सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनासाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर अशी बारा दिवसांची मोहीम संपवून ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची टीम सोमवारी, 22 डिसेंबरला सकाळी मुंबईत परतली. त्याच सुमारास, गावोगावचे टीममधील भिडूदेखील त्यांच्या त्यांच्या गावी गेले.

बारा दिवसांचा हा दौरा यशस्वी रीत्या संपला. तालुक्या तालुक्यातील माहिती संकलन बऱ्या प्रमाणात झाले आहे. ते अजून त्या त्या भिडूकडे आहे. त्याला पूर्णाकार देऊन, नंतर ते वेगवेगळ्या विभागात पोर्टलवर येत्या एप्रिलपासून प्रसिद्ध केले जाईल. त्याच बरोबर, त्यातील महत्त्वाचे लेख एकत्र करून साधारण पाच-सात महिन्यांत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याचा बेत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ हा वर्ष-दीड वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला ग्रंथ पाहण्या-वाचण्यात आला असेल तर जिल्ह्या जिल्ह्यातील असा ठेवा ग्रंथरूपाने उपलब्ध होण्याचे मोल कळू शकेल. टीममधील भिडूंकडील जमा माहितीमध्ये लेखी मजकुराबरोबरच ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रे चांगल्या प्रमाणात आहेत.

माहिती संकलनाचे काम करणाऱ्या टीममधील भिडूंना तर ते नव्या गावी गेले, की नवनवीन गोष्टी शोधण्याचे वेडच लागे. त्यामध्ये अनुराधा काळे, प्रमोद शेंडे, श्रीकांत पेटकर, रविप्रकाश कुळकर्णी, प्रसाद घाणेकर, वंदना करंबेळकर, मकरंद कर्णिक, देवेश जोशी, उज्ज्वला क्षीरसागर यांचा खास उल्लेख करावा लागेल. माहिती संकलनाच्या ओढीमध्ये त्यांना निवास-भोजनाची थोडी गैरसोय झाली तरी ती त्यांच्या गावी नसे.

‘संस्कृतिवेध’मध्ये खरोखरीच असाधारण कुवतीची काही माणसे भेटली, त्यांची चरित्रे नोंदली गेली. ती यथाकाल ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्धही होतील. परंतु, त्यांचा येथे उल्लेख करणे प्रस्तुत वाटत आहे. त्यामध्ये आफ्रिकेतील साखर कारखानदार व सोलापूरचे सुपुत्र सतीश पुरंदरे (त्यांची सोलापूरमध्ये ‘ग्रंथाली वाचकदिन समारंभा’त राकेश टोळ्ये यांनी मुलाखतदेखील घेतली), मंगळवेढ्याचे कृषी क्षेत्रातील इनोव्हेटर वैभव मोडक, मानवी हक्क तळच्या माणसांपर्यंत पोचवण्यासाठी धडपडणारे सांगोल्याचे शहाजी गडहिरे, सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते बार्शीचे तुळशीदास गवाणे आणि त्यामध्ये थोडी वेगळी वाट चोखाळणारे रिधोरेजवळचे सयाजीराव गायकवाड, संगीताची कास धरणारे बार्शीचे अमोल आणि अबोली सुलाखे हे दाम्पत्य, करमाळ्याचे ‘समाज सुधारक’, अभ्यासू प्रा. प्रदीप मोहिते, पंढरपूरचे आधुनिक वाङ्मयदृष्टी असलेले समीक्षक देवानंद सोनटक्के अशी काही नावे नमूद करता येतील. त्यांना महाराष्ट्राच्या समाजक्षेत्रात त्यांचे स्थान लाभले पाहिजे व तसा मान मिळाला पाहिजे असे वाटते.

