वसंतची गरुड भरारी


वसंतची गरुड भरारी माझी वसंत वसंत लिमये याच्याशी ओळख अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्याचा घट्ट परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला; त्याने त्याची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली तेव्हा! परिचय त्यानंतर सतत जवळचा व सखोल होत गेला आहे. तो पुण्याचा व मी मुंबईत , पण आम्ही गेल्या चार वर्षांत पन्नासपेक्षा अधिक वेळा भेटलो असू व प्रत्येक वेळी दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक. त्यांतील बहुसंख्य भेटी वसंत वसंतने पुढाकार घेऊन योजलेल्या.

वसंतने कादंबरी ज्या मेहनतीने, चिकाटीने आणि अभ्यासाने लिहिली त्यावर ‘कादंबरीचे लेखन’ नावाचे पुस्तक होऊ शकेल. त्याने कादंबरीची कथावस्तू ठरवल्यावर त्यातील प्रत्येक सूक्ष्म तपशील तपासून पाहिला. कादंबरी जेथे जेथे घडते, तेथे जरूर तर जाऊन सर्व माहिती गोळा केली, त्यामधील कथावस्तूची, राजकारणाची जाणकारांशी चर्चा केली; आणि त्याची कादंबरी आहे जागतिक पातळीवर घडणारी! त्यामधील महत्त्वाच्या घटना घडतात त्या अमेरिका-कॅनडा यांच्या सीमेवर व स्कॉटलंडमध्ये. दिल्ली, उत्तराखंडातील काही ठिकाणे आणि डोंबिवली, नाशिक , चिपळून-रत्नागिरी ही अन्य महत्त्वाची ठाणी. भारतीय पंतप्रधानांना ठार मारण्याचा आंतरराष्ट्रीय (अमेरिकन?) कट आणि त्याचा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबावरील आघात हा कादंबरीचा विषय. कादंबरी प्रसिद्ध होऊन काही महिने लोटले. वाचक त्यामधील गूढ कारस्थान, आंतरराष्ट्रीय राजकारण, संगणकाचा गुन्हेगारीसाठी वापर अशा गोष्टींनी व लेखकाने केलेल्या वेगवान मांडणीमुळे प्रभावित झालेच;  परंतु त्यांमधील दीर्घ-प्रदीर्घ प्रवासवर्णने, स्थळवर्णने हा उलटसुलट मतांचा विषय झाला. रुढ लेखनपद्धतीमध्ये अशा अवांतर तपशिलांना कथा-कादंबरीसारख्या घट्ट बांधून असलेल्या ललित आविष्कारात स्थान नसते, परंतु वाचकांच्या एका गटाला लेखकाने पात्रांच्या माध्यमातून दिलेले प्रवासांचे तपशील व स्थळवर्णने यांचाच मोह पडला आहे. कादंबरीचा नवा घाट त्यामधून आकाराला येईल काय असाही काही साहित्य अभ्यासकांना मुद्दा वाटत आहे.

वसंतच्या कादंबरीलेखनाचे थोडे जास्त वर्णन झाले, परंतु ते त्याचे अलिकडचे वेड आहे. तसे, त्याचे ‘धुंद स्वच्छंद’ हे गिरिभ्रमणावरील ललित लेखनाचे पुस्तक वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले आहे. त्याने त्यानंतरही वर्तमानपत्रांमध्ये कथा-लेख व स्तंभ लिहिले आहेत, पण लेखनाचे मोठे काम असे कादंबरीचे हे पहिले. तोच त्याचा गेल्या चार वर्षांचा ध्यास झाला होता. त्याचा स्वभाव असा, की त्याचा ध्यास त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांचा, परिचितांचा, परिवाराचा असा सर्वांचाच बनत जातो. तसे येथेही घडले, कारण वसंतला त्याच्या कामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट उत्तम, सर्वांगीण व परिपूर्ण हवी असते. त्यासाठी तो तनमनाने झटत राहतो.

लेखन हा काही वसंतचा प्रमुख प्रांत नव्हे. तो आयआयटीचा पदवीधर. त्याचे मुख्य वेड गिर्यारोहण. तो सांगतो, की गिरिभ्रमणाचा किडा त्याला प्रथम रुइयात व नंतर पवईच्या आयआयटीत चावला. त्यामुळे त्याने शिक्षण पूर्ण होताच पहिला ध्यास घेतला तो भारतभरातील डोंगर-गड-किल्ले पालथे घालण्याचा. तो त्याच ध्यासात स्कॉटलंडला जाऊन ‘आऊट डोअर एज्युकेशन ट्रेनिंग’चे कौशल्य शिकून आला. त्याच्या आयुष्यातला १९८० ते १९९० हा काळ रोमहर्षक आहे, कारण तो अनेक गोष्टींना हात घालून स्थिरावायचा प्रयत्न करत होता. ‘स्थिरावायचा’ हा शब्द माझा. वसंत सतत अस्थिरच असतो आणि काहीतरी नवे वेड घेऊन जगत असतो.

