दुर्गसखा - गडभेटीचे अर्धशतक


टिम दुर्गसखासुधागड येथे पहिले दुर्गभ्रमण जुलै २००९ मध्ये आयोजित करणाऱ्या ‘दुर्गसखा’ने त्यांच्या गडभेटींचे अर्धशतक पूर्ण केले आहे!

दुर्गप्रेमी तरुणांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोटांच्या प्रेमापोटी स्थापन केलेली संस्था म्हणजे दुर्गसखा. ती मित्रमंडळी सह्याद्रीत अनेक वर्षे भटकत. पायवाटा, कडेकपाऱ्या ‘एकमेकां सहाय्य करून’ पायाखालून घालत. परंतु त्यांनी साहस म्हणून सुरू केलेली भटकंती हळुहळू डोळसपणे घडू लागली.

‘दुर्गसखा’ दोन उपक्रमांमधून काम करू लागले : पर्यटनातून प्रबोधन आणि ‘एक पाऊल मानवतेकडे’

पर्यटनातून प्रबोधन हा ‘दुर्गसखा’च्या स्थापनेमागील मूळ हेतू. गडकोट आणि शिवराय हा त्या सर्वांना जोडणारा जिव्हाळ्याचा धागा. सुमारे साडेतीनशे धाग्यांनी विणलेले गडकोटांचे राज्य अक्षम्य अनास्थेपायी जीर्ण होत चालले आहे. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात जमीनदोस्त झालेले किल्ले जसे होते तसे पुन्हा बांधून काढले. पण ‘इये महाराष्ट्र देशी’ मात्र बेफिकिरी आणि हेळसांड यांसारखे छुपे शत्रू ‘विशेषांचे अवशेष’ करून टाकत आहेत. त्यावर तोडगा म्हणून ‘दुर्गसखा’मार्फत ज्या विविध मार्गांनी दुर्गांची सेवा केली जाते, त्यांपैकी एक म्हणजे दुर्गस्वच्छता. ‘दुर्गसखा’च्या सभासदांनी विविध दुर्गांवरून सुमारे पन्नास पोती कचऱ्याचे निर्मूलन केले आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण, पाण्याच्या टाक्यांची सफाई, गडाची माहिती देणारे फलक असेही छोटे छोटे उपक्रम राबवले आहेत.

संस्थेतर्फे दरवर्षी ‘दूर्ग अभ्यास भ्रमण’ आयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवतात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. त्या कार्यक्रमाद्वारे आम्ही राजगड, रायगड, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी-नाणेघाट, सुधागड अशा दुर्गांचा अभ्यास केला आहे.

पु.ल. देशपांडे त्यांच्या एका भाषणात म्हणतात, “आपण आनंदात असताना दुसऱ्याही कोणाला तरी आनंदाची गरज आहे याची जाणीव असणं म्हणजे माणुसकी.”  इतके सुंदर विचार निव्वळ विचारात न राहता ते प्रत्यक्ष आचारात यावेत याकरता ‘दुर्गसखा’ पर्यटनातून प्रबोधनाच्या जोडीने ‘एक पाऊल मानवतेकडे’ही टाकत असते.

शहापूरच्‍या एका आदिवासी पाड्यात दुर्गसखा  टिमपष्टेपाडा येथील डिजिटल शाळेतील ‘थ्रीडी’ वर्ग‘दुर्गसखा’ने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याला संस्थेचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले आहे. ‘दुर्गसखा’तेथील वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवरील शाळांमधून शिक्षण घेणारी गुणी आदिवासी मुले निव्वळ साक्षर न होता सुसंस्कृतही व्हावी म्हणून त्या मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये पाड्यांपासून शाळेपर्यंतचा प्रवास सोपा होण्यासाठी सायकली, बौद्धिक विकासासाठी शैक्षणिक सीडी आणि दूरदर्शन संच, संगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणक, विद्यार्थी दत्तक योजना, सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप, दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटप, गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रंथालय, गरजूंना कपडेवाटप अशा कामांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (२०१४) टेंभुर्ली केंद्रातील डिजिटल वर्गाचे आणि पष्टेपाडा येथील डिजिटल शाळेतील नव्या ‘थ्रीडी’ वर्गाचे आणि त्यासाठी ऊर्जा पुरवणाऱ्या सोलार सिस्टिमचे उद्घाटन करण्यात आले. ‘दुर्गसखा’ चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे आणि ‘आपुलकी’ पुणे या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यापुढे पष्टेपाडा शाळेत डिजिटल फळ्यावर शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना विद्युत मंडळाच्या मेहेरबानीवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.

मकरंद केतकर,
ई २/६०२, ओव्हलनेस्ट,
आदित्य गार्डन सिटीमागे,
सर्व्हिस रोड, वारजे, पुणे ४११ ०५८
८६९८९५०९०९
makketkar@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.