अजिंठ्यातील 'प्रसाद'


“बुध्द माझ्या आयुष्यात कधीच नव्हता...आणि आता, त्याच्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात येत नाही.” प्रसाद पवार त्याच्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलत होता.
 

प्रसादला तीन डोळे आहेत. दोन डोळे आपल्या सगळ्यांना असतात तसे आणि त्याचा तिसरा डोळा आहे, त्याचा कॅमेरा! त्याच्या तिस-या डोळ्याला समोर जे, जसे आहे ते दिसतेच, पण त्याही पलीकडे जे अव्यक्त व अनंत आहे तेही जाणवते. त्या जाणिवेतूनच, तो सध्या एका प्रकल्पावर झपाटल्यासारखा काम करत आहे. त्याचा संबंध आहे दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये रंगवल्या गेलेल्या चित्रांशी. प्रसादने त्याला स्वत:ला त्या वेळचे सामाजिक जीवन, राहणीमान, कला, जीवनशैली यांविषयी तपशिलात जाऊन बोलणा-या त्या चित्रांचा सांभाळ व्हावा यासाठी वाहून घेतले आहे.
 

चित्रांचा वैभवशाली वारसा विनाशाच्या वाटेवर आहे. प्रसाद तो जपण्यासाठी दोन पातळ्यांवर काम करत आहे. एक - त्या सर्व पेंटिंग्जचे दस्तऐवजीकरण(documentation). तो त्यांचे कमी प्रकाशात फोटो काढतो आणि दुसरे म्हणजे, त्याने चित्रांचे ज्या-ज्या ठिकाणी पोपडे उडाले आहेत, टवके गेले आहेत त्या भागातील चित्राचे मूळ तपशील डिजिटल तंत्राने रंगवण्याचे काम सुरू केले आहे. मूळ चित्र पूर्णार्थाने समोर यावे व त्यातील रंगसंगती, बारकावे, सौंदर्य समजावे यासाठी त्याचे प्रयत्न आहेत.
 

बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रसादचे कलाशिक्षण चालू होते. त्याला गुणे नावाचे सर कलेचा इतिहास शिकवायला नाशिकच्या कलानिकेतन महाविद्यालयात होते. त्याने अजिंठा चित्रशैली शिकत असताना जेव्हा चित्रे प्रत्यक्ष बघितली तेव्हा समोर आलेले वास्तव धक्कादायक होते. चित्रे काढली गेली दोन हजार वर्षांपूर्वी. भगवान बुध्दांचे महानिर्वाण इसवी सनपूर्व ५७० मध्ये झाले. गुंफा व त्यांतील लेणी कोरण्यास इसवी सनपूर्व ३०० मध्ये सुरुवात झाली. गुंफा बौध्द तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी फिरणा-या भिख्खूंसाठी वर्षावासाची सोय म्हणून खोदण्यात आल्या. चित्रे गुंफेतील दगडांवर दूध, शेण, डिंक, तांदळाचे तूस, भस्म असे विविध घटक एकत्र करून, त्याचा गिलावा देऊन त्यावर नैसर्गिक रंगांनी रंगवली आहेत. कलाकारांनी केवळ भिंतींवर नाही तर गुंफांच्या छतांवरही चित्रे रंगवण्याचे आव्हानात्मक काम केले आहे. चित्रे अर्थातच कोणा एका कलाकाराच्या निव्वळ कल्पनेतून जन्माला आलेली नाहीत. ती बौध्द तत्त्वज्ञानाचा संदेश आणि त्या काळातील समाजजीवन हे विविध कथांद्वारे सांगण्यासाठी आहेत.
 

कलाकारांनी तत्कालीन समाजजीवन दाखवण्याबाबत किती बारकाईने विचार केला असावा! त्यांनी स्त्री-पुरुषांची वस्त्रप्रावरणे व अलंकार, गावाची रचना, मनोरंजनाची साधने, घरे व त्यांची वास्तुरचना, प्राणी व निसर्गजीवन या प्रत्येक घटकातील सूक्ष्म तपशील टिपले आहेत. राजमहालातील झुंबरे, हंड्या, पडदे त्यांत रंगसंगतीसह येतात तसे कापडांचेही अनेक प्रकार- सिल्क, कॉटन, जाडेभरडे - दिसतात. एखाद्या यक्षाच्या कानातील आफ्रिकन शैलीशी मिळतीजुळती मोठ्ठी रिंग बघितल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते!
 