त्याने त्या दशकातील धडपडीत मोठे अपयश पचवले, ते कांचनगंगा मोहिमेच्या आगेमागे. त्या आधीच्या गढवाल ट्रेकमध्ये (१९८७) त्याचे दोन साथी वाहून गेले होते. तरीसुद्धा वसंतने धीर एकवटून कांचनगंगावर (१९८८) चढाई करण्याचे योजले. कांचनगंगा हे हिमालयातील दोन नंबरचे शिखर. कांचनगंगा मोहीम सर होऊ शकली नाहीच, परंतु वसंतने मात्र त्याच्या चमूचा उपनेता संजय बोरोले यास गमावले. त्याचा मृत्यू शीताघाताने झाला, त्याचे पार्थिव पंचावन्न किलोमीटर खाली आणून त्याचे दहन केले गेले. वसंत म्हणतो, ती सर्वांत मोठी अंत्ययात्रा असावी.  सहसा हिमालयात मृत्यू झाला तर तेथेच बर्फाच्या नदीत (क्रेव्हेस) पार्थिव सोडले जाते. आम्हाला संजयला सोडणे शक्य नव्हते. आम्ही अकरा हजार फूट खाली शव आणून त्याचे रीतसर दहन केले. तो धक्का त्यावेळी फोफावत असलेल्या गिरिभ्रमण जगतास पचवणे अवघड गेले, बरीच मानसिक पडझड झाली. वसंत वसंतने तो भाग फार थंडपणाने जिरवल्यासारखा वाटला, त्याने त्याचे तडे त्याच्या आयुष्यावर उमटू दिले नाहीत. त्याने त्या मोहिमेच्या नोंदी लिहाव्या असे त्याच्या काही मित्रांना, सहकाऱ्यांना वाटते, वसंतकडून मात्र त्यांचा उल्लेख कधी होत नाही. कांचनगंगा ही एका मोठ्या चमूची फार मोठी महत्त्वाकांक्षी चढाई होती. वसंतकडे त्या मोहिमेचे नेतृत्व होते. त्याने मोहिमेचे संघटन व पूर्वतयारी योजनापूर्वक केली होती. त्यातील महत्त्वाचा भाग होता मोहिमेसाठी पैसे उभे करण्याचा. त्यावेळी त्याने टाटा यांची निधी उभारणीसाठी भेट घेतली. त्याने तो प्रसंग लिहून प्रसिद्ध केला आहे, तो टाटा यांचे अवधान आणि औदार्य व्यक्त करावे म्हणून, परंतु त्यातून वसंतचे गुण ध्यानी येतात व त्याची घडण कळते. किती विधायक आणि शोधक वृत्ती आहे त्याची!

वसंतने त्यानंतर ‘प्रशिक्षणा’चे खूळ पकडले. तोपर्यंत उद्योग जगतात ‘व्यवस्थापन’ व तत्संबंधीचे शिक्षण यांना अपार महत्त्व आले होते. कोणतीही पदवी पदव्युत्तर ‘मॅनेजमेंट ट्रेनिंग’ शिवाय ‘अर्थ’पूर्ण होत नव्हती. त्याच सुमारास वसंतच्या डोक्यात वेगळे विचार घोळत होते. तो ‘रानफूल’ या नावाने मुलांना संस्कारित करण्याची शिबिरे मुळशी परिसरातील डोंगरांमध्ये घेत होताच. त्यांचा प्रभावदेखील मराठी मध्यमवर्गात जाणवत होता. परंतु त्यामध्ये सातत्य कसे आणायचे हे बहुधा त्याला उमगले नसावे किंवा त्याला त्याच्या स्कॉटलंडमधील ट्रेनिंगचा नव्या ‘व्यवस्थापन’ प्रभावी वातावरणात उपयोग कसा करता येईल याची क्लृप्ती ध्यानी आली असावी.

खुल्या वातावरणातील बालशिक्षणाची कल्पना येथे रुजली नाही, तथापी वसंतचा स्कॉटलंटमध्ये झकास परिचय झाला होता. एवढेच नव्हे तर ब्रिटिश सहकार्यांच्या सहाय्याने त्याने ‘हाय प्लेसेस’ ही कंपनीदेखील स्थापन केली होती. तीच कंपनी खुल्या वातावरणातील व्यवस्थापन प्रशिक्षणाचे केंद्र बनली.

