्दर्शक घडले. सोसायट्यांचे लोण जिल्ह्या जिल्ह्यांत, कॉलेजा कॉलेजांत पसरले. त्यामधून सध्या सिनेमा थिएटरांतून दिसते ती मराठी नवचित्रपटांची लाट येऊ शकली.
 • जलसंधारण व कृषी उत्पादन या संदर्भात नवजागृती घडून आली. श्री.अ. दाभोलकरांची कृषिक्रांती संकल्पना ही महाराष्ट्राची मोठीच देणगी होय. त्यामधून आजचा प्रगत शेतकरी घडला. मात्र, व्यक्त होत राहिल्या आहेत शेतकऱ्यांच्या रडकथा... महाराष्ट्रात घडून आलेल्या खेड्या खेड्यांतील जलसंधारण प्रयत्नांची साधी एकत्रित नोंद नाही. दत्ता देशकर या गृहस्थाने चालवलेले जलसंपदा मासिक व जलसंस्कृती मंडळ जणू त्याचे ‘एकट्याचेच’ राहिले.
 • महाराष्ट्रात सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात अशा काही गोष्टी घडून आल्या, मात्र त्यांचा आम मानसिकतेवर परिणाम उरलेला नाही. त्याचे उघड कारण तंत्रज्ञानाच्या झपाट्यात व माध्यम क्रांतीमुळे तयार झालेल्या विरंगुळ्याच्या युगामध्ये आहे. त्याच बरोबर ते भारताच्या फसव्या आध्यात्मिक परंपरेत आहे का? या काळात अध्यात्मिक गुरू व बुवा बरेच तयार झाले. खरे तर त्यांपैकी वामनराव पै यांनी ‘तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार’, ‘जग सुखाने भरलेले आहे’ या कालानुरूप संकल्पना मांडल्या, पण कृतिकार्यक्रम नामजपाचा दिला! त्यांचे विचारधन त्यांच्या शिष्यांना वगळाच, त्यांच्या वारसांनादेखील आकळलेले नाही. अन्य आध्यात्मिक गुरू आणि त्यांच्या साप्ताहिक ‘बैठका’ वा व्यक्तिमत्त्व विकासाचे, मन:शांतीचे कार्यक्रम चालू राहिले आहेत, ते विरंगुळ्याच्या स्वरूपात.
 • सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील जुन्या संस्थांना उपचारात्मक स्वरूप आले आहे. उदाहरणार्थ, साहित्य महामंडळ वाङ्मयीन क्षेत्रातील ऊर्जेचे प्रतिनिधीत्व करत नाही, परंतु संमेलनांच्या निमित्ताने वार्षिक उत्सव सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे अंधत्वाने भरवत असते. प्रमाणीकरणाचे, प्रशंसापत्रासाठी पात्रतेचे संकेत कोणत्याही क्षेत्रात उरलेले नाहीत; तशा व्यवस्थेचा तर विचारही कोणी करत नाही. त्यामुळे ‘माननीय’, ‘आदरणीय’ यांसारख्या विशेषणांची खैरात आहे, पण तशा व्यक्ती कोठे आहेत? आणि ते सांगायचे कोणी?
 • आयुष्यमान बरेच वाढल्याने एका आयुष्यात मोठा कालपट पाहता येऊ लागला व त्यामधील व्यक्ति निष्ठ प्रकारची निरीक्षणे व भाष्ये ही जणू ‘सत्य’ स्वरूपात मांडली जाऊ लागली. त्यातच व्यक्तितस्वातंत्र्य वाढल्याने व त्याचा आविष्कार मोकळा झाल्याने मतप्रवाहांचा बुजबुजाट झाला. तो सारा गोंधळ वर्तमानपत्रे, टीव्ही अशा माध्यमांमधून दिसतो.
 • कुटुंब ही समाज बांधून व निकोप ठेवू शकणारी प्रबळ अशी संस्था. ती विघटित होऊन गेली आहे.

तंत्रविज्ञानाची सहज उपलब्धता मानसिकतेवर मोठमोठे व सखोल परिणाम करत आहे. त्यामधून संस्कृतिविषयक मूलभूत प्रश्न निर्माण होऊ शकतात. जसे, की :

*  मनुष्य हा खरोखरीच समाजप्रिय प्राणी आहे का?

*  संस्कृती आणि भाषा एकात्म आहेत का? मुळात, भाषाच शब्दांक्षरांपलीकडचे ‘व्हिज्युअल’ रूप घेऊ शकेल?

*  स्थानिक व जागतिक संस्कृती एकमेकांना छेद कसा देणार? त्या एकमेकांना पूरक होतील यासाठी सद्यसमाज विधायक हस्तक्षेप करू शकतो?

*  ‘सुपरमॅन’ जो उत्क्रांतिस्वरूपात जन्माला घातला जात आहे तो संवेदनारहित अवस्थेत जगू शकेल? त्याच्यात आणि प्राणिमात्रात काय फरक राहील?