अविनाश बर्वे तळमळीचे कार्यकर्ते! ते त्यांच्या ‘घरकूल’ या मतिमंदांच्या संस्थेमध्ये पूर्णवेळ मग्न असतात. परंतु ‘संस्कृतिवेध’च्या ओढीने त्यांनाही विशाल जगात खेचले. त्यांनी सोलापुरातील पाहुण्यांचे आगतस्वागत आणि तेथील कार्यक्रमांचे नियोजन पूर्वतयारीच्या टप्प्यापासून चोखपणे पाहिले. त्या कामांच्या गडबडीतही त्यांना माहिती संकलनाचे वेड लागले. ते त्यांना वेगळे काम करणारी व्यक्ती दिसली, की तिच्याकडे ठिय्या मारून बसत आणि सर्व तपशील घेऊन विजयी मुद्रेने हसत हसत परत येत. त्यांच्या चेहऱ्यावरील तो भाव दिलासा व आधार देणारा वाटे.

‘संस्कृतिवेध’ मोहिमेचा दुसरा पेड होता शाळा-कॉलेजे व सार्वजनिक वाचनालये या ठिकाणी सभा-संमेलने योजण्याचा. ती स्थानिक संस्थांच्या मदतीने दर दिवशी तीन कार्यक्रम या पद्धतीने योजली गेली. काही दिवशी तर, पाच-पाच कार्यक्रम घडून आले. त्या कार्यक्रमांनी दोन गोष्टी साध्य झाल्या. उदाहरणार्थ, नगरनियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांची ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ प्रभावी ठरली. ‘बार्शी (वस्ती दोन लाख) शहर होत असताना’ किंवा ‘माढा (वस्ती अठ्ठावीस हजार) शहर होत असताना’ अशी त्यांची सादरीकरणे स्थानिकांना विचारप्रवृत्त करणारी ठरली. त्यांनी शहरे आणि खेडी यांच्यामधील भ्रामक भेद पुसून टाकण्याचे लोकांना आवाहन केले. आश्चर्य म्हणजे स्थानिकांनी ते स्वागतशील मनाने स्वीकारले. त्या म्हणाल्या, “खेड्यातच शेती होते असा भ्रम का ठेवता? उद्याच्या शहरांतदेखील शेते तरारतील, मात्र त्यासाठी नियोजन हवे व जागरूक नागरिक हवेत.” सौर ऊर्जातज्ज्ञ पुरुषोत्तम कऱ्हाडे, अणुऊर्जातज्ज्ञ राजा पटवर्धन, अंधश्रद्धा निर्मुलनाचे प्रणेते चंद्रसेन टिळेकर, स्त्रीवादी विदुषी छाया दातार वगैरे मंडळींनी बौद्धिक चर्चेच्या आवाहनाने जनजागरणाच्या कार्यक्रमात ठिकठिकाणी चैतन्य आणले.

दुसरी साधलेली गोष्ट भावनेच्या/रसिकतेच्या पातळीवर होती. तळेगावचे सतारवादक विदुर महाजन व त्यांची कन्या नेहा यांनी खेड्यापाड्यात शेतकऱ्यांसमोर, शालेय मुलांसमोर सतारीचे कार्यक्रम केले आणि त्यांना संगीताविषयी, विशेषत: सतारीबद्दल बरीच माहिती दिली. त्यांचे वादन आणि प्रबोधन, दोन्ही दिलखुलास होते. त्यामुळे कार्यक्रम संपला, की ग्रामस्थांचा, मुलांचा त्यांच्याभोवती गराडा पडे. चित्रपट दिग्दर्शक समीर पाटील, सतीश राजमाचीकर, सुरेश चव्हाण यांनी श्रीकांत पेटकर यांच्या मदतीने लघुपट दाखवून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना विचारप्रवृत्त केले. त्यांचा लघुपटांतील बोधाविषयीचा चर्चेतील सहभाग लक्षणीय असे. कवी अरुण म्हात्रे, अंजली कुळकर्णी यांनी गावोगावी कविसंमेलने घेऊन लोकांना रिझवले.

अमेरिकेतून सुट्टीवर उस्मानाबादला येऊन ठेपलेली प्रगती कोळगे उत्साहाने मोहिमेत सामील झाली आणि तिने ठिकठिकाणी कॉलेजच्या मुलांना प्रगतीच्या वाटा दाखवल्या. तोच भाग सोलापूरमध्ये धनंजय गांगल व श्रीधर पाटील यांनी निभावला. तर डॉ. यश वेलणकर यांनी मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचा मंत्र दिला.