वसंतचे ‘आऊट डोअर मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर’ ही गोष्टदेखील अभूतपूर्व आहे. माणसाचे गुण निसर्गात प्रत्यक्ष वावरताना, खेळताना कसोटीला लागतात व त्या ओघात तो नवे विशेष, नवी कौशल्ये हस्तगत करतो आणि त्याला जीवन नेटकेपणाने जगण्याचीदेखील समज येते हे सूत्र त्या प्रशिक्षणामागे आहे. अर्थात त्यास आधुनिक प्रशिक्षण तंत्रात बसवले गेले आहे. ते प्रशिक्षण मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकार्‍यांसाठी असते. वसंतने ते देण्यासाठी पुणे-कोलाड रस्त्यावर ताम्हिणी घाटामध्ये डोंगरभागात मोठे केंद्र उभे केले आहे. त्याचे क्षेत्र पंचावन्न एकरांचे आहे. तेथे तंबूमध्ये राहण्याची जशी सोय आहे, तसेच पंचतारांकित हॉटेलांना मागे सारील अशा सुविधांसह असलेल्या निसर्गानुकूल पक्क्या इमारतींमध्ये राहण्याची देखील सोय आहे. चढा-उतरायला डोंगरकडे, जलतरणासाठी तलाव अशा आवश्यक सुविधा सेंटरभोवती आहेत. त्या ‘सेंटर’चे नाव आहे ‘गरुडमाची’ . त्या नामकरणातूनदेखील वसंत अस्सलपणे प्रकटतो. गरुडमाची या नावाला जशी ऐतिहासिकतेची डूब आहे, तशी तेथील भूगोलाची, निसर्गाचीदेखील आहे. वसंत दूरची डोंगररांग दाखवतो आणि सांगतो, की आम्ही तेरा वर्षांपूर्वी येथे आलो तेव्हा तेथे गिधाडांच्या चाळीस कपारी होत्या. त्यामध्ये दोन गरुडदेखील होते. मला गरुडाचे फार आकर्षण. त्यामुळे त्या गरुडांना मनात धरून सेंटरचे नाव ठेवले गरुडमाची.

योगायोग असा, की वसंतच्या मित्रांनी एकदा त्यांपैकी एका गरुडाला उड्डाणाच्या अनोख्या पोझमध्ये कॅमेर्‍यांत टिपले आणि तो फोटो वसंतच्या संगणकाचा स्क्रीनसेव्हर झाला! वसंत सांगतो, की गिधाडे किंवा गरुड सहज दिसत नाहीत. त्यासाठी दिवसच्या दिवस ध्यान लावून बसावे लागते. शिवाय, गेल्या काही वर्षांत गिधाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यांची चाळीस घरटी होती, आता सत्तावीस राहिली आहेत.

वसंतची गरुड भरारी वसंत व त्‍याची पत्‍नी मृणाल यांचे पुणे -कोलाड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेले ते सेंटर हे विस्तृत परिसराचे आहे. तेथे आजुबाजूच्या गावांतील सत्तर-ऐंशी माणसांना नियमित काम आहे. त्या पलीकडे त्याच्या ‘हाय प्लेसेस’ या कंपनीत सत्तरएक माणसे कामाला असावीत. तो आवाका उद्योजकाला लाजवणारा आहे, परंतु वसंत जगतो मध्यमवर्गीय. त्याची ऐट, श्रीमंती व्यक्त होते त्याच्या वेळोवेळच्या ध्यासातून- वेडातून.

वसंतला एक भटक्या माणूस म्हणून सारा महाराष्ट्र , विशेषत: सह्याद्री व कोकणप्रांत पूर्ण पाठ आहे. त्याने गडकिल्ले तर पालथे घातले आहेत. त्याला शिवाजी आणि मावळे यांचा इतिहास जसा रोमांचकारी वाटतो तसा आधुनिक विज्ञानाचा इतिहासदेखील आकर्षित करतो. त्यामुळे तो त्याने गरुडमाचीला रॅपलिंग प्रशिक्षणासाठी उभारलेल्या ‘टॉवर’वर चढला की चहुबाजूला नजर फिरेल तेथपर्यंतच्या प्रदेशाची सारी वैशिष्ट्ये सर्व तपशिलांनिशी सांगतो. त्यामध्ये त्याला मुळशीच्या टाटा जलविद्युत केंद्राची हकिगत विशेष मोह घालते. त्यामध्ये मग सेनापती बापटांच्या सत्याग्रहाची सुरस कहाणी येते; त्यासोबत पाली-सुधागड-सरसगड यांचा इतिहास येतो आणि श्रीमंती अँबी व्हॅलीचे ग्लॅमरदेखील प्रकाशते.

वसंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. त्यासाठी सर्व मार्ग चोखाळतो. त्याच्या ‘हाय प्लेसेस’ने आऊट डोअर मॅनेजमेंट ट्रेनिंगचे गेल्या तेवीस वर्षांत सहा-सात ‘प्रोग्राम’ केले आहेत. ते जसे गरुडमाचीला घडून आले तसे कंपन्यांच्या गरजेप्रमाणे दिल्ली, बंगलोर, मुंबई व मध्यपूर्वेत मस्कत येथेही झाले. त्याच्या त्या उपद्व्यापात त्याची हक्काची साथीदार असते - मृणाल. ती त्याच्यापेक्षा काकणभर अधिकच चोखंदळ आहे. त्यामुळे वसंत तिला कलावंत म्हणतो आणि स्वत:ला घिसाडी. तिच्या कल्पनेनुसार कामे घडवणारा. ट्रेनिंग सेंटर - तेथील आधुनिकता, सुखसोयी व सौंदर्यदृष्टी पाहिली, की मृणालच्या कलात्मकतेचा अंदाज येतो. तिला विशेष ओढ आहे ती पाश्चात्य व भारतीय पुराणकथांची. वसंतच्या ‘लॉक ग्रिफिन’ या कादंबरीतील ‘ग्रिफिन’चा संबंध मृणालच्या ज्ञानाशी जाऊन भिडतो.

वसंतची गरुड भरारी वसंत आणि मृणाल यांनी पुण्याच्या पौड रोडवर त्यांचे राहते घर बांधले आहे तो म्हणजे एक ‘म्युझियम पीस’च आहे! त्या घराच्या मुख्य दालनात शिरले, की वसंतला कुर्निसात करावासा वाटतो. तो वाडाच म्हणायचा. वसंत व मृणाल यांनी पश्चिम महाराष्ट्र व कोकण येथील पडणारे/पाडले जाणारे वाडे हेरून, तेथील त्यांना हवे ते बांधकाम साहित्य मिळवून त्यातून त्यांचा बंगला उभा केला आहे. वसंत सांगत होता, की ती दोघे तीन वर्षे साहित्य गोळा करत होती. मग त्यानुसार त्यांनी तो वाडा रचला व बांधून काढला. त्याचे दर्शन ऐतिहासिक वास्तूचे आहे, पण त्यातील सोयी सुविधा अत्याधुनिक आहेत. त्यामुळे त्या वास्तूवर वर्तमानपत्रांत लेख लिहून आले आहेत. वसंत त्या वास्तुबांधकामामागील करामती आपल्याला कथन करून सांगत असतो त्यावेळी मृणाल पहिल्या मजल्यावरील तिच्या कार्यालयात संगणकावर काम करत असते!

वसंतचे ‘प्रोग्राम’ नसतील व त्याच्या डोक्यात दुसरे खूळ नसेल त्या काळात किंवा त्या निमित्तानेदेखील त्याची भटकंती चालू असते. त्यातून त्याला नवनवीन कल्पना भिडतात, सुचतात आणि त्यांचा पाठपुरावा सुरू होतो. चार वर्षांपूर्वी असेच घडले. तो भटकत भटकत रेवदंडा-नागाव-चौल परिसरात पोचला होता. त्याला तेथे कळले, की चौलजवळच्या खाडीत आसपासच्या चार गावांमध्ये नौकांची स्पर्धा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी होते. प्रत्येक गावच्या दोन नौका, म्हणजे एकूण बारा. पण स्पर्धा पाहायला मचवे, होड्या, तराफे यांमधून आठ-दहा हजार लोक, मुख्यत: कोळी आलेले असतात. दिवसभर जल्लोषाचे वातावरण असते. वसंत वसंत गेली चार वर्षे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी चौलला असतो. त्याने तो ‘इव्हेंट’ पर्यटकांमध्ये प्रिय करून टाकला आहे. त्यासोबत तो रायगड जिल्ह्याची एक दिवसाची सहलदेखील आखतो. वसंत अशी सहल योजतो तेव्हा ती केवळ मौजमजा राहात नाही – ती भरपूर असतेच; पण त्याबरोबर, त्या मोहिमेस अभ्यासाची डूब असते. पश्चिम किनाऱ्यावरचे चौल हे बंदर ख्रिस्तपूर्व इतिहासकाळापासून प्रसिद्ध, पण ते आता बंदर राहिलेले नाही. ते समुद्राच्या आत दोन किलोमीटरवर गेले आहे. मग ती जमीन निर्माण कशी झाली? वसंतने पुण्याच्या डेक्कन कॉलेजकडे धाव घेतली. त्या अभ्यासातून तयार झाला दहा मिनिटांचा स्लाइड शो. तेवढ्यात चौल परिसराच्या इतिहास-भूगोल व वर्तमान नजरेसमोर येतात. ऐकणारा – पाहणारा मनोमन ठरवतो, की या वर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला (१२ एप्रिल) रेवदंड्याच्या खाडीतील नौकांची शर्यत पाहायचीच. वसंतने परंपरागत चालत आलेल्या एका अनोख्या उत्सवाला आधुनिक जगाशी जोडून घेतले आहे.

