साल्हेर - महाराष्‍ट्रातील सर्वात उंच किल्लासह्याद्रीच्या किल्ल्यांचे ‘मस्तक’ म्हणून मिरवत असलेल्या साल्हेर किल्ल्याला राज्यातील ‘सर्वात उंच किल्ला’ आणि कळसुबाईच्या खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असा मान प्राप्त झाला आहे. किल्ल्यावर असलेले चुना न वापरता केवळ एकावर एक दगड रचून केलेले बुरूज, तटबंदी, चौथरे, पाण्याची टाकी, यज्ञकुंड, गुहा असे ऐतिहासिक अवशेष पाहणाऱ्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाही.

मराठ्यांची एक अपूर्व शौर्यगाथा ज्या ठिकाणी घडल्‍या त्या ठिकाणांमध्ये साल्हेर किल्ल्याचं नाव घेतलं जातं. साल्हेर किल्ल्याचं महत्त्व बहामनी राजवट आणि त्या पूर्वीपासून अबाधित राहिलं आहे. त्याचं स्थान गुजरात आणि बागलाण या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्यानं शिवाजी महाराजांनीसुद्धा त्याचं महत्त्व ओळखलं नसतं तरच नवल! त्यामुळेच महाराजांनी १६७० मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी परतताना साल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. औरंगजेबानं तो किल्ला हातचा गेल्याचं कळताच सरदार इखलास खानाला साल्हेरवर आक्रमण करण्यास पाठवलं. त्यानुसार १६७१ मध्ये मोगल सैन्यानं किल्ल्याला वेढा घातला. ते वृत्त कळताच महाराजांनी सेनापती प्रतापराव गुजर आणि मोरोपंत यांना साल्हेरकडे कूच करण्यास सांगितलं. त्यामध्ये १६७२ च्या फेब्रुवारीत मराठे आणि मोगल यांच्यात घनघोर युद्ध झालं.

मराठ्यांच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा गमिनी कावा सोडून मैदानावर तुंबळ लढाई झाली. मराठ्यांनी दहा हजार मावळे गमावले, मात्र त्यांनी मोगलांची अर्ध्यापैक्षा जास्त फौज कापून काढली; मोगलांना सळो की पळो करून सोडलं. सहा हजारांपेक्षा जास्त घोडे-उंट, सव्वाशे हत्ती आणि मोठा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्या मैदानी लढाईतील विजयानं सोनेरी पान लिहिलं गेलं. सुरतच्या मार्गावर साल्हेरचा बागलण परिसर येत असल्यानं महाराजांनी तो भाग जिंकत सुरतवर त्यांची दहशत ठेवली. मराठ्यांचं मोगल सैन्याबरोबर मैदानात समोरासमोर झालेलं ते सर्वात मोठं युद्ध! त्या युद्धाचं वर्णन कागदपत्रांमध्ये सुंदर केलेलं आहे. त्याचा सारांश असा.. ‘सालेरीस मोठे युद्ध झाले. चार प्रहर दिवस युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला की तीन कोस औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहले. खासा इवासखानचा पाडाव झाला!’

सर्वात उंच साल्हेर किल्लामहाराजांना मोठा विजय मिळाला. त्या विजयाचे वर्णन एका कवीने त्याच्या शब्दांत उतरवले ते असे.. ‘शिवाजीने सालेरीचे युद्ध जिंकल्याची बातमी ऐकून शत्रूच्या काळजात धडकी भरली. स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे तिन्ही लोक महाराजांची कीर्ती गाऊ लागले.’ असा हा भाग्यवान साल्हेर, तेथे महाराजांच्या कर्तृत्वाचा आणखी एक अध्याय लिहिला गेला.

साल्हेर सह्याद्रीच्या किल्ल्यांचे ‘मस्तक’ म्हणून मिरवतो. त्यामुळे त्या ठिकाणी रांगड्या आणि कसदार दुर्गभक्तांचा ओघ नेहमीच वाहत राहिला आहे.

साल्हेरला पोचण्यासाठी नाशिकहून सटाणा-ताहराबाद-वाघांबे मार्गे साल्हेरवाडीला जायचं. रस्त्यातच साल्हेर आणि शेजारी असणारा सालोटा ही जोडगोळी डोळ्यांत भरते. पायथ्याच्या येथून दिसणारा अजस्त्र कातळअंगाचा साल्हेर पाहणाऱ्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाही.

साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यात बागलाण भागात गुजरात सीमेवरच्या डांग जिल्ह्याला खेटून उभा आहे. साल्हेरची उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर ( पाच हजार एकशेएकेचाळीस फूट) एवढी आहे. साल्हेर सर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.

किल्‍ल्‍यावर चढाई करण्‍यासाठी साल्हेर गावातून जाता येतं. त्‍यासाठी नाशिकहून सटाणामार्गे ताहराबाद गाठायचं. तिथून ताहराबाद-मुल्हेर-साल्हेरवाडी असा एसटीने एक तास प्रवास करत पायथ्याशी असलेल्या साल्हेरवाडी गावांत पोचता येतं.  तिथून साल्हेरच्या पश्चिमेकडून तीन तासांत किल्‍ल्‍यावर चढाई करता येते. ताहराबाद-साल्हेरवाडी मार्गावर साल्हेरवाडीच्या तीन किलोमीटर अलिकडे वाघांबे हे गाव लागतं. त्या गावातून साल्हेर आणि बाजूला असलेल्या सालोटा किल्ल्याच्या खिंडीतून अडीच तासांमध्ये चढाई करता येते. मुंबईपासून साडेचार तासांचा प्रवास करून पश्चिम रेल्वे मार्गावर गुजरातमध्ये असलेल्या बिलिमोरा या छोट्या जंक्शनवर पोचता येतं. तिथं पॅसेंजर गाड्या थांबतात. त्या ठिकाणाहून बत्तीस किलोमीटरवर असलेले वाघाई गाव गाठल्‍यास साल्हेरवाडीपर्यंत पोचता येतं.