मोहिमेचा तिसरा पदर सांस्कृतिक विचारविनिमयाचा होता. त्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन किंवा तीन बैठका घेतल्या आणि त्याहून अधिक व्यक्तिगत भेटीगाठी साधल्या. सांस्कृतिक विचारविनिमयाला आधारभूत ठरतील अशी तीन टिपणे मोहिमेआधी सर्व तालुक्यांत प्रसृत होतील अशी व्यवस्था योजली होती. (ती पुस्तिका लेखाखाली जोडली आहे. ती डाऊनलोड करून वाचता येईल.) काही ठिकाणी चर्चेमध्ये ती पुस्तिका काळजीपूर्वक व गांभीर्याने वाचली गेल्याचा प्रत्यय आला. उलट, अनेक ठिकाणी बैठकांमध्ये संस्कृतीबद्दल सर्वसाधारण स्वरूपाची चर्चा घडून आली. लोकांना मुलांवरील संस्कारांबद्दल विशेष काळजी वाटते असे दिसून आले. मात्र, वर्तमान काळाच्या काळजीत भविष्यवेध दूर राहतो असेही जाणवले. त्यामुळे आज जन्मणारी बालके 2050 साली छत्तीस वर्षांची होतील त्यावेळी आपण त्यांच्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या काय मागे ठेवणार आहोत? त्यांच्या मनांचे भरणपोषण होण्याची समाजात काही व्यवस्था हवी की नको? या मुद्यांवर सर्व निरुत्तर होत. किंबहुना, अशी चर्चा टळली जाई.

आमचे हक्काचे भिडू होते ते रोहिणी, धनश्री, महेश खरे आणि विनित जोगळेकर. त्यांनी मोहिमेच्या दोन-तीन महिने आधीपासून स्वत:ला या कामात डुंबवून घेतले होते. प्रत्यक्ष मोहीमकाळात तर त्यांनी पडेल ते काम केले. सोलापूरहून, स्थानिक पातळीवरून मिळालेल्या बळाचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. अरविंद जोशी, अलका काकडे, शोभा देशपांडे. सुभाष देशमुख – अनिता ढोबळे आणि त्यांचे सहकारी (सोलापूर), अमोल सुलाखे (बार्शी), बालाजी शिंदे (मंगळवेढा) मारुती बावडे (अक्कलकोट), अनुराधा पंडित (मोहोळ), कृष्णा इंगोले
(सांगोला), देवानंद सोनटक्के, गोविंद सबनीस (पंढरपूर), विलास शहा, दत्तात्रय चवरे, संतोष कापरे, धनंजय पारखे (माढा), शंकरराव गोऱ्हे (माळशिरस), प्रमोद झिंजाडे, दीपक चव्हाण (करमाळा) यांनी ‘संस्कृतिवेध’ मोहिमेस दिलेला पाठिंबा आमची उमेद वाढवणारा ठरला.

राजेंद्र शिंदे यांनी ऑफिसमध्ये राहून ती आघाडी व्यवस्थित रीत्या प्रदीप साळुंके यांच्या मदतीने भक्कमपणे सांभाळली. त्यांना गावागावातून आमचा फोन आला नाही व पुढील बातमी दिली गेली नाही तर ते बेचैन होत.

मोहिमेत प्रवीण शिंदे प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत परंतु त्यांनी अर्थव्यवस्था सांभाळली. तसेच अमेरिकास्थित अतुल तुळशीबागवाले यांनी सतत फोनवरून ‘संस्कृतिवेध’चा पाठपुरावा केला.