 • प्रकृती-विकृती-संस्कृती ही त्रयी बऱ्याच वेळा चर्चिली जाते. विकृतीमधील बिघाड दुरुस्त करण्याची किमया पाश्चिमात्य विज्ञानाने साधली आहे, परंतु संस्कृतीमधील ‘घडवण्याचे’ संस्कार तर केव्हाच लोप पावले! वेगवेगळ्या राष्ट्रीय वा स्थानिक पातळीवरील संस्था व व्यक्ती संस्कार या नावाखाली काही जुनाट झालेले उपक्रम राबवत असतात, परंतु त्यांचे स्वरूप ‘परंपरेच्या खुंट्यां’प्रमाणे बनले आहे. त्यांचा मुलांच्या वा युवकांच्या भावजीवनाशी काही संबंध राहिलेला नाही. म्हणून नवे राज्यव्यापी असे सामाजिक-सांस्कृतिक आंदोलन गेल्या अडीच-तीन दशकांत उभे राहू शकले नाही. किंवा बाबा आमटे यांच्या ‘आनंदवना’सारखा प्रकल्प  -  की जो महाराष्ट्राचे आकर्षण ठरू शकतो, तोही घडून आला नाही. ‘अमिताभ’, ‘लता मंगेशकर’, ‘सचिन तेंडुलकर’ अशी ‘दैवते’ निर्माण करण्याकडे कल वाढला. परिणामत: अनेक क्षेत्रांतील कर्तृत्व दुर्लक्षित राहते. उदाहरणार्थ, धुळ्याची ग्रामीण महिलांना गोधड्या विणण्यास व त्या निर्यात करण्यास चालना देणारी नीलिमा मिश्रा मॅगेसेसे पुरस्कार मिळवते पण अभय बंग, प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ, तात्याराव लहाने या ‘सेलिब्रेटीं’च्या पंक्तीत समाविष्ट होऊ शकत नाही.
 • सांस्कृतिक क्षेत्रातील या उणिवा/मर्यादा यांची सत्यासत्यता जाणून घेत त्यांवर मात करायची; व त्याचबरोबर विधायक घटनांचे/मोहिमांचे समालोचन साधायचे असा दुहेरी टप्पा विचारविनिमयात गाठायचा आहे.

या काळात एक सुरेख गोष्ट जगभर घडून आली व तिचा उद्घोष आपल्याकडेही वारंवार होत असतो. ती म्हणजे येणारा समाज ज्ञानाधिष्ठित असणार आहे. अर्थात संगणक-इंटरनेटची उपयोगिता! या पलीकडे त्याची लक्षणे सांगितली जात नाहीत, ना तसा व्यवहार घडत. तो वसा घेणे आजच्या मराठी सुबुद्ध समाजाला सहज शक्य आहे, कारण तो सुस्थितीतदेखील आहे. बाळशास्त्री जांभेकर ते बाबासाहेब आंबेडकर हा काळ विचारांनी धगधगता होता. नंतरच्या लक्ष्मणशास्त्री जोशी ते आमची सत्तरीतील पिढी या अडीच पिढ्यांनी ते विचारवैभव गमावले. बेडेकर-कुरुंदकर यांच्यासारखे अपवाद बेटांप्रमाणे राहिले. त्या पठडीतील अन्यांची विद्वत्ता स्फुट स्वरूपात व्यक्त झाली. तो काळाचा दोष आहे का?

गमावले ते गमावले. कमावायचे काय आहे? महाराष्ट्रात सांस्कृतिक वातावरण पुन्हा आणायचे तर बहु आयामी ज्ञानप्रकाश (रिनेसान्स) चळवळीला आरंभ करून देणे हाच इलाज असू शकतो. तिचे घटक ठरवणे व स्तर अजमावणे ही मोठीच कसोटी आहे, कारण ज्ञानाची क्षेत्रे खूपच विस्तारली आहेत. साहित्यकलेच्या क्षेत्रात उपयोजिता व विशुद्धता (अॅप्लासइड व फाइन) या रेषा पुसट होत चालल्या आहेत. त्यामुळे सर्व तऱ्हेचे पूर्वग्रह झटकून मनमोकळेपणाने परिस्थितीला सामोरे होऊया.

- दिनकर गांगल

(डिसेंबर 2014 मध्‍ये 'थिंक महाराष्‍ट्र'कडून 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' ही मोहिम राबण्‍यात आली. त्याच्‍या आढावा बैठकीपूर्वी वरील टिपण प्रसृत करण्‍यात आले होते. त्‍यावेळी झालेल्‍या संस्‍कृतिविषयक चर्चेत काय घडले हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा.)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

 • No HTML tags allowed.
 • Lines and paragraphs break automatically.
 • Web page addresses and email addresses turn into links automatically.