सोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा


घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यानं पाहीन रूप तुझे...

सोनुर्ली माऊलीचे मंदिरसोनुर्लीतील माऊलीची यात्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे! सोनुर्ली सावंतवाडी जिल्यात आणि तालुक्यात येते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे.

श्रीदेवी माऊलीसमोर नतमस्तक होताना तिने केलेल्या कृपादृष्टीचे आभार कसे आणि किती व्यक्त करावे, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. मातेसमोर शिरसाष्टांग दंडवत घातल्यानंतर, त्या अवस्थेत परिक्रमा पूर्ण करणे हे माऊलीच्या जत्रेत श्रद्धेचे प्रतीक समजले जाते. उपवास करून, उत्सवाच्या रात्री परिक्रमा पूर्ण केली आणि माऊलीचे तीर्थ अंगावर झेलले की भक्त धन्य होतो! महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांतून भक्तगण देवीच्या दर्शनास येतात. कार्तिक कृष्ण प्रतिपदा हा यात्रेचा दिवस.

सोनुर्ली देवीक्त साष्टांग नमस्कार घातल्यामुळे देवापुढे पूर्णपणे नतमस्तक होतो. त्याच्या मनातील अहंकार दूर होतो. जमिनीवर पूर्णपणे आडवे झाल्यामुळे आणि विशेषत: जमिनीकडे तोंड असल्यामुळे काही क्षणांपुरता त्याचा आसपासच्या घडामोडींशी संपर्क तुटतो. अशी भावना लोटांगण यात्रेमागे आहे.

साष्टांग नमस्कार करण्याची पद्धत ठरावीक आहे. देवासमोर पालथे पडून पोटाला जमिनीवर टेकवावे. दोन्ही हातांना डोक्यावर नेऊन दंडवत करावा. त्यामुळे भक्ताच्या शरीराची कपाळ, छाती, हात, पाय, गुडघे अशी आठ अंगे जमिनीशी जोडली जात असतात. शरीराला ताण पडत असतो आणि मनी शांततेची अनुभूती घेता येते.

भक्ताने त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी; तसेच, मन:शांतीसाठी देवीला लोटांगणाचा नवस बोलण्याची शतकानुशतकांची प्रथा आहे. तो नवस जत्रेत फेडला जातो.

उत्सवाची सुरुवात कार्तिक पौर्णिमेपासून होते. पौर्णिमेच्या दिवशी मूळ घरातील (मांड) उत्सवमूर्ती सर्व लवाजम्यासह सवाद्य मंदिरात प्रवेश करते. तेथे देवीला चुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवून ग्रंथवाचन केले जाते. ते ग्रंथवाचन त्रिपुरारी पौर्णिमा ते जत्रेच्या उत्सवापर्यंत नियमितपणे केले जाते. मुख्य जत्रोत्सवाच्या दिवशी दिवसभर मंदिरात दर्शन व नवस बोलणे-नवस फेडणे आदी कार्यक्रम सुरू असतात. माऊलीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. लोटांगणापूर्वी काही वेळ दर्शन व नवस फेडण्याचा कार्यक्रम बंद केला जातो.

श्रीदेवी माऊली मंदिराच्या बाजूला श्रीरवळनाथ, श्रीलिंगायत, श्रीपावणादेवी यांची मंदिरे आहेत. सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांचे आद्यदैवत म्हणून श्रीदेवी माऊलीला मानले जाते. त्या देवीला ‘महिषासुरमर्दिनी’ असेही संबोधले जाते.

उत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री जेवल्यानंतर आंघोळ करून उपवासास सुरुवात होते. नवस पूर्णत: निराहार व व्रतस्थ राहून केला जातो. रात्री दहानंतर प्रत्यक्षात लोटांगणांना सुरुवात होते. तत्पूर्वी मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीवर लोटांगण घालणारे भाविक पुरुष व महिला स्नान करून मंदिरात जातात. मंदिरातून घंटा व वाद्ये यांच्या नादात उत्सवमूर्ती पालखीतून बाहेर आणली जाते. पालखीसोबत पुरोहित, मानकरी आरती, भजन, मंगलाष्टके म्हणतात. त्या वेळी सोनुर्ली देवी आणि परिसरातील अन्य, देवता यांचा अंगात संचार झालेल्या व्यक्ती पालखीच्या सोबत असतात. पुरुष जमिनीवर झोपून लोटांगण घालत मंदिराची परिक्रमा पूर्ण करतात, तर महिला भाविक उभ्या उभ्या प्रदक्षिणा करून ‘लोटांगण’ पूर्ण करतात. मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून सुरू झालेले लोटांगण मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करत त्याच पायरीपर्यंत येत पूर्ण केले जाते. त्यानंतर पुन्हा अंघोळ करून मंदिराच्या पायरीवर श्रीफळ वाढवले जाते.

मातेच्या प्रांगणात दुसऱ्या दिवशी झालेला तुलाभार कार्यक्रम अनोखा असाच असतो. त्यामध्ये केळी, नारळ, तांदूळ, साखर, गूळ अशा पाच जिनसांनी तुलाभार केला जातो. कार्यक्रम दुपारपर्यंत चालतो. तो संपला, की जत्रोत्सवाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाल्याचा कौलही घेतला जातो.

सोनुर्ली देवीच्या मंदिराचे बांधकाम काळेत्री दगड वापरून करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील घराच्‍या बांधकामांमध्‍ये काळेत्री दगड वापरू नयेत असा दंडक आहे. सोनुर्ली गावात स्लॅबचे घर सापडणार नाही. स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल लागत नाही. गावातील मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिर्‍याचे दगड वापरले जात नाहीत. येथे विटांची घरे पाहायला मिळतात. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात.

(प्रहार, २० नोव्हेंबर २०१३)

किशोर राणे
मु. पो. हरकूळ खुर्द,
ता. कणकवली, जिल्हा, सिंधूदुर्ग ४१६६०१
९४२२०५४६२७
kishorgrane@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.