माणसांच्या जगण्याचे इतके तपशील इतक्या बारकाईने टिपलेले असताना त्याचे महत्त्व आमच्यासाठी काहीच का नसावे? एखादी भंगलेली मूर्ती, देवाची विद्रूप झालेली प्रतिमा आपण आपल्या घरात ठेवत नाही. नदीपात्रात सोडून देतो. अशी मानसिकता ज्या समाजाची आहे त्या आपल्या समाजाला अजिंठा चित्रांचे विद्रूपीकरण कसे बघवते? गुंफांपैकी एक ते तीस गुंफांमध्ये दगडात शिल्पे कोरलेली आहेत आणि गुंफा क्रमांक एक, बारा, सोळा व सतरा यांमध्ये शिल्पांसह मोठ्या प्रमाणात चित्रे आहेत. बहुसंख्य चित्रांचे पोपडे पडले आहेत. अनेक ठिकाणी सिमेंटचा विद्रूप गिलावा दिलेला आहे. हे दृश्य कोणत्या कलाकाराला, इतिहास अभ्यासकाला किंवा संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणार नाही? हे समृध्द वैभव समाजाच्या अवहेलनेमुळे येत्या पन्नास एक वर्षांत नामशेष होईल या अस्वस्थतेतून प्रसाद कामाला लागला.
 

गुंफांमध्ये फ्लॅश वापरून छायाचित्रे काढण्यास पुरातत्त्व खात्याने मनाई केलेली आहे. शिवाय, गुंफा पर्यटकांना दिव्यांच्या प्रखर प्रकाशाचा परिणाम चित्रांवर होऊ नये म्हणून अगदी कमी, सौम्य अशा प्रकाशात(ज्याला चार लक्स लाईट म्हटले जाते) बघायला मिळतात. प्रसादने त्यासाठी अभ्यास करून घरीच एक उपकरण बनवले. दीडशे वर्षांपूर्वी कॅमे-याचा शोध लागला तेव्हा रेंज फायंडर (Range Finder) तंत्रज्ञान विकसित केले गेले. त्या धर्तीवर ज्या वस्तूचे छायाचित्र काढायचे ती वस्तू व कॅमेरा यांतील अंतर इंचांत मोजून ते सेटिंग कॅमे-यावर लावण्याचे तंत्र प्रसादने छायाचित्रणासाठी वापरले आहे. चित्रांचा पृष्ठभाग समतल व गुळगुळीत नसल्याने काम अधिक अवघड बनले.
 

प्रसादमध्ये तयारीचा छायाचित्रकार, चित्रकार आणि रंगसंगतीची जाण असणारा कलाकार अशा तीन गुणांचा संगम आहे. त्याने काम कॅमे-यातील तंत्राचा नेमका वापर करत अचूक साधले आहे. त्याने एखाद्या छायाचित्रासाठी तर वर्षाचे तीनशेपासष्ट दिवसही काम केले. एकोणिसाव्या गुंफेत ध्यानस्थ चार बुध्दांचे शिल्प आहे. प्रसादला त्या बुध्दांची ध्यानमग्न, स्थिर बुबुळे छायाचित्रात टिपण्यासाठी विशिष्ट प्रकारचा प्रकाशाचा कोन हवा होता. त्याने सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायण आणि पृथ्वीची प्रदक्षिणा यांचा अभ्यास करून तो विशिष्ट प्रकाश मिळणारा दिवस गाठला व ते छायाचित्र टिपले.
 

प्रसादने मेहनतीने व कलाकाराच्या दृष्टीने काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन तयार केले आहे. अजिंठ्याचे सौंदर्य, त्याची होत असलेली अवहेलना व तो वारसा वाचवण्याची गरज समाजमनापर्यंत, रसिकांपर्यंत जावी यासाठी प्रसादचा प्रयत्न आहे. छायाचित्रांमध्ये एक ते अठ्ठावीस लेण्यांचे दहा फूट लांबीचे अतिशय दुर्मीळ छायाचित्र जसे आहे तसेच ‘महाजनकजातक’ रंगवलेली सोळा फूट लांबीची एकाच चित्राची सलग भिंत छायाचित्रात दिसते. तो प्रदर्शनकाळात राम थत्ते यांच्यासारख्या त्या विषयातील तज्ज्ञाची व्याख्याने, चर्चा अशा विविध कार्यक्रमांची योजना करतो. प्रदर्शन नाशिक, चेन्नई, मुंबई अशा काही शहरांमध्ये मांडले गेले आहे. बुध्दाच्या पाचशेसत्तर जातककथांमध्ये चित्रांचे अनेक संदर्भ सापडतात. चित्रांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे प्रयत्न यापूर्वी वेळोवेळी झाले आहेत. उदाहरण गुंफा क्रमांक एकमधील पद्मपाणी बोधिसत्त्वाच्या चित्राचे देता येईल. त्याची डागडुजी १९३४ साली निजामाच्या काळात वॉर्निश वापरून करण्यात आली, पण त्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे चित्राची हानी अधिक झाली! अनेक चित्रांमध्ये गिलावा पडलेल्या जागी सिमेंट लावण्याचे प्रयोग झाले आहेत.
 