वसंतचा हव्यास असा सांस्कृतिक ओढीचा आहे. त्यामधून तो इतिहास व वर्तमान यांची सांगड एकाच वेळी घालत असतो आणि त्याला डूब भविष्यकाळाची असते. मला त्याच्या प्रत्येक प्रयत्नात ती समग्रता जाणवते. मी त्यांना प्रयत्न म्हटले तरी त्यामध्ये सहसा सफलता साध्य झालेली असते, कारण त्याला व्यवस्थापन कौशल्य शिकवायचे तर स्वत: असफल राहून चालणार नाही. मला कौतुक वाटते, ते त्याच्या जीवनदृष्टीचे. तो शिक्षकाचा मुलगा, निम्न मध्यमवर्गातला. जिद्दीने आयआयटीत शिकला व यशस्वी झाला. पण त्याने स्वत:चा मार्ग त्या शिक्षणाच्या चाकोरीत न अडकता स्वेच्छेने चोखाळला. तो कोटी कोटींचे व्यवहार करतो. व्यवसाय या तऱ्हेने यशस्वी करणारी माणसे आहेत, पण त्यांनी स्वत:चा आत्मा त्या प्रवासात हरवलेला असतो. वसंतने ते स्वत्व जागे ठेवले. त्यामुळे त्याची रसिकता जिवंत राहिली. त्यामुळेच लेक रेवतीच्या लग्नात भल्यामोठ्या ‘रिसेप्शन’मध्ये तो धोतर व मृणाल नऊवारी लुगडे नेसून सुटाबुटातल्या पाहुण्यांचे स्वागत करताना पाहून कोणाला आश्चर्य वाटले नाही.

‘वसंत वसंत लिमये’ या नावात विचित्रता जाणवते. त्याला त्याच्या वडिलांचे नाव योगायोगानेच ठेवले गेले. त्याच्या बारशाच्या वेळी त्याचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न निघाला तेव्हा मावशीने त्याच्या वडिलांचे – वसंतरावांचे नाव वेगळ्या संदर्भात उच्चारले तर उपस्थित महिलांमध्ये समज असा पसरला, की  बाळाचे नाव वसंतच ठेवायचे आहे आणि ते मुलाच्या कानात सांगितले गेले. त्यामुळे वसंतचा नवजात मुलगा वसंतच झाला. जॉर्ज द सेकंड असतो तसा एकाच घरात हा दुसरा वसंत. वसंत स्वत:च्या दृष्टीने जगला, स्वत:च्याच दृष्टीने वाढला. त्यामुळे कोणी त्याला स्वार्थी – महत्त्वाकांक्षी समजतात, कोणी स्वान्त. जे जीवनात कशाला आरंभ करून थांबतात त्यांना वसंतसारखी माणसे स्वार्थप्रेरित वाटतात, पण वास्तवात सतत विस्तारत राहणे हा मानवी मनाचा आणि मेंदूचा स्वाभाविक भाग आहे. वसंत वसंतच्या बाबतीत तो दृगोचर होतो व म्हणून त्याची झेप ही गरुडझेप ठरते – त्याच्या सेंटरमागच्या डोंगरातील गिधाडांमध्ये राहणाऱ्या दोन अपवादात्मक गरुडांसारखी!

वसंत लिमये,
ईप्सित, सर्वे क्र. ११०/१ए,
बळवंतपुरम, पौड रोड,
पुणे - ४११०३८
९८२२१९०६४४
vasantlimaye@gmail.com

- दिनकर गांगल

('आरोग्यसंस्‍कार' मासिकातून साभार)

लेखी अभिप्राय

Bhannat manasanchi (shri aani sau. Limaye) bhannat goshta!!!!

veena shrikant…23/06/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.