ही मोहीम सुरू झाली ती ‘रवींद्र कुळकर्णी मदतनिधी’मधून अर्थसाहाय्य लाभले तेव्हा. त्यानंतर ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स प्रा. लि.’च्या अशोक जैन व अजित जैन यांनी बाकी खर्चाची हमी घेतली व मोहिमेला भक्कम बळ दिले. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार व माध्यमशिक्षण विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांनी मुख्यत: माहिती संकलनाच्या संदर्भात पत्रकार विद्यार्थ्यांचे (सत्र परीक्षेचा काळ असूनही) बळ उपलब्ध करून दिले. ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर हे आमचे हक्काचे व प्रेमाचे साथीदार. त्यामुळे ‘संस्कृतिवेध’चा विचार सुरू झाल्यापासूनच त्यांचा सहभाग गृहीत धरला होता. त्याहुनही महत्त्वाचा ठरला तो त्यांचा अनुभवी सल्ला. त्यामुळे मोहिमेची आखणी व तिची कार्यवाही सोपी होऊन गेली. मोहीमकाळात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तीन-तीन दिवसांची पुस्तक प्रदर्शने झाली. त्यामध्ये ‘ग्रंथाली’बरोबरच अन्य प्रकाशकांची पुस्तकेही प्रदर्शित केली गेली होती.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला भविष्यवेध अभिप्रेत आहे. त्याची झलक कार्यक्रम योजनेत होतीच. त्या दृष्टीने लक्षवेधक कार्यक्रम ठरला तो ‘एकविसाव्या शतकातील लायब्ररी’. ती कार्यशाळा ग्रंथपालन शास्त्रातील तज्ज्ञ हेमंत शेट्ये व सॉफ्टवेअर तज्ज्ञ विक्रम झाडगावकर यांनी घेतली. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी तिचे उद्घाटन केले. कार्यशाळेस ‘हिराचंद नेमचंद वाचनालया’चे सहकार्य लाभले. वाचनालयाचे सचिव प्रा. येळेगावकर यांचा कार्यशाळा संयोजनातील सहभाग मोलाचा होता. ‘एकविसाव्या शतकातील लायब्ररी’ हा विषय ठरवताना ‘ग्रंथालय’ हा शब्द योजला नाही हे लक्षात घ्यावे कारण पुढील काळात ‘ग्रंथालया’त ग्रंथ नसतील. ग्रंथालयांचे स्वरूप वेगळे असेल. लायब्ररीचा स्थायी धर्म ‘लिबर’ (... या विमुक्तये) असा आहे. या शतकातील पुढील लायब्रऱ्या तशाच असतील.

अनेक छोट्यामोठ्या गोष्टी आहेत - ज्या ‘संस्कृतिवेध’च्या बारा दिवसांत प्रत्ययास आल्या, आमचे सामाजिक आकलन वाढले. समाजातील पॉझिटिव्ह भाव प्रकर्षाने जाणवून गेला. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर आणि टीव्हीच्या पडद्या-पडद्यावर रोज दिसणारे आणि भेडसावणारे देशाचे/राज्याचे बकाल चित्र आम्ही चाळीस-पंचेचाळीस मंडळी तरी बारा दिवस पूर्ण विसरून गेलो होतो. गावोगावच्या स्थानिक समाजातील एक थरही आमच्या या विधायक मोहिमेने मनोमन सुखावत होता.

‘संस्कृतिवेध’चे पुढे काय होईल? तर नाशिक, जळगाव व औरंगाबाद येथून तसे सुतोवाच आधीच झाले आहे. त्या मोहिमा सोलापूर जिल्ह्यातील ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या आस्थेवाईक मंडळींनी घडवाव्या असे आम्ही सुचवले आहे. हा प्रकल्प पुढे कसा जातो हे ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’मधील सामील सोलापूर जिल्ह्यातील मंडळी आणि मुंबई-पुण्याकडची मंडळी एकत्र येऊन ठरवतील. त्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात दोन दिवसांची बैठक योजण्याचा बेत आहे. कळावे.

आपले

शेखर रेडे
मुख्य समन्वयक, सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध

किरण क्षीरसागर
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

लेखी अभिप्राय

I liked the entire programme
prakash pethe

prakash pethe14/01/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.