साल्‍हेर किल्‍ल्याचा मान दुखेल इतका उंच आकाशात घुसलेला कातळकडा पाहून छाती दडपते. तिथून कोरीव पायऱ्यांनी पहिल्या दरवाज्यासमोर पोचायचं. तेथील दरवाज्याचं वैशिष्ट्य म्हणजे चुना न वापरता केवळ एकावर एक दगड रचून केलेली बुरूज बांधणी, खरोखरच अप्रतिम! तिथे कोरलेला शिलालेख आहे. तो पाहून पुन्हा आणखी दोन दरवाजे पार करून माचीवर प्रवेश करता येतो. तिथं इमारतींचे काही अवशेष दिसतात. माचीपासून खड्या चढाईला सुरुवात होते.

सर्वात उंच साल्हेर किल्लागिर्यारोहक कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी चार, पाच, सहा आणि सात दरवाजे पार करून बालेकिल्ल्यावर हाजीर होतो. जसजसे एका मागून एक दरवाजे पार केले जातात. तसतसं किल्ल्याचं भावविश्व उलगडत जातं. तिथं पोचल्यानंतर डाव्या अंगानं पसरत गेलेली तटबंदी, चौथरे, पाण्याची टाकी, यज्ञकुंड आदी वास्तूसुद्धा काहीतरी सांगताना जाणवतात. किल्‍ल्‍यावर पठार आहे. तिथं एका बाजूला पठार आणि दुस-या बाजूला साल्हेरचा उंच भाग नजरेस पडतो. पठारावर तलाव आहे, त्याचं नाव ‘गंगासागर’. काही नैसर्गिक कारणामुळं तलावाचं पाणी काही महिने दुधाळ रंगाचं असतं. त्यासाठी त्‍या तलावाचा उल्‍लेख ‘दुधी तलाव’ असा केला जातो. पठारावर तलावाच्या बाजूला रेणूका मातेचं मंदिर आणि भग्नावस्थेतील गणेश मंदिरही लक्ष वेधून घेतं. त्याच्याच वरच्या अंगाला तीन सुंदर गुहा आहेत. त्‍या गुहा प्रवाशाला रात्र आरामात काढता येईल अशा आहेत.

गुहांच्या शेजारची वाट आपल्याला किल्ल्यावरच्या सुळक्यावर घेऊन जाते. त्या सुळक्यावर परशुरामाचं मंदिर आहे. साल्हेर किल्ला ओळखला जातो तो परशुरामाची तपोभूमी म्हणून. जिंकलेल्या पृथ्वीचं दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवण्यासाठी परशुरामांनी बाण मारला तो त्याच भूमीवरून अशी कहाणी आहे. गिर्यारोहक मंदिरात येतो, तेव्हा तो सह्याद्रीच्या दुस-या क्रमांकाच्‍या सर्वोच्‍च शिखरावर (पहिल्‍या क्रमांकाचे शिखर - कळसुबाई) उभा असतो. मोठा लोभस क्षण! टोकावरून साल्हेरचा दुर्गसखा सालोटा दिसतो, तेव्हा मात्र गिर्यारोहकाचं भान हरपतं. सालोट्याच्या मागे अस्पष्ट होत जाणारे मुल्हेर, हरगड, मांगी, तुंगी यांसारखे बागलाणवीर दृष्टिक्षेपात येतात. त्यात सर्वांत उठून दिसतो तो फक्त सालोटा!

साल्हेर किल्‍ल्याच्‍या पसिरात त्याला खेटून उभा असलेला ‘सालोटा’. ती बागुल राजाची (सन १३०० ते १६००) राजधानी. मुख्य म्हणजे तलवारीच्या मुल्हेरी मुठेसाठी प्रसिद्ध ‘मुल्हेर’ किल्ला, मुल्हेरचा साथीदार ‘हरगड’ किल्ला; तसंच, जैन धर्मीयांचं तीर्थक्षेत्र असे मांगी-तुंगी सुळके अशी पाहण्‍यासारखी तिथं इतर ठिकाणं आहेत.

साल्हेर पाहण्यासाठी दोन दिवस तरी हाताशी हवेत.

- ओंकार वर्तले

Last Updated - 4th April 2016

लेखी अभिप्राय

ओंकार सर खूप हुबेहूब वर्णन केलं आहे तुम्ही. अगदी वाचत असताना आणखी एकदा साल्हेर वारी झाली. १ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ७ वाजता आम्ही साल्हेर पीक ला होतो. खूप विहंगम दृश्य होतं ते. समोर सालोटाचं दर्शन आणि उगवणारा सूर्य न विसरता येणारा क्षण.
धन्यवाद.

बालाजी जाधव 10/03/2016

किल्ला तर बघितला आहे मी पण मला साल्हेर बद्दल एवढं विस्तारात माहित नव्हत .खरंच तुमच् आभार. ह्या किल्ल्याच स्थान माझ्या गावापासुन पंधरा - वीस कि.मी. अंतरावरच आहे .

दिनेश चव्हाण .06/08/2016

ईतका ऐतिहासिक ठिकाणाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे काही दिवसांनी हे पण बघायला भेटत का नाही

राहुल आहिरे 07/09/2016

my birthplace is sahler fort I was living 10 year at the pace thanks for giving such information there is many secret thing which you don't like but I know very well there is many cave in which Shivaji maharaja kept the gold diamond but there know one know the caves

mayur17/10/2017

Khup mast fort

Ganwsh12/07/2018

khup chhan mahiti ahe

tushar chaudhari23/10/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.