प्रसादने या चित्रांचे कॅनव्हासवर पेंटिंग करण्याचे प्रयत्न सुरू केले, पण मूळ चित्रांचा जो पोत आहे तो त्यांमध्ये येईना. मूळ चित्रांमध्ये यक्षाच्या गळ्यातील माळेच्या मोत्याचा उठावदारपणा देखील जाणवतो, वस्त्राचा पोत कळतो. ते सगळे कॅनव्हासवर उमटेना म्हणून मग प्रसादने अत्याधुनिक, डिजिटल तंत्राच्या आधारे ते काम सुरू केले आहे. त्याचे प्रयत्न सर्व चित्रे त्यांचे पूर्ण सौंदर्य व मूळ रंग यांच्यासह रसिकांना बघता यावी यासाठी आहेत. सर्व कामासाठी सुमारे ऐंशी लाखांची गुंतवणूक गरजेची आहे. प्रसादने ती वैयक्तिक पातळीवर मित्रमंडळींच्या मदतीने उभी केली. प्रसादचे काम मॅकॅण्टोशच्या वर्कस्टेशनवर सुरू आहे. प्रसादच्या प्रदर्शनात अशी पूर्ण झालेली काही चित्रे बघायला मिळतात.
 

प्रसादने बुध्दाच्या जातककथा समजून घेण्यासाठी सत्यनारायण गोयंकासारख्या काही अधिकारी व्यक्तींची मदत घेतली. कारण बुध्दाचे जीवन, त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा संदेश जर मला समजला नाही तर कलाकार म्हणून मी त्या चित्रांना काय न्याय देणार? असा सवाल तो त्याला स्वत:ला विचारतो.
 

प्रसादला या प्रवासात अजिंठ्यातील लेणी खोदणा-या छिन्नीने वेड लावले! त्या दरम्यान, त्याचे कोलंबिया विद्यापीठातील एका प्रकल्पावर काम सुरू होते. भारतातील अपूर्ण मंदिरे, शिल्पे यासंबंधी ‘अन्- फिनिश्ड’(Unfinished) नावाचा तो प्रकल्प आहे. प्रकल्पासाठी लागणारी छायाचित्रे काढण्याचे काम प्रसादला मिळाले होते. त्यानिमित्ताने त्याला रोममधील प्रख्यात शिल्पकार पिटर रॉकवेल यांचा स्नेह मिळाला. त्याचा आसेतू हिमाचल असा चौदा हजार किलोमीटरचा प्रवासही झाला. हातोडी-छिन्नी वापरून खोदलेल्या मूर्ती, लेणी बघताना प्रसादमधील कलाकार जागा होत असे. एखाद्या काळ्या कातळातून ध्यानमग्न बुध्दाची मूर्ती कोरताना त्या मूर्तीच्या चेह-यावर दिसणारी प्रगाढ शांतता छिन्नीतून कशी कोरता येत असेल? एवढे सूक्ष्म काम करण्यासाठी लागणारा पराकोटीचा संयम कलाकारांमध्ये कुठून आला असेल? तो अशा अनेक प्रश्नांच्या शोधार्थ छिन्नीच्या वापराचा अभ्यास करत आहे.
 

नाशिकमध्ये या छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन, त्यावर व्याख्याने, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे आर्ट स्कूल अशी प्रसादची स्वप्ने आहेत.
 

प्रसाद पवार फाउंडेशन
www.ajantaarts.com
sendprasadpawar@gmail.com
०९३७३०५०५७०

-वंदना अत्रे

vratre@gmail.com

(०२५३)२३६३५११

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.